China-India 1962 War; Forgotten Heroes of Ladakh’s ‘Chandni’ Post: १९६० साली भारतीय सैन्यावर उत्तरेकडील सीमांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यासाठी ११४ इन्फंट्री ब्रिगेडची स्थापना करण्यात आली, या ब्रिगेडमध्ये लेफ्टनंट कर्नल आर. एम. बॅनॉन यांच्या नेतृत्वाखालील ७ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशिया आणि लेफ्टनंट कर्नल निहाल सिंह यांच्या नेतृत्वाखालील १४ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशियाचा समावेश होता. तसेच १९६१ साली एप्रिल महिन्यात लेफ्टनंट कर्नल हरी चंद (एम.व्ही.सी.) यांच्या नेतृत्वाखालील १/८ गोरखा रायफल्स या दलाची तिसरी बटालियन म्हणून नियुक्ती झाली होती. या बटालियनना वेगवेगळ्या भागांमध्ये तैनात करण्यात आलं.
१४ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशियाला गलवान नदीच्या उत्तरेकडील भागाची जबाबदारी देण्यात आली, १/८ गोरखा रायफल्सला गलवान आणि चुशुल यांच्या मधील प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली, तर ७ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशियाला सिंधू खोऱ्याच्या दक्षिणेकडील भागाची जबाबदारी देण्यात आली.
१९६१ मध्ये १४ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशियाच्या एका पलटणीला दौलत बेग ओल्डी (DBO) येथे तळ उभारण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. या ठिकाणाला त्यापूर्वीचे व्यापारी ‘नरकाचं द्वार’ म्हणून ओळखत असतं. हे स्थान काराकोरम खिंडीतून सुमारे १६ किलोमीटर आग्नेय दिशेला होतं. या प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती आणि अतिथंड हवामानामुळे, शत्रूसाठी देशात प्रवेश करण्यापूर्वी या प्रदेशात टिकून राहणं हेच अत्यंत कठीण होतं. त्या काळी लडाखमध्ये संपर्काची व्यवस्था अत्यंत मर्यादित होती; चुशुल आणि लेह यांना जोडणारा एकच जीप चालवता येईल असा चिंचोळा रस्ता होता. त्यामुळे हवाई पुरवठाच या तळांना कार्यरत ठेवण्याचं एकमेव साधन होता.
१९६२ च्या सुरुवातीस लडाखमध्ये १/८ गोरखा रायफल्स, १४ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशिया, ७ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशिया आणि लेफ्टनंट कर्नल बख्तावर सिंग यांच्या नेतृत्वाखालील ५ जाटच्या फक्त चार बटालियन तैनात होत्या. ५ जाट ही बटालियन १९६२ साली एप्रिल महिन्यात उरीहून येथे पाठवण्यात आली होती. त्यांच्याबरोबर १ महार (एमएमजी)ची एक पलटणही होती. या चार बटालियन्सनी एकूण ४८० किलोमीटरचा सीमाभाग उत्तरेतील DBO पासून ते दक्षिणेतील देमचोकपर्यंतचा सीमाभाग सांभाळला होता.
उत्तर विभाग
१४ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशियाबरोबर ५ जाटच्या ‘सी’ कंपनीलाही DBO (दौलत बेग ओल्डी) विभागात तैनात करण्यात आलं होतं. चिप चप नदीच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवर नऊ तळ उभारले गेले, तर मुर्गो आणि सुलतान चुश्कू यांच्या समोर पाच तळांची उभारणी करण्यात आली. प्रत्येक तळावर फक्त ५ ते २५ सैनिकांची तुकडी होती.
पहिल्या तळाचं नाव ‘चांदणी’ ठेवण्यात आलं होतं. या तळावर एक पूर्ण पलटण आणि ३-इंच मोर्टार विभाग होता. तळ क्रमांक २, ३, ४, ५, ७ आणि १४ वर प्रत्येकी सुमारे ३० सैनिकांची पलटण तैनात होती, तर उर्वरित तळांवर केवळ १० ते ११ सैनिकांचे लहान भाग तैनात होती. प्रत्येक तळांमधील सरासरी अंतर २ ते ३ किलोमीटर इतकं होतं. मात्र, ‘ज्योतिष’ नावाचा तळ क्रमांक १४ हा इतर भारतीय तळांपासून तब्बल १२ किलोमीटर अंतरावर होता. सर्व तळांवर केवळ हलकी शस्त्रं आणि अत्यल्प दारुगोळा होता, जो शत्रूकडे असलेल्या शस्त्रास्त्रांच्या तुलनेत खूपच मर्यादित होता.
