भारतासह जगभरात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव सध्या सुरू आहे. पक्ष्यांमधून पसरणारा हा विषाणूसंसर्ग आहे. यात इन्फ्लूएन्झा (एच५एन१) आणि इन्फ्लूएन्झा ए (एच७एन९) या विषाणूप्रकारांचा संसर्ग सर्वाधिक आढळून येतो. हे दोन्ही विषाणू मानवासह इतर प्राण्यांमध्ये संसर्गास कारणीभूत ठरल्याचे याआधी अनेक वेळा समोर आले आहे. महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे या साथीच्या काळात अंडी, चिकनसह इतर पदार्थ खावेत की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्रात साथ कुठे?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आढळल्याने प्रशासनाने त्या गावाच्या १० किलोमीटर परिघात दक्षता भाग जाहीर केला. या कोंबड्यांच्या तपासणीत त्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. बर्ड फ्लूच्या दक्षता भागातीत कोंबड्या मारून टाकण्याचे काम प्रशासनाकडे सुरू आहे. याचबरोबर या भागातील पशुखाद्य आणि अंडीही नष्ट करण्यात येणार आहेत. या भागातून कोंबड्या, अंडी, चिकन, पशुखाद्य, कुक्कुटपालन उद्योगाशी निगडित साहित्य बाहेर नेण्यास बंदी करण्यात आली आहे. यामुळे संसर्ग साखळी रोखण्यास मदत होणार आहे.

मानवाला संसर्गाचा धोका किती?

बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांतून इतर पाळीव प्राण्यांना होत असला तरी त्याचा मानवाला संसर्ग होण्याचा धोका कमी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेत २०२४ पासून मानवाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची ६७ प्रकरणे समोर आली असून, एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचे अद्याप एकही प्रकरण समोर आलेले नाही. त्यामुळे बर्ड फ्लूचा मानवामध्ये संसर्ग वाढण्याचा फारसा धोका नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अंडी खाताना काय काळजी घ्यावी?

आग्नेय आशियात न शिजवलेली अंडी खाल्ल्याने मानवामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला असू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. उकडलेली अंडी बर्ड फ्लू संसर्गास कारणीभूत ठरत नाहीत, असे अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेचे म्हणणे आहे. अंडी उकडलेली असल्यास ती खाण्यास योग्य आहेत. अंडी उकडल्याने त्यातील जीवाणू आणि बर्ड फ्लूसह इतर विषाणू नष्ट होतात. त्यामुळे अंडी उकडून खाणे हे बर्ड फ्लू साथीच्या काळात गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

चिकन, मांसाचे काय?

बर्ड फ्लूची बाधा कोबंड्यांसोबत इतर पाळीव प्राण्यांना होते. त्यामुळे चिकनसह इतर पाळीव प्राण्यांचे मांस खावयाचे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. हे मांस योग्य पद्धतीने शिजविलेले असेल तर ते खाण्यास सुरक्षित आहे, असा निर्वाळा अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेने दिला आहे. याचवेळी कच्चे मांस अथवा अर्धवट शिजविलेले मांस खाणे टाळावे. तसेच, शिजविलेले अन्न आणि कच्चे मांस वेगवेगळे ठेवावे, असा सल्लाही संस्थेने दिला आहे. तसेच, कच्चे दूध पिणेही टाळावे. दूध उकळून पिण्यामुळे त्यातील जीवाणू आणि विषाणू नष्ट होत असल्याने संसर्गाचा धोका कमी होतो.

काळजी काय घ्यावी?

बर्ड फ्लूचा उद्रेक झालेला आहे, अशा ठिकाणची अंडी बाजारात येणार नाहीत, याची काळजी शासकीय यंत्रणा घेतात. कारण बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर १० किलोमीटरच्या परिघात निर्बंध जारी केले जातात. अंड्यांची योग्य पद्धतीने हाताळणी, साठवणूक आणि ती शिजविणे या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. अंडी हाताळल्यानंतर तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा. अंडी पाण्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत योग्य प्रमाणात शिजवा. याचबरोबर अंडी विकत घेतल्यानंतर त्यांचा तीन आठवड्याच्या आता वापर करावा. योग्य पद्धतीने हाताळणी, साठवणूक आणि शिजविलेली अंडी संसर्गास कारणीभूत ठरत नाहीत. त्यामुळे या साध्या गोष्टींचे पालन करण्याकडे लक्ष द्या.

पोषणमूल्यात किती महत्त्व?

अंडी ही पोषणमूल्यदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहेत. ती प्रथिनांचा अतिशय चांगला स्रोत आहेत. याचबरोबर कोलीन, जीवनसत्त्व अ, ड, ई, बी६, बी१२, सेलेनियम ही पोषणमूल्ये अंड्यात मुबलक असतात. तसेच, झिंक आणि लोहसारख्या खनिजांचा पुरवठाही अंड्यातून शरीराला पुरेशा प्रमाणात होतो. अंडी ही प्रथिने, चरबी आणि महत्त्वाच्या जीवनसत्त्वांचा स्रोत असली तरी त्यातून शरीराला मिळणाऱ्या कॅलरी तुलनेने कमी आहेत. त्यामुळे योग्य पोषणमूल्य असलेल्या आहारात अंड्याचा समावेश केलेला दिसतो. याचबरोबर अंड्याचा आहारात वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येत असल्याने त्याला मोठी पसंती मिळते. बर्ड फ्लू साथीच्या काळातही योग्य काळजी घेऊन अंडी खाऊन तुम्हाला तुमच्या आहारातील पोषणमूल्ये कायम ठेवता येतील.
sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird flu virus infections in humans can we eat eggs during virus print exp css