मुंबई विमानतळावर विमान उतरत असताना एमिरेट्स कंपनीच्या एका विमानाच्या मार्गात फ्लेमिंगोंचा थवा आला. त्यामुळे सुमारे ३६ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला आणि विमानाचेही नुकसान झाले. परंतु, कोणतीही दुर्घटना न घडता हे एमिरेट्सचे विमान मुंबईत सुखरूपपणे उतरले. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नसून, गेल्या वर्षी अशा तब्बल १ हजार ३०० घटना घडल्या आहेत. गेल्या सहा वर्षांतील हा उच्चांक आहे. त्यामुळे विमानाला पक्ष्याची बसणारी धडक म्हणजेच बर्ड स्ट्राईक आणि त्यापासून निर्माण होणारा धोक्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच वेळी पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर झालेल्या नागरी अतिक्रमणाचा गंभीर मुद्दाही समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बर्ड स्ट्राईक का घडतात?

जगात विमानाला पहिल्यांदा पक्षी धडकण्याची म्हणजेच बर्ड स्ट्राईकची नोंद १९१२ मध्ये झाली. त्या वेळी अमेरिकेत विमानाला पक्ष्याची धडक बसल्याने ते खाली कोसळले होते. सर्वसाधारणपणे विमान हवेत उडत असताना त्याला पक्ष्यांची धडक बसण्याची शक्यता कमी असते. मात्र, विमानतळावरून उड्डाण करीत असताना अथवा उतरताना पक्ष्यांची धडक बसण्याचे प्रकार वारंवार घडतात. विशेषत: पावसाळ्यात या घटना वाढतात; कारण पावसाळ्यात विमानतळावरील मोकळ्या जागेत पाणी साचते आणि अनेक कीटकांची पैदास त्यात होते. यामुळे कीटक खाण्यासाठी पक्ष्यांचे थवे येऊ लागतात. याचबरोबर विमानतळाच्या शेजारी कचरा टाकला जात असेल, तर तिथेही पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. हे पक्षी जमिनीवर उतरताना अथवा हवेत झेपावताना विमानांच्या मार्गात येतात. त्यामुळे अपघात घडून सुरक्षा कारणास्तव विमान पुन्हा विमानतळावर न्यावे लागते. बर्ड स्ट्राईक टाळण्यासाठी विमानतळाच्या आवारात पक्षी येऊ नयेत म्हणून शिकारी पक्ष्यांचे आवाज, मोठे प्रकाशझोत, शिकारी पक्षी आणि ड्रोनचाही वापर केला जातो. नंतर पक्ष्यांना याची सवय होऊन ते पुन्हा विमानतळाच्या परिसरात शिरकाव करतात.

हेही वाचा >>>Pune Porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवता येईल का?

दुर्घटनेचा धोका किती?

पक्ष्यांची धडक विमानाला बसण्याच्या घटनांची नोंद केवळ भारतात नव्हे, तर जगभरात मोठ्या प्रमाणात होते. विमान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही अतिशय गंभीर बाब आहे. पक्ष्याची धडक विमानाला बसून अनेक दुर्घटना घडल्या असून, त्यात अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेचा विचार करता दर वर्षी तिथे १३ हजार बर्ड स्ट्राईक होतात. पक्ष्यांची धडक बसल्याने अपघात घडण्याचा धोका असला, तरी मोठी दुर्घटना घडण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक वेळा विमानाचे नुकसान होते अथवा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने विमान विमानतळावर उतरवावे लागते.

