शत्रूराष्ट्रावर मारा करण्यासाठी प्रत्यक्ष युद्धभूमीत शस्त्रास्त्रांचा वापर करणे आता कधीच मागे पडले आहे. अदृश्य जीवजंतू किंवा रासायनिक शस्त्रांचा वापर करून माणसे मारली जातात. करोना महासाथ हा त्याचाच एक प्रकार असल्याचे बोलले जाते. मात्र आता रोगराईचा मारा माणसांवर नव्हे, तर शेतातील पिकांवर करण्यात येणार असून हा ‘कृषी दहशतवाद’ करोनापेक्षाही महाभयंकर असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अमेरिकेत नुकतेच एका चिनी महिलेला बुरशी तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या बुरशीमुळे पिकांवर रोग जडून ती नष्ट होण्याचा धोका असतो. हा कृषी दहशतवाद काय आहे, त्याविषयी…
बुरशीचे तस्करी प्रकरण काय आहे?
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाच्या आण्विक, पेशीय आणि विकासात्मक जीवशास्त्र विभागातील संशोधक युनकिंग जियान (३३) हिला ‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरम’ नावाची बुरशी तस्करीप्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली. तिचा प्रियकर झुन्योंग लिऊ (३४) याला अमेरिकेत या बुरशीची तस्करी करण्यास मदत केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आल्याचे अमेरिकी तपास संस्था ‘एफबीआय’ने सांगितले. या प्रकरणात आधी झुन्योंगला अटक करण्यात आली. मात्र त्याने सुरुवातीला पोलिसांना चुकीची माहिती सांगितली. मात्र नंतर कबूल केले की त्याने ही बुरशी तस्करी करून डेट्रॉइट मेट्रोपॉलिटन विमानतळाच्या मार्गे अमेरिकेत आणली. या बुरशीवर मिशिगन विद्यापीठात संशोधन करून ती पिकांवर अधिक धोकादायक कशी बनेल हे तो युनकिंगसह पाहणार होता. एफबीआयने या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर तस्करी करणे, कट रचणे, पोलिसांची दिशाभूल करणे आणि व्हिसा फसवणुकीशी संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले. या दोघांना बुरशीच्या रोगजनकावर काम करण्यासाठी चीन सरकारकडून निधी मिळाला होता, असा आरोप करण्यात आला आहे.
‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरम’ बुरशी धोकादायक?
‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरम’ या बुरशीमुळे पिके नष्ट होण्याचा धोका असतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. या बुरशीमुळे पिकांवर ‘हेड ब्लाइट’ नावाचा रोग होतो. या रोगामुळे गहू, बार्ली (जव), मका आणि भात या पिकांवर दुष्परिणाम होतात. हा रोग झाल्यास ही पिके निकृष्ट दर्जाची होण्याची भीती असते. या बुरशीमुळे दरवर्षी जगभरात अब्जावधी डॉलरचे आर्थिक नुकसान होते, अशी माहिती कृषीतज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय हा रोग झालेल्या पिकांचे सेवन केल्यास उलट्या, यकृताचे आजार होतात, त्याशिवाय मानव व पशुधनात पुनरुत्पादक दोष निर्माण होतात, असे आरोग्यतज्ज्ञांकडून सांगण्यात आले. हेच हेरून या बुरशीवर प्रयोगशाळेत अधिक संशोधन करण्यात येणार होते. ही बुरशी संभाव्यत: कृषी दहशतवादाचे शस्त्र ठरू शकते, असा इशारा त्यामुळे देण्यात आला आहे.
कृषी दहशतवाद म्हणजे काय?
राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय राजकीय हितसंबंधांना लक्षणीय नुकसान पोहोचवण्यासाठी पायाभूत सुविधा आणि प्रक्रियांसह कृषी पर्यावरणावर शत्रुत्वाचा हल्ला म्हणजे कृषी दहशतवाद. या शब्दाचा सार्वजनिक वापर पहिल्यांदा अमेरिकी पशुवैद्यकीय रोगतज्ज्ञ कोरी ब्राऊन यांनी केला. १९९९ मध्ये एका अहवालात त्यांनी नमूद केले की, अन्नसुरक्षा धोक्यात येण्यासाठी शत्रूराष्ट्रांकडून पिकांवर अशा प्रकारे हल्ले केले जातात. त्यांनी याला कृषी दहशतवाद संबोधले. अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये हानीकारक जिवाणू किंवा विषाणू यांच्याद्वारे शेतीवर हल्ला केला जातो. त्यामुळे शेती उत्पादन नष्ट होते किंवा निकृष्ट होते. या निकृष्ट पिकांमुळे मानव किंवा प्राण्यांना विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो, असे संशोधकांनी सांगितले. भारतासह अनेक देशांची अर्थव्यवस्था कृषीआधारित असते. त्यामुळे कृषी दहशतवादाच्या माध्यमातून या देशांची अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो.
कृषी दहशतवादाचे इतिहासात दाखले…
जगाच्या इतिहासात शेतपिकांवर हल्ला करण्याचा प्रकार हा नवीन नाही. १२व्या शतकांतील मंगोल सम्राट चंगेज खानने त्याच्या शत्रूचा अन्नपुरवठा कमी करण्यासाठी बुळकांडीची लागण झालेली गुरे पाठवली. मंगोल आक्रमकांनी नकळतपणे हा रोग संपूर्ण आशियामध्ये आणि अत्यंत संवेदनशील युरोपियन पशुधनात पसरवला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १९३० च्या दशकातील चीन-जपान युद्धामध्ये कृषी दहशतवादाचा प्रयोग झाला. जपानचे एक विमान चीनच्या हुनान प्रांतातून उडाले. या विमानातून कुक्कुट खाद्य खाली सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी शेताभातात त्याने अनेक कोंबड्या व बदकांचे बळी गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने कोलोरॅडो पोटॅटो बीटल हे कीटक वापरून ब्रिटनच्या बटाटा पिकाला नष्ट करण्याची योजना आखली होती. मात्र ही योजना फसली. व्हिएतनाम युद्धाच्या वेळी ‘ऑपरेशन रांच हेड’ मोहिमेद्वारे अमेरिकेने रसायनास्त्रांचा मारा केला. या अस्त्रांचे लक्ष्य माणसे नव्हे, तर झाडेझुडपे आणि शेतातील पिके होते. व्हिएतनाममधील उभी पिके या रसायनास्त्रांमुळे आडवी झाली.
अमेरिकेतील तज्ज्ञांचे म्हणणे काय?
या प्रकरणाचा संदर्भ देत अमेरिकेचे चिनी व्यवहारांवरील सर्वोच्च तज्ज्ञ गॉर्डन जी चांग यांनी सांगितले की या जोडप्याचे कृत्य अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखे आहे. चीन अमेरिकेसाठी अधिक धोकादायक असून जर अमेरिकेने चीनशी संबंध तोडण्यासारखी कठोर पावले उचलली नाहीत, तर करोना महासाथीपेक्षा भयंकर फटका बसू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिकेने चीनवर हल्ला करावा, असे चीनला वाटत आहे, त्यामुळे ते अशा प्रकारचे भयानक कृत्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अमेरिकेतील काही कृषीतज्ज्ञांनी सांगितले की, ही बुरशी अमेरिकेत एका शतकाहून अधिक काळापासून आहे, कीटकनाशके फवारून ती रोखता येते आणि नियमितपणे आणि मोठ्या प्रमाणात सेवन केल्यासच ती धोकादायक आहे. हे एक कुचकामी शस्त्र असेल, असे इलिनॉय विद्यापीठातील पीक विज्ञान प्राध्यापक जेसिका रुटकोस्की यांनी सांगितले.
sandeep.nalawade@expressindia.com