महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूसह काही राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा सतर्कतेचा इशारा देण्याच कारण अर्थातच दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळ आहे. महाराष्ट्रालाही काही प्रमाणात फटका बसणार असल्याचा इशारा देण्यात आला असून, हे चक्रीवादळ हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकू लागलं आहे. १५ मे सायंकाळी किंवा १६ मे रोजी सकाळपर्यंत हे वादळ दक्षिण कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात धडकणार आहे. पण, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाला दिलेलं तौते हे नाव कुठून आलं आणि कोणत्या देशानं हे नावं दिलंय? यामागची गोष्ट मजेशीर आहे.

निसर्गासह मानवी साधनसंपत्तीची प्रचंड हानी करणाऱ्या चक्रीवादळांचा धसका जगभरात घेतला जातो. वेगवेगळ्या नावांनी ही चक्रीवादळ नोंदवली जातात. जागा बदलते तसे या चक्रीवादळांना वेगवेगळी नावं दिली जातात. गेल्या वर्षी महाराष्ट्रात आलेल्या चक्रीवादळाला निसर्ग हे नाव देण्यात आलं होतं. तर यावेळी निर्माण झालेल्या चक्रीवादळाला तौते हे नाव दिलं गेलं आहे. चक्रीवादळाला दिलेलं हे नाव एका सरड्याच्या प्रजातीतचं आहे. म्यानमारने या देशाने हे नाव दिलं आहे. सरड्याची प्रजाती असलेल्या हायली व्होकल लिझार्ड (highly vocal lizard GECKO) अर्थात बोलका सरड्याच्या नावावरून हे नाव देण्यात आलं आहे. सरड्याला तौत्के म्हटलं जातं, ज्याचा उच्चार तौते असा होतो.

चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात?

वेगवेगळ्या देशात धडकणारी चक्रीवादळ आणि चक्रीवादळांना देण्यात आलेली नावं हा आणखी एक मजेरीशीर विषय आहे. नाव दिले की त्या वादळाशी निगडित माहिती मिळवणे व लक्षात ठेवणे सोपे जाते. विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्य, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत.

भारताकडून अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर आणि वायू अशी आठ नावे सुचवली गेली. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात आली. ही नावे ओळीने देण्यात येतात. २०१६ मध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या एका वादळाला ‘क्यांत’ हे म्यानमारनं दिलं होतं. तर ओमाननेही यादीतील ४५ व्या चक्रीवादळाला ‘नाडा’ हे नाव सूचवलं होतं. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.