अमेरिकन एअरलाइन्सची घटना…

अमेरिकन एअरलाइन्सच्या एका विमानाने १५ जानेवारी २००९ रोजी न्यूयॉर्कमधील ला गॉर्डिया विमानतळावरून उड्डाण केले. पण लगेचच हंसांच्या एका थव्याने विमानाला धडक दिली. दोन्ही इंजिनांत अनेक हंस खेचले जाऊन भस्मसात झाले. पण यामुळे दोन्ही इंजिन बंद पडली आणि विमानामध्ये ‘पॉवर’च शिल्लक राहिली नाही. उड्डाणावस्थेत असल्यामुळे तात्काळ नजीकच्या एखाद्या विमानतळावर जाण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्या स्थितीत विमान हडसन नदीवर उतरवण्याचा पर्याय वैमानिकांनी स्वीकारला. यात जोखीम होती. तरी इतर पर्यायांमध्ये संपूर्ण प्राणहानी संभवत होती. अखेर विमान हडसन नदीवर उतरवून सर्व १५५ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात वैमानिकांना यश आले. मात्र यानिमित्ताने पक्ष्यांची धडक किती विध्वंसक ठरू शकते, हेदेखील दिसून आले. 

हेही वाचा >>>राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांना कसे नियुक्त केले जाते? काय नियम असतात?

हवाई क्षेत्राला फटका?

पक्ष्याची धडक बसल्यास विमानाचे नुकसान होते. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचा खर्च विमान कंपनीला करावा लागतो. याचबरोबर विमान अचानक खाली उतरवल्याने प्रवाशांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून द्यावी लागेल. याचा आर्थिक भुर्दंडही विमान कंपनीला सोसावा लागतो. अनेक वेळा विमानाच्या इंजिनच्या आतमध्ये पक्षी ओढला जातो. यामुळे इंजिनच्या पात्याचे नुकसान होऊन विमानाचा वेग कमी होतो. पक्षी जेवढा मोठा असेल तेवढे मोठे नुकसान इंजिनचे होते. त्यामुळे पर्यायाने विमान कंपनीचा दुरुस्तीचा खर्च आणखी वाढतो. काही वेळा इंजिन निकामी होण्याचे प्रकारही घडतात.

पक्ष्यांच्या अधिवासावर अतिक्रमण?

काही पर्यावरणवाद्यांनी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. वैमानिकाला रडारवर पक्ष्यांचा थवा दिसला नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पक्ष्यांच्या अधिवासावर झालेले नागरी अतिक्रमण यासारख्या घटनांसाठी कारणीभूत असल्याचा दावा पर्यावरणवादी करीत आहेत. नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा घटना मोठ्या प्रमाणात घडतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कारण खाडी आणि फ्लेमिंगोंचे निवासस्थान असलेला भाग बुजवून तिथे नवीन प्रकल्प उभे राहात आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या दृष्टिकोनातूनही याकडे पाहण्याची भूमिका पर्यावरणवादी मांडत आहेत.

उपाययोजना काय?

अनेक विमानतळांची रचना ही कबुतरांसह इतर पक्ष्यांना निवारा करता येईल, अशा प्रकारची असते. त्यामुळे विमानतळाची रचना करताना ही बाब विचारात घ्यायला हवी. पक्ष्यांना विमानतळाच्या इमारतीत निवारा मिळाल्यास त्यांची संख्या तिथे वाढत जाते. त्यातून त्यांचा वावर विमानतळाच्या परिसरात वाढून त्यांची विमानाला धडक बसण्याची शक्यता वाढते. एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विमानतळावर पक्ष्यांचा वावर असणे अपेक्षित नाही. याचबरोबर कबुतरांच्या विष्ठेमुळे उद्भवणाऱ्या सार्वजनिक आरोग्य समस्या आणि इतर उपद्रव सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे विमानतळाची रचना करतानाच या सर्व बाबी विचारात घ्यायला हव्यात. विमानतळाच्या दहा किलोमीटरच्या परिसरात कत्तलखाने नसावेत आणि कचरा टाकू नये, असा नियम असून, त्याचेही पालन होणे गरजेचे आहे, असे मत हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी व्यक्त केले.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emirates flight was hit by flamingos in mumbai print exp amy
First published on: 23-05-2024 at 07:30 IST