CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज लागला आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर जसा निकाल पाहता येतो, अगदी तसेच आता ‘डिजिलॉकर’वरदेखील दहावी-बारावीचा निकाल उपलब्ध झाला आहे. विद्यार्थ्यांना याआधी CISCE बोर्डाचे दहावी आणि बारावीचे तसेच तामिळनाडू राज्य बोर्डाचे दहावीचे निकाल डिजिलॉकरवरून प्राप्त करता आले आहेत. आता ही सुविधा CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध झाली आहे. डिजिलॉकर शालेय प्रमाणपत्रांबरोबरच इतरही अनेक प्रकारची सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी फायद्याचे ठरते. डिजिलॉकरमुळे आपले ड्राइव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅनकार्ड, कार नोंदणी प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र इत्यादी दस्तऐवज डिजिटल स्वरूपात सांभाळून ठेवता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डिजिलॉकर म्हणजे काय आणि त्याचा वापर कोण करते?

केंद्र सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत २०१५ साली डिजिलॉकरची सुविधा सुरू केली होती. नागरिकांना आवश्यक असेल तेव्हा त्यांची संबंधित अधिकृत कागदपत्रे डिजिटल स्वरूपात कुठेही, कधीही उपलब्ध व्हावीत, यासाठी भारत सरकारने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली होती. मे २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, २७० दशलक्ष लोक या ॲप्लिकेशनचा वापर करतात. आधार कार्ड, विम्याची कागदपत्रे, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना अशी विविध कागदपत्रे सहजगत्या या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊ शकतात. वापरकर्त्यांनी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आतापर्यंत ६.७ अब्ज कागदपत्रे मिळवली आहेत. माहिती तंत्रज्ञान नियम, २०१६ च्या ९ अ नियमानुसार, डिजिलॉकरवर उपलब्ध असलेली कागदपत्रे ही प्रत्यक्षातील कागदपत्रांप्रमाणेच वैध मानली जातात.

हेही वाचा : रशिया- युक्रेन युद्धः लष्करी पार्श्वभूमी नसलेल्या नेत्याला पुतिन यांनी केले संरक्षणमंत्री, कारण काय?

डिजिलॉकरचा वापर का वाढला आहे?

भारत सरकारने कागदविरहित कारभारावर भर देत डिजिलॉकरची सुविधा सुरू केली होती. नागरिकांना आपली ओळख पटवून देण्यासाठी महत्त्वाची सरकारी कागदपत्रे अद्ययावत स्वरूपात कोणत्याही क्षणी उपलब्ध होण्यासाठी ही सुविधा फायद्याची ठरली आहे. काहीवेळा नैसर्गिक आपत्तींमुळे घरी ठेवलेली कागदपत्रेही गहाळ होऊ शकतात. मोबाइलसारख्या माध्यमांमध्ये डिजिटल स्वरुपात ठेवलेल्या कागदपत्रांच्या वैधतेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच आपला फोन खराब झाला अथवा चोरी झाला तर या कागदपत्रांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. या सगळ्यावरील खात्रीशीर उपाय म्हणून डिजिलॉकरकडे पाहिले जाते. आपली खरी कागदपत्रे घेऊन फिरण्यापेक्षा घरी एका जागी सांभाळून ठेवता येतात आणि गरज भासल्यास या अ‍ॅपच्या मदतीने ती कुठेही दाखवता येऊ शकतात. त्यामुळे अल्पावधीतच अनेकांनी या ॲपचा वापर सुरू केला. शिवाय ती खऱ्या कागदपत्रांप्रमाणेच वैध असल्याने कागदी दस्ताऐवज कुठेही घेऊन फिरण्याची गरज उरलेली नाही.

डिजिलॉकर किती सुरक्षित आहे?

