Army Officer’s Jugaad Saved Ladakh from China in 1962: थंडी एवढी की श्वासही गोठावा… आणि सगळीकडे फक्त हिमालयाच्या शांत, पण भयानक निःशब्द खोल दऱ्या, मधे भव्य पठार… अशा या लडाखच्या निर्जन पठारावर काही भारतीय जवानांनी १९६२ मध्ये चीनच्या प्रचंड सैन्याला रोखून धरलं होतं. हा तोच काळ जेव्हा चीनच्या ड्रॅगनची नजर भारतावर रोखलेली होती.
भारत-चीन युद्धाचं नाव घेतलं की आपण पराभव, गोंधळ आणि अपयशाचाच विचार करतो. पण या काळ्या पर्वातली एक अशी घटना आहे, जी आपल्या शौर्य आणि कल्पकतेचं प्रतीक ठरली. चुशूलच्या रणभूमीवर एका भारतीय अधिकाऱ्याने अशी काही युक्ती लढवली की, ज्यामुळे लडाख चीनच्या ताब्यात जाण्यापासून वाचलं. धड रस्ते नव्हते, हातात वेळ नव्हती, तेव्हा या अधिकाऱ्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. सहा AMX-13 रणगाडे हवाईमार्गे हिमालयाच्या उंच दऱ्यांमध्ये पोहोचवण्याची! चंदीगडच्या तळावरून उड्डाण घेऊन हे रणगाडे चुशूलपर्यंत पोहोचले… आणि चीनच्या प्रबळ फौजेसमोर भारताची लोखंडी भिंत उभी राहिली.
ही केवळ युद्धकथा नाही. ही त्या एका सैनिकाच्या कल्पकतेची, धैर्याची आणि देशप्रेमाची कहाणी आहे — त्याने फक्त यंत्रणा नव्हे, तर नियतीलाही पराभूत केलं. युद्ध हरलो परंतु त्या रात्री लडाखचा प्रदेश मात्र राखण्यात त्यांना यश आलं, तो एकप्रकारचा विजयच होता.
भारत आणि चीन हे शेजारील देश असले तरी या दोन देशांमधील परस्पर विरोधी मतप्रवाह हे सर्वश्रूत आहेत. त्यामुळेच या देशांमधील सीमांवर वादाच्या ठिणग्या पडताना दिसतात. याच सर्व इतिहासातील एक महत्त्वाचं पर्व म्हणजे १९६२ साली झालेलं भारत-चीन युद्ध. या युद्धात भारताच्या पदरी पराभव आला तरी ज्या एका घटनेमुळे भारतीय भूभाग वाचवता आला ती घटना विसरून चालणार नाही.
या युद्धात लडाखमधील चुशूल हा भाग निर्णायक ठरला. इथल्या भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याच्या आक्रमणाला परतवून लावलं. या भागावर चीनने केलेलं आक्रमण यशस्वी ठरलं असतं, तर लेहकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणि दऱ्यांवर चीनला खुला प्रवेश मिळाला असता. थोडक्यात सांगायचं झालं, तर चुशूल गमावणं म्हणजे लडाख गमावणंच ठरलं असतं.
या युद्धात चिनी सैन्याच्या पुढे सरसावण्याला रणगाड्यांच्याच्या मदतीने अधिक बळ मिळालं होत. त्यामुळे भारतीय सैन्याने तातडीने २० लान्सर्स रेजिमेंटमधील सहा AMX-13 रणगाडे लडाखच्या आग्नेय भागातील चुशूल येथे हवाईमार्गे पोहोचवण्याची विनंती केली. हे रणगाडे तिबेटकडून चुशूलकडे येणाऱ्या पठारी मार्गांचं संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक होते. स्पँगगुर गॅप हा चिनी सैन्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रवेशबिंदू होता. स्पँगगुर गॅप हा वास्तविक नियंत्रण रेषेवरील सुमारे दोन किलोमीटर रुंदीचा पर्वतदरीतील मार्ग आहे. लडाखपर्यंत रस्त्यांचे जाळे जवळजवळ अस्तित्वात नसल्याने, हे टँक हवाईमार्गे नेणं हाच एकमेव पर्याय होता.
