मंगळवारी संध्याकाळी ऑस्कर पुरस्कारांची नामांकनं जाहीर झाली. तीन भारतीय चित्रपटांनी या नामांकन यादीत स्थान मिळवलं आहे. ऑल दॅट ब्रीद इन ने डॉक्युमेंट्रीच्या श्रेणीत, द एलिफंट व्हिस्परर्स सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म डॉक्युमेंट्री श्रेणीत तर आर आर आर या सिनेमातील नाटू नाटू या गाण्याने ओरिजन साँगच्या श्रेणीत. ऑस्कर पुरस्कारांची सुरूवात १९२९ मध्ये करण्यात आली. मात्र भारतीय चित्रपटांना या पुरस्कारांमध्ये म्हणावं तसं यश मिळालेलं नाही. मात्र विविध भारतीय कलाकारांनी ऑस्करवर आपलं नाव कोरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भानू अथैय्या

भानू अथैय्या या सुप्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर होत्या. त्यांना कला क्षेत्रात मोठं व्हायचं होतं आणि त्यांनी कॉस्ट्युमच्या जगतात आपलं नावच इतकं मोठं करून ठेवलं की आजही त्यांच्या नावाचं उदाहरण दिलं जातं. सिनेमासाठी कॉस्ट्युम करणं हा कलेप्रमाणाचे व्यवसायाचाही भाग आहे हे त्यांना समजलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. भानू अथैय्या यांचा जन्म महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात झाला आहे. त्यांनी आत्तापर्यंत विविध सुप्रसिद्ध चित्रपटांसाठी कॉस्ट्युम डिझाईन केले आहेत. प्यासा, आम्रपाली, स्वदेस ही काही उदाहरणं देता येतील. १९८२ मध्ये गांधी नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या कॉस्ट्युम डिझाईनसाठी भानू अथैय्या यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला.

भारतात त्यांना मिळालेल्या ऑस्करच्या निमित्ताने पहिलं ऑस्कर आलं. १०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी कॉस्ट्युम डिझाइन केलं. त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे. गुलजार यांच्या लेकिन या सिनेमासाठी १९९० मध्ये तर आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगानसाठी त्यांना हे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

सत्यजीत रे

सत्यजीत रे हे भारतीय चित्रपट सृष्टीतले महान निर्मात्यांपैकी एक नाव आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. १९८५ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके हा सिनेमासृष्टीतला सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार दिला गेला. तसंच भारतरत्न हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता. ऑक्सफोर्ड या विद्यापीठाने सत्यजीत रे यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरवलं होतं. चार्ली चॅप्लिननंतर हा सन्मान मिळवणारे सत्यजीत रे पहिले निर्माते ठरले. १९९२ मध्ये Academy Honorary Award या सन्मानाने त्यांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं. सिनेमा सृष्टीतल्या योगदानाबाबत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

रेसुल पोकुट्टी

रेसुल पोकुट्टी हे भारतीय सिनेमा क्षेत्रातले प्रतिथयश साऊंड इंजिनअर आहेत. साऊंड एडिटर आणि ऑडिओ मिक्सरही आहेत. पुण्यातल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आहे. स्लमडॉग मिलेनियर या २००८ मध्ये आलेल्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट साऊं मिक्सिंगचा ऑस्कर पुरस्कार हा रेसुल पोकुट्टी यांना मिळाला आहे. याशिवाय रा.वन, हायवे, कोचाडयान यांसारख्या विविध दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांसाठीही त्यांनी काम केलं आहे. पुष्पा द राईज या सिनेमासाठी त्यांनी साऊंड मिक्सिंग केलं आहे. २००९ मध्ये केरलवर्मा पझसीराजा या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला आहे.

ए. आर. रहमान

मद्रासचा मोझार्ट असं ज्याचं वर्णन केलं जातं तो संगीतकार म्हणजे ए. आर. रहमान. ए. आर. रहमानने आत्तापर्यंत अनेक सिनेमांना संगीत दिलं आहे.स्लम डॉग मिलेयनियरमधल्या जय हो या गाण्यासाठी ओरिजन स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट गाणे या दोन्ही श्रेणींमध्ये ए. आर. रहमानला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. १९६७ मध्ये जन्मलेल्या ए. आर. रहमानने अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. रोजा, बॉम्बे, साथिया, स्वदेस, लगान, रंग दे बसंती, हायवे , स्लम डॉग मिलेनियर यांसारख्या अनेक सिनेमांना संगीत दिलं आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांच्या गाण्यांसाठी रहमानने संगीत दिलं आहे.

गुलजार

ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांना स्लम डॉग मिलेनियर सिनेमातल्या जय हो या गाण्यासाठी गीतकार म्हणून ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार गुलजार यांनी ए. आर. रहमान सोबत शेअर केला आहे. आत्तापर्यंत गुलजार यांनी गीतलेखनासाठी २० फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.

याशिवाय Period. End of a Sentence या डॉक्युमेंट्रीला २०१९ मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला. यका जेहताबची यांनी ही डॉक्युमेंट्री दिग्दर्शित केली होती. एकंदरीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या भारतीयांनीच आत्तापर्यंत ऑस्कर पुरस्कार आणले आहेत हेच यावरून लक्षात येतं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best costume designer to sound mixer indians who have won the oscar so far scj
First published on: 25-01-2023 at 17:12 IST