चिनी सैनिकांचा हल्ला
युद्धाच्या पूर्वसंध्येला चिनी सैन्याने मोठ्या प्रमाणात सैनिक आणि जड शस्त्रास्त्रांची जमवाजमव सुरू केली. किझिल-जिलगा येथे त्यांच्याकडे दोन आक्रमक युनिट्स आणि एक राखीव दल असलेली एक संपूर्ण रेजिमेंट होती. १९ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी एकाच वेळी तळ क्रमांक ५ आणि ९ वर हल्ला चढवला.
हवालदार तुलसी राम
तळ क्रमांक ५, ज्याचं नाव ‘प्रमोदक’ ठेवण्यात आलं होतं, हा त्या विभागातील सर्वांत लहान तळ होता. येथे हवालदार तुलसी राम यांच्या नेतृत्वाखाली केवळ चार सैनिक तैनात होते. दोन चिनी कंपन्यांनी या तळावर हल्ला केला, परंतु उंच ठिकाणी असल्यामुळे भारतीय जवानांनी काही काळ शौर्याने सामना केला. अखेर चिनी सैन्याने तोफगोळे डागायला सुरुवात केली. त्या वेळी, मशीनगन चालवत राहण्याचा निर्णय घेतलेल्या हवालदाराशिवाय इतर सर्व चार सैनिक शहीद झाले. दारुगोळा संपल्यानंतर हवालदार तुलसी राम यांनी आपली बंदूक घेऊन DBO कडे परत कूच केलं. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना नंतर वीरचक्र (VrC) प्रदान करण्यात आलं. प्रमोदक तळ अखेर शत्रूच्या ताब्यात गेला.
सुभेदार दिवानचंद
१८,००० फूट उंचीवर वसलेला ‘टक्कर’ तळ सुभेदार दिवानचंद यांच्या नेतृत्वाखाली होता. चिनी सैन्याने या तळावर सर्व बाजूंनी मोठा हल्ला चढवला. परिस्थिती बिकट होत असल्याने सुभेदार दिवानचंद यांच्या नेतृत्वाखाली जवानांना माघार घेण्याचे आदेश देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी चिनी सैन्याने पुन्हा एक हल्ला केला. यावेळी उत्तरेकडील बाजूकडून फक्त दहा जवानांसह सुभेदार दिवानचंद यांनी जवळपास ३० चिनी सैनिकांच्या पथकाला परतवून लावले. काही वेळानंतर चिनी सैन्याने मोर्टार आणि मध्यम मशीनगनचा वापर करून आणखी एक हल्ला केला. हा हल्लाही त्यांनी परतवला, पण त्यांच्या तळाची स्थिती बिकट झाल्यामुळे त्यांना आग्नेय दिशेला काही मैल मागे हटण्याचे आदेश देण्यात आले. सुभेदार दिवानचंद यांनी या लढाईदरम्यान असामान्य शौर्य, नेतृत्व आणि चिकाटीचं प्रदर्शन केलं. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं.
मेजर अनंत राम
तळ क्रमांक ९ हा कंपनी CQMH अनंत राम यांच्या नेतृत्वाखालील १४ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशियाच्या ११ सैनिकांनी सांभाळला होता. या तळावर चिनी सैन्याने मोर्टार आणि मध्यम मशीनगनचा (MMG) मारा केला. एक तास चाललेल्या या तोफगोळ्यांच्या माऱ्यात चार सैनिक शहीद झाले. त्यानंतर चिनी पायदळाने तळाला वेढा घातला. मात्र, हवालदार अनंत राम आणि उरलेल्या सैनिकांनी जबरदस्त प्रतिकार करत चिनी सैन्याचं मोठं नुकसान केलं आणि वेढा तोडण्यात यश मिळवलं. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना वीरचक्र (VrC) प्रदान करण्यात आलं.
