शैलजा तिवले
कर्करोग उपचारासाठी केमो उपचारपद्धती, रेडिएशन उपचारपद्धती अशा विविध उपचारपद्धतींचा वापर केला जातो. यातील प्रोटॉन थेरपी कर्करोगाच्या पेशींना मारण्यासाठी प्रभावी उपचार पद्धती आहे. परंतु ती अजून मर्यादित ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे तिचा फायदा सर्व रुग्णांना घेणे शक्य झालेले नाही. मुंबई महानगरपालिका मुंबईतील कर्करोगबाधित रुग्णांसाठी ही उपचार पद्धती लवकरच उपलब्ध करून देणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रोटॉन थेरपी म्हणजे काय?

कर्करोगाच्या पेशींची अमर्याद वाढ थोपविण्यासाठी किंवा या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिएशन उपचारपद्धतीचा वापर केला जातो. प्रोटॉन उपचार हा रेडिएशन उपचारपद्धतीचाच एक भाग असून याला प्रोटॉन बीम थेरपी असेही म्हटले जाते.

रेडिएशन आणि प्रोटॉन थेरपीमध्ये काय फरक आहे?

रेडिएशन म्हणजे कर्करोगाच्या पेशी क्ष किरणांच्या माध्यमातून नष्ट करण्याची किंवा त्यांची वाढ रोखण्याची पद्धती. रेडिएशनच्या माध्यमातून सोडलेल्या क्ष किरणांमुळे कर्करोगाच्या पेशींसह त्याच्या जवळील अन्य चांगल्या पेशीही नष्ट होतात किंवा त्यांच्यावर परिणाम होतो. त्यामुळे रेडिएशनचे दुष्परिणामही मोठ्या प्रमाणात दिसतात. सध्या रेडिएशनच्या विविध पद्धती उपलब्ध असून प्रोटॉन ही यातील एक नवी पद्धती आहे. प्रोटॉन थेरपीमध्ये क्ष किरणांऐवजी प्रोटॉनचा वापर करून कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. प्रोटॉनचे एक वैशिष्ट्य म्हणजे कर्करोगाच्या पेशी ज्या भागात आहेत किंवा ज्या गाठीमध्ये आहेत, त्याच गाठीला लक्ष्य करून ही थेरपी देणे शक्य आहे. त्यामुळे सर्वसाधारण रेडिएशनप्रमाणे कर्करोगाच्या पेशीव्यतिरिक्त शरीरातील अन्य पेशींवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे रेडिएशनमुळे होणारे दुष्परिणाम या उपचारपद्धतीने टाळणे शक्य आहे.

प्रोटॉन थेरपी काम कशी करते?

प्रोटॉन थेरपी देण्यासाठी सायक्लोट्रॉन या यंत्राचा वापर केला जातो. यामध्ये प्रोटॉनची गती वाढविली जाते जेणेकरून त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल. या ऊर्जेच्या माध्यमातून शरीरात ज्या भागामध्ये कर्करोगाच्या पेशी आहेत तेथे हे प्रोटॉन सोडले जातात. यामुळे कर्करोगाच्या पेशींनाच लक्ष्य करून ही थेरपी दिली जाते.

कोणत्या प्रकारच्या कर्करोगांसाठी ही थेरपी प्रभावशाली आहे?

रेडिएशनचे सर्वाधिक दुष्परिणाम बालकांमध्ये होत असून त्यांच्या शरीरातील स्नायू, हाडे, मेंदू, हृदय यांच्या विकास आणि वाढीमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शरीरातील कर्करोग पेशींना लक्ष्य करून नष्ट करणारी प्रोटॉन थेरपी बालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये निर्माण झालेल्या आणि ज्यांचा प्रसार झालेला नाही अशा कर्करोगाच्या गाठींवर प्रोटॉन थेरपी फायदेशीर आहे. उदाहरणार्थ मेंदू, मज्जारज्जू, डोळे. हाडे आणि मऊ ऊती, डोके आणि मान, हृदय, वृषण इत्यादी अवयवांमधील कर्करोगांच्या गाठीवर या थेरपीचा वापर केला जातो.

ही थेरपी भारतात सध्या कोठे उपलब्ध आहे?

जगभरात ३५ हून अधिक ठिकाणी ही थेरपी उपलब्ध असून भारतात सध्या चेन्नईतील अपोलो रुग्णालय आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या खारघर येथील रुग्णालयात उपलब्ध आहे.

ही उपचारपद्धती खर्चिक आहे का?

ही उपचार पद्धती देण्यासाठी यंत्रे, उपकरणे अत्यंत महागडी आहेत. त्यामुळे ही थेरपी मर्यादित ठिकाणी उपलब्ध आहे. यासाठी सुमारे दोन लाखांहून अधिक खर्च येतो.

मुंबईत ही उपचार पद्धती उपलब्ध होणार आहे का?

कर्करोगाचे प्रमाण वाढत असून ही उपचार पद्धती मुंबईत उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना याचा फायदा घेता येत नाही. मुंबईच्या रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिकेने प्रोटॉन उपचारपद्धती उपलब्ध करून देण्याचा निर्णय हाती घेतला आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या आराखडा नियोजनाचे कामकाज सध्या सुरू असून सल्लागाराच्या मदतीने याचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी आवश्यक यंत्राच्या निविदा पुढील महिनाभरात काढल्या जाणार असून लवकरच ही सुविधा मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is proton therapy on cancer treatment print exp 0522 abn