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हे सरकारी ॲप असून ते तयार करताना सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेण्यात आल्या आहेत. डिजिलॉकरच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यावरील डेटाच्या सुरक्षिततेसाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मला 2048 बिट RSA SSL एन्क्रिप्शन असून लॉग इन करताना ओटीपीद्वारे पडताळणी करावी लागते. प्लॅटफॉर्मवर आलेल्या वापरकर्त्याने ठराविक काळ कोणतीही कृती न केल्यास त्याला आपोआप लॉग आऊट केले जाते. तसेच प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीसाठी वापरकर्त्याच्या संमतीची गरज असते. त्यामुळे, प्लॅटफॉर्मवरील माहिती सहजासहजी चोरीला जाणे शक्य नाही. मात्र, कोणत्याही प्रकारच्या सरकारी डेटावर हॅकर्सचा डोळा असतो. ते अशाप्रकारचा डेटा चोरी करून विकण्याचा प्रयत्न करत असतात. २ जून २०२० रोजी असा एक प्रयत्न झाला होता. मात्र, डिजिलॉकरवरील सर्व डेटा सुरक्षित असल्याचा निर्वाळा आयटी मंत्रालयाने दिला होता. गुगल प्ले स्टोअरने दिलेल्या माहितीनुसार, डिजिलॉकरवरील डेटा जसे की, तुमचे नाव, इमेल आयडी, युझर आयडी इत्यादी माहिती कोणत्याही थर्ड पार्टी अॅपला पुरवली जात नाही.

डिजिलॉकर वापरताना काय समस्या येतात?

स्मार्टफोन वापरण्याची सवय नसलेल्या लोकांना डिजिलॉकर वापरणे कठीण वाटते. अनेकांना इतर कुणाच्याही मदतीशिवाय डिजिलॉकर डाऊनलोड करणे, ओटीपी वापरणे आणि आपली आवश्यक ती कागदपत्रे मिळवणे अवघड वाटते. खासकरून अशिक्षितांना ही समस्या अधिक येते. नावांमधील गफलतींमुळेही बऱ्याचदा प्रमाणपत्रे उपलब्ध होत नाहीत. अशावेळी आपले प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. डिजिलॉकरवरील कागदपत्रे वैध मानली जात असली, तरी काही ठिकाणी सरकारी कामकाजामध्ये कागदी दस्ताऐवजांचीच मागणी केली जाते. अशावेळी अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते.

डिजिलॉकरमध्ये अकाउंट कसे तयार कराल?

१. सरकारी वेबसाइट digilocker.gov.in वर जा.
२. ‘साइन अप’ या पर्यायावर क्लीक करा.
३. नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी इत्यादी सर्व आवश्यक माहिती भरा.
४. तुम्ही दिलेल्या नंबरवर एक ओटीपी येईल.
५. हा ओटीपी किंवा फिंगरप्रिंट पर्याय वापरून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
६. तुमचे युजरनेम आणि पासवर्ड तयार करून लॉग इन करा.

हेही वाचा : कॅनडात सोन्याची आजवरची सर्वात मोठी फ्लिमी स्टाइल चोरी; अटकेतील भारतीय वंशाचा अर्चित ग्रोव्हर नेमका कोण?

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल डिजिलॉकरवरून कसा पाहायचा?

१. सरकारी वेबसाइट digilocker.gov.in वर जा.
२. आधीपासून तुमचे अकाउंट असल्यास लॉग इन करा अथवा वर सांगितलेल्या पद्धतीने नवे अकाउंट तयार करा.
३. ‘एज्युकेशन’ अथवा ‘रिझल्ट’ विभागामध्ये असलेल्या ‘CBSE रिझल्ट्स’ या पर्यायावर क्लिक करा.
४. CBSE परीक्षा क्रमांक, शाळा क्रमांक आणि इतर आवश्यक ती माहिती भरा.
५. आवश्यक ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला दहावी आणि बारावीचा निकाल प्राप्त होईल.

More Stories onनिकालResult
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse board result on digilocker does it keep your data safe vsh
First published on: 13-05-2024 at 19:24 IST