२० ऑक्टोबर रोजी तळ क्रमांक ५ आणि ९ यांनी पहाटेपर्यंत लढा दिला. अखेर चिनी सैन्याने तळ क्रमांक ५ ताब्यात घेतला आणि त्यामुळे माघारी व पुरवठ्याचे मार्ग बंद झाले. सुमारे २.३० वाजता जाट सैनिकांनी सांभाळलेल्या तळ क्रमांक २ आणि ३ वर चीनने हल्ला चढवला, इथेही प्रतिकारानंतर भारतीय जवान तळ क्रमांक ४ कडे माघारी फिरले.
तळ क्रमांक १: चांदणी: सुभेदार सोनम स्टॉपधन
तळ क्रमांक १ (चांदणी) हे उंच ठिकाणी असल्याने जिंकणं अत्यंत अवघड होतं, पण हल्ल्यांनंतर ते पूर्णपणे एकाकी झालं. या तळावर १४ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशियाचे सुभेदार सोनम स्टॉपधन आणि २५ सैनिक तैनात होते. २० ऑक्टोबरला या तळावर चिनी सैन्याने तोफगोळ्यांचा मारा आणि मोठा पायदळ हल्ला केला. एएमसीचे कॅप्टन राजा अमृथलिंगम यांनी जखमी सैनिकांची सतत सेवा केली. DBO चे कार्यवाहक कमांडर मेजर शार्दूल सिंग रंधावा यांनी मदत पथक पाठवण्याचा प्रयत्न केला, पण चिनी सैन्याने नियंत्रण घेतल्यामुळे ते शक्य झालं नाही.
तीन वेळा हल्ले परतवून लावल्यानंतरही अखेरीस ‘चांदणी’ तळ शत्रूच्या हाती गेला आणि सर्व सैनिक शहीद झाले. मेजर रंधावा यांनी ब्रिगेड मेजर जगजीत सिंग यांना भावनिक स्वरात कळवलं, “चांदणी खत्म हो गई… चांदणी जल गई.” सुभेदार सोनम स्टॉपधन यांना त्यांच्या शौर्यासाठी महावीरचक्र (MVC) प्रदान करण्यात आलं, तर कॅप्टन अमृथलिंगम, सिपाई चिरिंग, वांगचुक आणि फुंचोक यांना वीरचक्र (VrC) देण्यात आलं.
जमादार रिगजिन फुंचोक
‘भुजंग’ तळावर, जमादार रिगजिन फुंचोक यांच्या नेतृत्वाखाली १५ सैनिक होते. या तळावर तोफगोळ्यांचा जबरदस्त मारा झाल्यानंतर पायदळ हल्ले झाले. सैनिक संख्येने फारच कमी होते. या लढाईत हवालदार सरूप सिंग शहीद झाले, त्यांना मरणोत्तर महावीरचक्र (MVC) प्रदान करण्यात आलं.
चिनी सैन्याने सर्व तळांवर तोफगोळा मारा केला आणि चिप चप नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील बहुतांश तळ नष्ट केले. फक्त तळ क्रमांक ४ नेच दीर्घकाळ प्रतिकार केला. २० ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत चिनी सैन्याने सुमारे ४० सैनिक असलेल्या या तळावर तोफगोळे डागले. मेजर रंधावा यांनी जवानांना DBO कडे परतण्याचे आदेश दिले, पण अंधारामुळे केवळ काहीच सैनिक परत येऊ शकले.
त्या वेळेपर्यंत फक्त DBO तळ शाबूत होता. येथे १२५ सैनिक तैनात होते आणि त्यांचा ११४ ब्रिगेडशी संपर्क होता. इतर तळ, उदाहरणार्थ ‘जोधा’ आणि तळ क्रमांक १०, पुढील काही दिवसांत चिनी सैन्याच्या हाती गेले. २१ ऑक्टोबरपर्यंत १८ भारतीय तळ शत्रूच्या ताब्यात आले. त्यानंतर ‘गपशान–श्योक–सासर ब्रांगसा’ मार्गे धोरणात्मक माघार घेण्याचे आदेश देण्यात आले. माघारीपूर्वी सर्व उपकरणे आणि शस्त्रे नष्ट करण्यात आली.
