What does the India-China ‘Dragon-Elephant Tango’ mean?: सध्याच्या बदलत्या जागतिक राजकारणात एका बाजूस चीन बरोबर संघर्ष व दुसरीकडे व्यापार आणि दुसऱ्या बाजूस अमेरिकेबाबात व्यापार कराच्या बाबतीत तणाव आणि संरक्षण क्षेत्रात भागीदारी अशा दुहेरी पातळ्यांवर तारेवरची कसरत करत भारताची वाटचाल सुरू आहे. चीनबरोबर त्याचं तणावपूर्ण नातं आणि अमेरिकेबरोबर वाढत असलेली व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अशा दोन्ही स्तरावरील आघाड्या भारत सांभाळत आहे. या दोन्ही बाजूंना सांभाळणं भारतासाठी केवळ गरज नसून एक मोठं आव्हानही आहे.

‘ड्रॅगन-एलिफंट टँगो’ हा शब्दप्रयोग भारत-चीन नात्याचं वर्णन करण्यासाठी सध्या वापरला जातो. एखाद्या नृत्यप्रकारासारखं हे नातं कधी सहयोगाचं तर कधी संघर्षाचं आहे. दुसरीकडे, भारत-अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सध्या निर्णायक वळणावर आहे, या वळणावर व्यापार- तंत्रज्ञान आणि जागतिक धोरण यांचे एकत्रिकरण पाहायला मिळत आहे.

भारत-चीन: सहकार्य की संघर्ष?

भारत आणि चीन हे दोन्ही देश आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत आणि त्यांच्या वाढत्या सामर्थ्यामुळे जागतिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होत आहे. चीनचं प्रतीक ड्रॅगन, तर भारताचं प्रतीक हत्ती मानला जातो. या दोघांमधील या नव्या समीकरणासाठी ‘टँगो’चा हा शब्दप्रयोग केला जातो, याचा अर्थ म्हणजे एकमेकांभोवती योग्य अंतर राखून फिरणं. २००० सालाच्या दशकात चीनचे तत्कालीन पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी भारत-चीन नात्याला “स्पर्धक नव्हे, भागीदार” असं म्हटलं होतं. पण आजच्या घडीला ही भावना फक्त कागदावरच उरली आहे.

गलवानमधील संघर्ष

हिमालयातील ३,४८८ किलोमीटर लांब सीमारेषा या दोन्ही देशांमधील तणावाचं मुख्य कारण आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षात अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. ही घटना दोन्ही देशांमध्ये गेले अनेक दशके न घडलेला मोठा सैनिकी संघर्ष होता. त्यामुळे, एकीकडे सीमेवर तणाव आहे, तर दुसरीकडे दोन्ही देश ब्रिक्स, एससीओ, G-20 यांसारख्या बहुपक्षीय मंचांमध्ये सहकार्य करत आहेत.

सहकार्य व संघर्षाचे संतुलन

व्यापार क्षेत्रातही संबंध जरी तणावपूर्ण असले तरी, दोन्ही देशांचा आपसातील व्यापार वाढत आहे. २०२३ साली भारत-चीन व्यापाराच्या आकड्याने १३६ अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला. मात्र, भारताचा व्यापारी तोटा कायम आहे. भारताला तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स यासाठी चीनवर अवलंबून राहावं लागतं. यामुळे भारताने आता ‘मेक इन इंडिया’ ही स्थानिक उत्पादनाला चालना देणारी मोहीम हाती घेऊन पुरवठा साखळींचं विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला आहे. यामुळे भारत-चीनचं नातं एक वळण घेत आहे. सहकार्य आणि संघर्ष यामधील सूक्ष्म संतुलन राखण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भारत-अमेरिका व्यापारी चर्चांचा निर्णायक टप्पा

दुसरीकडे, भारत आणि अमेरिकेच्या व्यापारी संबंधांना सध्या नवीन आयाम मिळत आहेत. २०२४-२५ मध्ये भारत-अमेरिका व्यापार २०० अब्ज डॉलरच्या घरात पोहोचला आहे. मात्र, हा वाढता व्यापार तणावमुक्त नाही.

सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापारविषयक अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे:

कर आणि बाजारपेठेतील प्रवेश:

अमेरिका भारताकडून वैद्यकीय उपकरणं, शेतीमाल, दुग्धजन्य उत्पादने यावर सवलतींची अपेक्षा करत आहे. भारताला मात्र आयटी सेवा, वस्त्रोद्योग, आणि जेनेरिक औषधांना अमेरिकन बाजारात सुलभ प्रवेश हवा आहे.

डिजिटल व्यापार आणि डेटा लोकलायझेशन

अमेरिका भारताकडून डेटा लोकलायझेशनच्या नियमांमध्ये सवलत मागते आहे. भारतासाठी ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्याने तो सावध आहे.

बौद्धिक संपदा हक्क (IPR)

अमेरिकेच्या फार्मा कंपन्या भारताकडून अधिक कडक पेटंट संरक्षण मागत आहेत. भारताला वाटतं की, यामुळे त्याचा जेनेरिक औषधांचा उद्योग धोक्यात येईल.

ऊर्जा आणि महत्त्वाची खनिजे

अमेरिकेला भारताला हरित ऊर्जा पुरवठा साखळीत सामील करायचं आहे, पण त्यासाठी सवलती, मानकं आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कामगार आणि पर्यावरण मानके

अमेरिका आता व्यापार करारांमध्ये श्रम हक्क आणि पर्यावरण सवलतींवर भर देते, त्यामुळे भारताला स्पर्धात्मक धोका वाटतो आहे.

तरीही, दोन्ही देशांसाठी एकमेकांशी असलेली संरक्षणविषयक भागीदारी महत्त्वाची असल्याने मोठ्या प्रमाणावर संघर्ष होण्याची शक्यता कमी आहे. भारत आणि अमेरिका संरक्षण, क्वाड, अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढवत आहेत.

भारताची तारेवरची कसरत

भारताला एकाच वेळी चीनबरोबर स्पर्धा करायची आहे, अमेरिकेबरोबर भागीदारी वाढवायची आहे आणि त्याच वेळी आपली स्वतंत्र धोरणं टिकवायची आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. भारत कोणत्याही एका गटात सामील न होता, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहे.

भारत-चीनचं ‘ड्रॅगन-एलिफंट टँगो’ आणि भारत-अमेरिका व्यापार चर्चा हे वेगळे मुद्दे वाटत असले तरी, ते एकमेकांशी निगडित आहेत. जगात बदलत चाललेल्या सामरिक आणि आर्थिक समीकरणात भारताला यशस्वी व्हायचं असेल, तर त्याला याच संतुलनाच्या तारेवरून कसरत करत पुढे जावं लागेल. जगाच्या राजकारणाच्या या रंगमंचावर भारताच्या प्रत्येक पावलाकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.