नवीन वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये भारतात नोकरीच्या संधी आणि रोजगार वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. अनेक कंपन्यांनी केलेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणांवर नजर टाकल्यास भारतात रोजगारनिर्मितीला अच्छे दिन येणार असल्याचे चित्र दिसत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या कालावधीमध्ये कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांनी आता पुन्हा नोकरभरती सुरु केली आहे. सर्वच क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आता नोकरभरती सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असणाऱ्या उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेक निर्बंध आणि करोना लॉकडाउनमुळे अनेक कंपन्यांनी मोठी कर्मचारी कपात केली होती. मात्र आता परिस्थिती हळूहळू सामान्य होत असतानाच आर्थिक उलाढालीही वाढल्या आहेत. त्यामुळेच कंपन्यांनाही आता नव्याने नोकरभरतीसाठी कंबर कसली आहे. भारतामध्ये लवकरच लसीकरण सुरु होणार असल्याने परदेशी कंपन्यांनीही आता नव्या जोमाने नोकरभरती करण्यास सुरुवात केली असून सर्व काही लवकरच पूर्ववत होईल अशी अपेक्षा उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि सर्वच क्षेत्रांना आहे. मागील महिन्यामध्ये मॅन पॉवर ग्रुप इंडियाने जारी केलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशातील सर्वच क्षेत्रातील मोठ्या कंपन्या नव्याने नोकरभरती करण्यासाठी उत्सुक आहेत. देशभरातील १५०० हून अधिक कंपन्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर ही आकडेवारी तयार करण्यात आली होती.

या शहरांमध्ये सर्वाधिक नोकऱ्या

त्याचप्रमाणे द इकनॉमिक टाइम्सने दोन सर्वेक्षणांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार सर्वच क्षेत्रांमध्ये देशातील सर्वच प्रदेशांमधील कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याच्या तयारीत आहेत. टू आणि थ्री टीयर शहरे म्हणजेच दुय्यम आणि तृतीय स्तरावरील शहरे ही  पांढरपेशी क्षेत्रातील (व्हाइट कॉलर प्रोफेशनल्स) नोकऱ्यांच्या संधीसाठी महत्वाची ठरतील असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. व्हाइट कॉलर प्रोफेश्नल्सला ब्लू कॉलर प्रोफेश्नल्सपेक्षा सरासरी चांगला पगार आणि नोकरीसंदर्भातील अधिक सुरक्षा मिळते. याचप्रमाणे टीमलीजच्या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या २७ टक्के कंपन्यांनी २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये नोकरभरती करण्यासाठी आमचं प्राधान्य असेल असं सांगितलं आहे. या सर्वेक्षणामध्ये २१ वेगवेगळ्या क्षेत्रांमधील ८०० कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

…बदलाचे मुख्य कारण ठरणार

अन्य एका सर्वेक्षणामध्ये टू टीयर सीटी म्हणजेच दुय्यम स्तरातील शहरांमध्ये (मेट्रो शहरांनंतर राज्यातील सर्वात महत्वाची शहरे) नोकरीच्या संधी २०२० च्या डिसेंबर महिन्यामध्ये जूनच्या तुलनेत ६२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. याच आकडेवारीच्या आधारे पुढील काही महिन्यांमध्ये हाच ट्रेण्ड आणखीन मोठ्या प्रमाणात दिसून येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील करोनाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे, करोनाचे लसीकरण सुरु होणार असल्याने कंपन्यांना परिस्थिती पूर्ववत होण्याची अपेक्षा असल्याने पहिल्या तीन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात नोकरभरती करुन घेण्याकडे कंपन्यांचा कल असल्याचे सर्वेक्षणाच्या आकडेवारीमधून दिसून येतं. करोना लसीकरणाला होणार सुरुवात ही नोकऱ्यांसाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आशादायी चित्र निर्माण करत असल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

आणि एप्रिलमध्ये…

देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात ड्राय रन म्हणजे सराव मोहिमा करुन झाल्यानंतर १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. सामान्यपणे जानेवारी ते मार्च दरम्यान अनेक कंपन्या नव्याने कर्माचारी भरतीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेताना दिसतात. त्यातच आता याच कालावधीमध्ये करोना लसीकरणाच्या माध्यमातून याच नोकरभरतीला एक प्रकारे चालना मिळणार आहे. करोना लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये नोकरभरती उच्चांक गाठेल असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. देशातील बेरोजगारीसंदर्भात चिंता व्यक्त केली जात असतानाच या सर्वेक्षणांमधून आणि सर्वच आकडेवारीवरुन पुढील काळ हा अधिक आशादायक आणि उत्सहावर्धक असण्याचे संकेत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये बेरोजगादीचा दर ९.१ टक्क्यांहून अधिक वधारला होता. मात्र आता लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्याच जोमाने अर्थचक्र फिरवण्याच्या उद्देशाने अनेक कंपन्या २०२० मध्ये बंद केलेली नोकरभरती पुन्हा सुरु करणार आहेत.

पगारवाढीचेही संकेत

अनेक बड्या कंपन्या केवळ नव्याने नोकरभरतीच नाही तर पगारवाढ आणि बढती देण्याचाही विचार करत आहे. २०२० मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी पगारकपात केल्यानंतर यंदाच्या वर्षी मागील वर्षी झालेला तोटा भरुन काढण्याच्या दृष्टीने पगारवाढ देण्याचा प्रयत्न केला जाईल असा अंदाज आहे. जागतिक स्तरावर काम करणाऱ्या एओएन या कंपनीच्या आकडेवारीनुसार ८७ टक्के कंपन्यांनी यंदा आम्ही पगारवाढ देण्याची तयार करत असल्याचे म्हटले आहे. यंदा भारतीय कंपन्या सरासरी ७.३ टक्के पगारवाढ देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०२० साली भारतातील कंपन्यांनी सरासरी ६.१ टक्के पगारवाढ दिली होती. २००९ नंतर ही सर्वात कमी सरासरी पगारवाढ होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why india inc is planning to hire more in first 3 months of 2021 scsg