Canada Toronto Jagannath Rath Yatra Attack : कॅनडातील टोरंटो शहरातल्या जगन्नाथ रथयात्रेवर अज्ञातांनी अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (तारीख १३ जुलै) उघडकीस आला. एका भारतीय महिलेनं व्हिडीओ शेअर करीत या संपूर्ण प्रकाराची सविस्तर माहिती दिली आहे. या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तीव्र निषेध व्यक्त केला. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारताकडून करण्यात आली. कॅनडामधील २०२१ च्या जनगणनेनुसार, हिंदू धर्म हा तेथील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. असे असतानाही तिथे हिंदू मंदिरांवर तसेच धार्मिक यात्रांवर सातत्याने हल्ले होत आहेत, त्यामुळे कॅनडामधील हिंदूंना कोण लक्ष्य करतंय असा प्रश्न अनेकांना पडलाय, त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

कॅनडातील हिंदू समुदायाने गेल्या आठवड्यात टोरोंटो शहरात भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा काढली होती. या रथयात्रेत शेकडो भक्त अत्यंत जल्लोषात सहभागी झाले होते. मात्र, या धार्मिक उत्सवावर अज्ञात समाजकंटकांनी अंडी फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये कुणीतरी रथयात्रेच्या मार्गावर अंडी फेकल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एका महिलेनं ही संपूर्ण घटना तिच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. “किसी ने यहाँ पर अभी अंडे फेंके हैं,” असा आवाज या व्हिडीओतून ऐकू येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे भाविकांमध्ये काही काळ संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती, मात्र असे असूनही रथयात्रा कुठेही थांबली नसल्याचं दिसून येत आहे.

व्हिडीओमध्ये भारतीय महिलेनं काय सांगितलं?

दरम्यान, ज्या महिलेनं हा संपूर्ण प्रकार तिच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला, तिने घटनेबाबतची माहितीही सांगितली आहे. “आम्ही इथे रथयात्रा काढत असताना बाजूच्या इमारतीवरून काही लोकांनी आमच्या दिशेने अंडी फेकली, पण आम्ही थांबलो नाही; कारण जेव्हा भगवान जगन्नाथ स्वत: भाविकांबरोबर असतात तेव्हा कोणत्याही व्यक्तींचा दोष आपल्याला थांबवू शकत नाही. ही फक्त एक यात्रा नाही, तर अढळ श्रद्धेचा उत्सव आहे,” असं या महिलेनं म्हटलं आहे. कॅनडातील सरकार म्हणतंय की, त्यांच्याकडे वंशभेद होत नाही, मग हिंदूंच्या मंदिरांवर आणि धार्मिक यात्रांवर हल्ले का होतात? असा प्रश्नही या महिलेनं उपस्थित केला आहे.

आणखी वाचा : पाकिस्तानमध्ये कुणाची दहशत? सीमेवरील जवान थेट राज्यांमध्ये तैनात; कारण काय?

कॅनडातील हिंदूंना कोण लक्ष्य करतंय?

  • कॅनडामधील हिंदू समाज पुन्हा एकदा धार्मिक द्वेषाचे लक्ष्य ठरत असल्याचे दिसून येत आहे.
  • गेल्या काही वर्षांत कॅनडामध्ये अनेक हिंदू मंदिरांवर हल्ले व विध्वंसाच्या घटना घडल्या आहेत.
  • या ठिकाणी भारतविरोधी आणि खलिस्तानी विचारसरणीची भित्तीचित्रेदेखील आढळून आली आहेत.
  • यावर्षी एप्रिलमध्ये कॅनडाच्या सुरे शहरातील लक्ष्मी नारायण मंदिरावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला होता.
  • या घटनेनंतर कॅनेडियन हिंदू चेंबर ऑफ कॉमर्सने तीव्र संताप व्यक्त केला आणि या कृत्याला हिंदूविरोधी द्वेष असं म्हटलं.
  • या घटनेच्या अवघ्या २० दिवसांपूर्वी, ग्रेटर टोरोंटो परिसरातील श्रीकृष्ण वृंदावन मंदिरावर दोन व्यक्तींनी हल्ला केला होता.
  • जवळच्याच पबमधून आलेल्या दोन व्यक्तींनी मंदिरात प्रवेश करून तिथे लावलेले फलक उद्ध्वस्त केले, असं व्हिडीओमधून दिसून आलं.
  • फेब्रुवारी २०२४ मध्ये ओंटारियो शहरातील विंडसर परिसरातील शिवमंदिराची अज्ञातांनी तोडफोड केली आणि भिंतीवर जय खलिस्तानच्या घोषणा लिहिल्या.
  • ऑगस्ट २०२३ मध्ये वॅन्कूव्हर परिसरात असलेल्या हिंदू मंदिराच्या भिंतीवर अज्ञातांनी आक्षेपार्ह चित्रे काढली होती. याप्रकरणी मंदिर समितीने पोलिसांत तक्रार केली.
  • जून २०२३ मध्ये कॅनडातील मोंट्रियाल परिसरातल्या दुर्गा मंदिराजवळ खलिस्तानसमर्थक पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्सवर भारताचे दुश्मन असा मजूकर होता.
  • नोव्हेंबर २०२३ मध्येही टोरोंटो जवळील ब्रॅम्पटन शहरातील हिंदू सभा मंदिरावर हल्ला झाला होता.
  • खलिस्तानी झेंड्यांसह आलेल्या एका आक्रमक गटाने मंदिराच्या परिसरात गोंधळ घालत भाविकांना मारहाण केली होती.
  • व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही जण मंदिरात आलेल्या हिंदू भक्तांना लाठ्या-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून आले.
कॅनडातील हिंदू समुदायाने गेल्या आठवड्यात टोरोंटो शहरात भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा काढली होती.

हिंदू रथयात्रेवरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

कॅनडातील हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. टोरोंटो शहरात भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेवर अंडीफेक करण्यात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. कॅनडा सरकारने या घटनांची गंभीर दखल घेऊन त्या तातडीने थांबवायला हव्यात, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री व सध्या विरोधी पक्षनेते असलेले नवीन पटनायक यांनी टोरंटो शहरातील घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. “कॅनडाच्या टोरोंटो शहरात रथयात्रेदरम्यान भक्तांवर अंडी फेकण्यात आल्याच्या बातम्या ऐकून अत्यंत खंत वाटली. अशा घटना केवळ भगवान जगन्नाथाच्या भक्तांच्या भावना दुखावत नाहीत, तर ओडिशातील जनतेच्या मनालाही खोल वेदना देतात. ही यात्रा आमच्यासाठी केवळ एक सण नाही, तर ती सांस्कृतिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे,” असं पटनायक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : Code Pink म्हणजे काय? महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णालयाला हा कोड का लागू केलाय?

हिंदू समुदायामध्ये असुरक्षिततेची भावना

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही सोमवारी (१४ जुलै रोजी) पत्रकार परिषदेत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या घटनेचा संबंध “खोडसाळ प्रवृत्तीच्या लोकांशी” असल्याचे नमूद केले. अशा घृणास्पद घटना मनाला वेदना देणाऱ्या असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, कॅनडात सातत्याने घडत असलेल्या या घटना केवळ धार्मिक भावना दुखावणाऱ्या नाहीत, तर कॅनडामधील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून या संदर्भात काय कठोर भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.