जमादार भीमू कांबळे
- परंतु, १ महार बटालियनच्या जमादार भीमू कांबळे यांच्या पलटणीने आपल्या तोफा नष्ट करण्यास नकार दिला आणि चिनी गोळीबाराच्या वर्षावात त्या बरोबर घेत ते माघारी निघाले. त्यांच्या या पराक्रमाने अपार शौर्य आणि निष्ठेचं एक वेगळंच उदाहरण घालून दिलं.
- माघारीनंतर सैनिक सासर ब्रांगसा येथे पोहोचले, जिथे जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात आलं आणि आवश्यक पुरवठा हवाई मार्गे करण्यात आला. २१ नोव्हेंबरला युद्धविराम होईपर्यंत DBO क्षेत्रात पुन्हा कोणतीही लढाई झाली नाही. अत्यंत कठीण परिस्थितीत या सैनिकांनी दाखवलेलं शौर्य, सहनशक्ती आणि दृढनिश्चय हे १९६२ च्या युद्धातील सर्वाधिक वीरगाथांपैकी एक ठरले.
दक्षिण विभाग : सिंधू खोरे
चुशुलच्या दक्षिणेला असलेलं सिंधू खोरे रणनीतिच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण ते चुशुलला दुंगती आणि देमचोकशी जोडत होतं. ७ जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशियाचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आर. एम. बॅनॉन यांनी या विभागाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती. या युनिटचं मुख्यालय कोयूल येथे होतं, तर दुंगती येथे कंपनी स्तरावरील तुकडी आणि डोंगरदऱ्यांवर लहान तळ उभारण्यात आले होते. २७ ऑक्टोबर रोजी चिनी सैन्याने उत्तरेकडील रणनीतिचीच पुनरावृत्ती करत हल्ले सुरू केले.
चांग ला तळ
जमादार इशे तुंडुप यांच्या नेतृत्वाखाली १७ सैनिक या तळावर तैनात होते. २७ ऑक्टोबर रोजी चिनी सैन्याने हल्ला केला. शत्रूंच्या तुलनेत संख्येने अत्यंत कमी असूनही भारतीय सैनिकांनी शौर्याने आपली जागा सांभाळली. मात्र, दारुगोळा संपल्यावर लढाई अधिक कठीण ठरली. हवालदार सॅटिंगियन फुंचोक शेवटपर्यंत लढले अखेर शत्रूने त्यांना पकडलं. जमादार तुंडुप यांनी आपल्या सैनिकांना माघार घेण्याचे आदेश दिले. मात्र, स्वतः लढत राहिले. अखेर ते शहीद झाले. दोघांनाही मरणोत्तर महावीरचक्र प्रदान करण्यात आलं.
जरा ला तळ
- एका कनिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील १७ सैनिकांनी सुमारे ३०० चिनी सैनिकांच्या वेढ्यात जबरदस्त लढा दिला. सिग्नलमन धरमचंद ढिल्लन यांनी आपलं वायरलेस सेट नष्ट झाल्यानंतरही लढाई सुरू ठेवली. त्यांना मृत घोषित करून मरणोत्तर वीरचक्र देण्यात आलं, परंतु नंतर ते युद्धकैदी म्हणून जिवंत परतले. शिपाई सोनम रबगाइस यांनी मृत्यूपर्यंत लढा दिला आणि त्यांनाही वीरचक्र प्रदान करण्यात आलं.
- बहुतांश सैनिक २८ ऑक्टोबरपर्यंत यशस्वीपणे कोयूलपर्यंत माघारी पोहोचले.
- जम्मू अॅण्ड काश्मीर मिलिशियाचे शौर्य आजही देशात फारसं ठावूक नाही. परंतु, १९६२ च्या युद्धातील त्यांच्या धैर्य, चिकाटी आणि बलिदानाने त्यांच्या युनिट्सना आणि भारतीय सैन्याला अमर गौरव प्राप्त करून दिला.
