Nobel Peace Prize nomination Process : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हातात घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतात. राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याची खंत ट्रम्प यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा, अशी भूमिका मांडली होती. आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनीही नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केली आहे. विशेष बाब म्हणजे इस्रायलने अब्राहम करारांमधील भूमिका लक्षात घेऊन, ट्रम्प यांचे नाव सुचवले आहे. त्यामुळे नोबेल शांतता पुरस्कारासाठी उमेदवाराचे नाव सुचवण्याचा अधिकार नेमका कोणाला असतो? तसेच या पुरस्कारासाठी अंतिम निवड प्रक्रिया कशी असते? असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले आहेत. त्याचाच घेतलेला हा आढावा…
उमेदवार नामांकनाचा अधिकार कोणाला?
नोबेल शांतता पुरस्कार हा इतर जागतिक पुरस्कारांसारखा नसल्याने त्यासाठी अर्ज करण्याची कोणतीही प्रक्रिया नसते. दरवर्षी नॉर्वेजियन नोबेल समिती काही विशिष्ट व्यक्ती व संस्थांना निमंत्रण पाठवते आणि त्यांच्याकडेच उमेदवाराचे नामांकन करण्याचा अधिकार असतो. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळविण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींमध्ये- कोणत्याही देशातील राष्ट्राध्यक्ष, तसेच पंतप्रधान किंवा मंत्र्यांचा समावेश होतो.
इतिहास, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय कायदा, शांतता अभ्यास यांसारख्या विषयांचे विद्यापीठातील प्राध्यापकही नोबेलसाठी पात्र ठरू शकतात. परराष्ट्र धोरणविषयक संशोधन करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांच्या संचालकांची नावेही शांततेच्या नोबेलसाठी सुचवली जाऊ शकतात. या प्रक्रियेमुळे ‘नोबेल’ची प्रतिष्ठा टिकून राहते आणि प्रत्येक वर्षी त्या संदर्भातील चर्चा जागतिक पातळीवर महत्त्वाची ठरते. डोनाल्ड ट्रम्प यांचे या पुरस्कारासाठी नामांकन झाले असले तरी अंतिम निर्णय नोबेल समितीच्या निकषांवर आधारलेल्या मूल्यांकनानंतरच घेतला जाणार आहे.
आणखी वाचा : चीनमधील सर्वात मोठे धरण भारतासाठी ठरू शकते ‘वॉटर बॉम्ब’? याचा धोका काय?
सूचकांची नावे ५० वर्षांसाठी गोपनीय
जागतिक न्यायालयांचे न्यायाधीश, माजी नोबेल शांतता पुरस्कारविजेते, तसेच नॉर्वेजियन नोबेल समितीचे सदस्य यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी उमेदवाराला नामांकित करण्याचा अधिकार आहे. दरवर्षी जगभरातील हजारो व्यक्तींना हे अधिकृत आमंत्रण दिले जाते. मात्र, नोबेलसाठी कोणकोणते उमेदवार होते आणि त्यांचे नाव कुणी कुणी सुचवले होते? ही माहिती ५० वर्षांसाठी गोपनीय ठेवली जाते. पुरस्काराची प्रतिष्ठा अबाधित राखणे आणि राजकीय हस्तक्षेप टाळणे हा त्यामागचा उद्देश असतो.
नोबेल पुरस्काराची निवड प्रक्रिया कशी असते?
- नोबेल शांतता पुरस्कारासाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर आणि गोपनीय असते.
- आल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार उमेदवारांची नावे सुचविण्याची अंतिम मुदत ही ३१ जानेवारीपर्यंत असते.
- फेब्रुवारी ते मार्चदरम्यान नॉर्वेजियन नोबेल समितीकडून सर्व उमेदवारांच्या नावांची तपासणी करून, एक शॉर्ट लिस्ट तयार केली जाते.
- एप्रिल ते ऑगस्टदरम्यान त्या संदर्भातील सखोल अहवाल तयार केले जातात आणि त्याबाबत तज्ज्ञ सल्लागार व्यक्तींचा सल्ला घेतला जातो.
- सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस उमेदवारांच्या नावांची अंतिम शिफारस समितीकडे सादर केली जाते.
- ऑक्टोबरमध्ये बहुमताने मतदान करून विजेता निवडला जातो आणि हा निर्णय अंतिम असतो, त्यावर अपील करता येत नाही.
- १० डिसेंबर रोजी आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओस्लो येथे संबंधित व्यक्तीला नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला जातो.
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांना काय दिले जाते?
नोबेल शांतता पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांना केवळ आर्थिक बक्षीसच नव्हे, तर एक जागतिक प्रतिष्ठा लाभते. पुरस्काराच्या स्वरूपात विजेत्यांना सुवर्णपदक, वैयक्तिक सन्मानपत्र, ११ मिलियन स्वीडिश क्रोनर (भारतीय चलनातील सुमारे नऊ कोटी रुपये किंवा $1.03 दशलक्ष अमेरिकन डॉलर) इतकी रोख रक्कम दिली जाते. सर्वांत महत्वाची बाब म्हणजे- नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचा ऐतिहासिक व्यक्तींच्या यादीत समावेश केला जातो. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, मलाला युसूफझाई आणि संयुक्त राष्ट्र संघटनेला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आजपर्यंत केवळ तीन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला असून, त्यामध्ये थिओडोर रुझवेल्ट (१९०६ रशिया-जपान युद्धसमाप्तीसाठी मध्यस्थी), वुड्रो विल्सन (१९१९ लीग ऑफ नेशन्सची स्थापना) व बराक ओबामा (२००९ आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न) यांचा समावेश आहे.
नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प इतके आग्रही का?
डोनाल्ड ट्रम्प यांचा नोबेल शांतता पुरस्कार मिळविण्याचा हट्ट हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी संबंधित असू शकतो. २००९ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्याच्या अवघ्या नऊ महिन्यांतच ओबामा यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. जागतिक राजनैतिक संबंध व लोकांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या त्यांच्या असाधारण प्रयत्नांबद्दल ओबामा यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांना हा पुरस्कार देण्यावर आक्षेप घेतला होता. २०२४ मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीतही ट्रम्प यांनी वारंवार ओबामा यांना मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्काराचा उल्लेख करीत संताप व्यक्त केला होता. “जर माझं नाव ओबामा असतं, तर मला हा पुरस्कार १० सेकंदांत मिळाला असता”, असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान, आधी पाकिस्तान आणि इस्रायलने नाव सुचविल्यानंतर यावेळी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.