कॅनडामधील भारतीय आणि तेथे जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी, अशी सूचना शुक्रवारी भारताच्या परराष्ट्र खात्याकडून जारी करण्यात आली आहे. कॅनडामध्ये सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया, भारतीयांबद्दलच्या द्वेषातून होणारे गुन्हे तसेच पंथीय हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाल्याने भारतीयांनी तेथे दक्षता बाळगावी, असे या सूचनेत म्हटले आहे. तसेच, भारतीयांविरोधात घडणाऱ्या या घटनांबाबत तेथील भारतीय दूतावास आणि उच्चायुक्तालयाने कॅनडा सरकारच्या संबंधित विभागांना माहिती दिली असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीयांविरोधात घडलेल्या अशा गुन्ह्यांच्या प्रकरणात अद्याप आरोपींवर खटले दाखल झालेले नाहीत, असेही भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. हे लक्षात घेता तेथील भारतीय नागरिक, भारतातून गेलेले विद्यार्थी आणि कॅनडात जाण्याचा बेत असलेले भारतीय नागरिक- विद्यार्थी यांनी दक्ष राहावे. कॅनडातील भारतीयांनी आपली माहिती ओट्टावा येथील भारतीय उच्चायुक्तालय किंवा टोरंटोतील भारतीय दूतावासाचे संकेतस्थळ किंवा मादाद पोर्टल (madad.gov.in) वर नोंदवावी, असे आवाहनही परराष्ट्र खात्याने केले आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना या भारतीय नागरिकांशी संपर्क साधणे शक्य होईल.

कॅनडामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. मंदिरांची तोडफोड आणि लुटमार करण्यात आल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. कॅनडामधील ‘खलिस्तानी सार्वमत’ आणि मंदिराच्या तोडफोडीच्या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र खात्याकडून ही सूचना करण्यात आली आहे.

भारताने कॅनडातील “तथाकथित खलिस्तानी सार्वमत” वर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की, मित्र देशात कट्टरपंथी आणि अतिरेकी घटकांना अशा राजकीय प्रेरित क्रियाकलापांना परवानगी देणे “अत्यंत आक्षेपार्ह” आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकारांना सांगितले की, भारताने हे प्रकरण राजनैतिक माध्यमांद्वारे कॅनडाच्या प्रशासनाकडे मांडले आहे आणि हा मुद्दा पुढेही उचलत राहील. त्यांनी तथाकथित खलिस्तानी सार्वमताला खोटा अभ्यास म्हटले. या संदर्भात त्यांनी तेथे झालेल्या हिंसाचाराचाही संदर्भ दिला.

बागची म्हणाले की, कॅनडाने भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याबाबत बोलले आहे, परंतु मित्र देशात कट्टरपंथी आणि अतिरेकी घटकांना अशा राजकीय हेतूने प्रेरित क्रियाकलापांना परवानगी दिली जात आहे हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why mea has asked indians in canada to be alert msr
First published on: 25-09-2022 at 20:44 IST