पेट्रोलियम-निर्यातदार देशांच्या ओपेक (The Organization of the Petroleum Exporting Countries) या संघटनेने तसंच रशियासहित अन्य तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनात ५० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीनंतर ओपेकसह इतर देशांनी जुलै ते ऑगस्ट महिन्यात दैनंदिन तेल उत्पादनात वाढ केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ही वाढ ४.३२ लाख बॅरलवरुन ६.४८ लाख बॅरल करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनानंतर ओपेक कच्च्या तेलाच्या किमती जास्त राहाव्यात यासाठी मागणीपेक्षा कमी वेगाने उत्पादन वाढवत होतं. मात्र आता या निर्णयानंतर आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतीत दिलासा मिळू शकतो, असं मानलं जात आहे.

महागड्या कच्च्या तेलामुळे विकासाला धोका

जगभरात वाढत्या महागाईच्या मुख्य कारणांपैकी एक कारण कच्च्या तेलाचे वाढलेले भाव असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक देश असणाऱ्या रशियाकडून कमी उत्पादन घेतलं गेल्याने तसेच युद्धामुळे पुरवठा साखळी (सप्लाय चेन) खंडित झाल्यामुळे कच्चे तेल महाग होत आहे. जेणेकरुन जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची आणि विकास खुंटण्याची भीती सतावत होती. अशा परिस्थितीत भारत, जपान, अमेरिका या तेल खरेदी करणाऱ्या मुख्य देशांच्या विकासावर विपरीत परिणाम होत होता.

तेल उत्पादन वाढवण्यासाठी अमेरिकेचा दबाव

न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, युरोपियन देशांनी रशियाकडून तेलखरेदी बंद करावी यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. जेणकेरुन रशियाचं आर्थिक कंबरडं मोडलं जाऊ शकतं. यासाठी अमेरिका वारंवार ओपेक देशांवर तेल उत्पादन वाढवण्यासाठी दबाव टाकत आहे. याचसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन लवकरच सौदी अरबचा दौरा करणार असल्याचंही बोललं जात आहे.

भारतामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का?

ओपेक देश जुलै महिन्यापासून तेलाच्या उत्पादनात वाढ करणार आहेत. याचा परिमाण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर किती होईल हे सांगणं सध्या कठीण आहे. मात्र उत्पादन वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.

३० टक्क्यांपर्यंत वाढली कच्च्या तेलाची किंमत

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत ३० टक्क्यांची वाढ पाहण्यास मिळाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत १२० डॉलरच्या (भारतीय चलनानुसार ९ हजार ३८१ रुपये) आसपास आहे. एक बॅरलमध्ये जवळपास १५९ लिटर पेट्रोल असतं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained opec plus countries to increase oil production know what effect on petrol prices india sgy