मात्र, चंदीगडमधील भारतीय हवाईदलाच्या तळावर तांत्रिक अडचणींचं मोठं संकट उभं राहिलं. रणगाडे हवाईदलाच्या AN-12 या वाहतूक विमानात चढवणं हे अत्यंत धोकादायक काम होतं. “विमान कितीही मजबूत असलं तरी रणगाड्यांच्या ट्रक्सनी [अॅल्युमिनियमच्या] तळाशी असलेलं फ्लोअरिंग फाटण्याची शक्यता होती,” असं वायुसेनेचे माजी प्रमुख पी. सी. लाल यांनी त्यांच्या ‘माय इयर्स विथ द IAF’ या पुस्तकात म्हटलं केलं आहे.
या मोहिमेची जबाबदारी सांभाळणारे लेफ्टनंट कर्नल गुरबचन सिंग यांनी संरचनात्मक आणि वजनाशी संबंधित अडचणींवर अत्यंत कल्पक उपाय शोधले. पहिल्या समस्येसाठी त्यांनी सुतारांना सांगून “विमानाच्या तळाच्या आकाराला अगदी तंतोतंत बसतील अशा लाकडी फळ्या तयार करून त्यांचं आवरण तयार करायला सांगितलं, जेणेकरून त्या फळ्या हलणार नाहीत,” आणि त्यामुळे रणगाडे विमानात सुरक्षितपणे चढू शकतील आणि घसरणार नाहीत याची खात्री झाली. दुसऱ्या समस्येसाठी “एक मोठा, मजबूत लाकडी कमानीचा आधार तयार करण्यात आला आणि त्या लाकडी आधाराच्या आणि विमानाच्या मूळ सांध्यादरम्यान वाळूच्या पोत्यांचा थर ठेवण्यात आला.”
विमानाच्या वजनमर्यादेमुळेही अनेक कल्पक योजना आखाव्या लागल्या. १० टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या AN-12 विमानातील अनावश्यक वस्तू काढून टाकाव्या लागल्या. काही दारुगोळा उतरवण्यात आला आणि इंधनाचं प्रमाणही कमी करण्यात आलं. चंदीगड-चुशूल-चंदीगड या प्रवासासाठी लागेल इतकंच किमान इंधन विमानात ठेवण्यात आलं.
रणगाडे विमानात चढवण्याचं काम हे एखाद्या नाजूक नृत्याप्रमाणेच होतं. प्रत्येक रणगाड्यासाठी तीन जणांची आवश्यकता होती. त्यात एक चालक आणि एक मार्गदर्शक व एक पर्यवेक्षक होते. २४ ऑक्टोबर १९६२ रोजी यशस्वी प्रात्यक्षिक झाल्यानंतर भारतीय हवाईदलाने अखेर या मोहिमेला परवानगी दिली.
मात्र, शेवटच्या क्षणी एक अनपेक्षित अडचण निर्माण झाली. एका रणगाडा चालकाला बातमी मिळाली की, त्याची पत्नी त्यांच्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे. ही अत्यंत काटेकोरपणे आखलेली मोहीम विलंबित होण्याची शक्यता निर्माण झाली. पण लेफ्टनंट कर्नल गुरबचन सिंग यांनी तत्परतेने निर्णय घेतला. त्यांनी एक लष्करी डॉक्टर त्या प्रसूतीवर लक्ष ठेवण्यासाठी पाठवला आणि नवजात बाळाचा फोटो घेऊन तो परत आणला. त्यानंतर रणगाडे अखेर विमानात चढवण्यात आले आणि मोहीम संपल्यानंतर त्या चालकाला सुट्टी देण्यात आली.
२४ ते २५ ऑक्टोबरच्या रात्री रणगाड्यांचा पहिला ताफा हवाईमार्गे चुशूलला पोहोचवण्यात आला आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे उतरले. दुसरा ताफा त्यानंतरच्या रात्री रवाना झाला. या मोहिमेत वेळ अत्यंत महत्त्वाचा होती. कारण परतीच्या प्रवासासाठी फक्त आवश्यक इतकंच इंधन शिल्लक होतं. त्यामुळे चुशूलमधील सैनिकांकडे प्रत्येक विमानातील रणगाडे उतरवण्यासाठी केवळ १५ मिनिटांचाच वेळ होता. तरीही ही मोहीम निर्दोषपणे पार पडली. भारतीय लष्कराच्या इतिहासात प्रथमच शत्रूच्या नजरेसमोर रणगाड्यांना युद्धभूमीवर हवाईमार्गे उतरवण्यात आलं. एका सैनिकाच्या कल्पकतेमुळे आणि तत्काळ निर्णयक्षमतेमुळे लडाख चीनच्या ताब्यात जाण्यापासून वाचलं.