सिद्धार्थ खांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएल लिलावामध्ये मुंबईकर श्रेयस अय्यरसाठी अपेक्षेप्रमाणे कोटींच्या कोटी बोली लागत गेल्या. काहींना अपेक्षा होती त्याप्रमाणे त्याला १५ कोटींची मजल मारता आली नाही. तरी १२.२५ म्हणजे सव्वाबारा कोटींची कोलकाता नाइट रायडर्सनी त्याच्यासाठी लावलेली बोली आयपीएल इतिहासात मोजक्याच भारतीय क्रिकेटपटूंना लाभलेली आहे.

१२ कोटींच्या वर मोजकेच भारतीय क्रिकेटपटू…

आयपीएल बोली २०२२च्या पहिल्या दिवसापर्यंत केवळ २. युवराज सिंगला २०१४मध्ये १४ कोटी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु) आणि २०१५मध्ये १६ कोटी (दिल्ली डेअरडेव्हिल्स) अशा बोली लागल्या. दिनेश कार्तिकसाठी २०१४मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सनी १४ कोटी रुपये मोजले होते. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, त्यानंतर प्रदीर्घ काळ भारतीय खेळाडूसाठी फ्रँचायझींनी इतके पैसे ओतलेले नाहीत.

शिवाजी पार्कवर सापडला…

विख्यात माजी फलंदाज आणि प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी शिवाजी पार्कवर श्रेयस अय्यरला प्रथम हेरले. अस्सल दादरकर, मुंबईकर फलंदाजांत दिसणारी तंत्रशुद्ध फलंदाजी आणि बेडर वृत्ती हे गुण श्रेयसमध्ये त्यांना पुरेपूर आढळले.

स्थानिक क्रिकेटमध्ये झळाळती कारकीर्द…

५६ रणजी सामन्यांमध्ये श्रेयसची फलंदाजी सरासरी ५२.१० आहे. आक्रमक फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्य. त्याचे हेच गुण हेरून दिल्ली डेअरडेव्हिल्सनी त्याच्यासाठी २०१५मध्ये २.६० कोटी रुपये मोजले. विशेष म्हणजे त्यावेळी त्याची मूळ किंमत १० लाख रुपये होती. त्यावेळचा तो सर्वांत महागडा नवखा (अनकॅप्ड) क्रिकेटपटू ठरला होता. श्रेयसने पहिल्याच रणजी हंगामात ५०.५६च्या सरासरीने ८०९ धावा केल्या होत्या. २०१५-१६मध्ये याहूनही सरस कामगिरी करताना त्याने ७३.३९च्या सरासरीने १३२१ धावा कुटून काढल्या. पहिल्या आयपीएल हंगामात डेअरडेव्हिल्सकडून सलामीला फलंदाजी करताना श्रेयसने ४३९ धावा केल्या. अमरे दिल्लीचे सहायक प्रशिक्षक होते आणि त्यांच्याच आग्रहास्तव श्रेयस दिल्लीला आला. रणजी आणि आयपीएल या दोन्ही स्पर्धांमध्ये पदार्पणातच श्रेयसने त्याची गुणवत्ता दाखवून दिली.

भारतीय संघात संधी

सलामी आणि मधली फळी अशा दोन्ही जागांवर भारतीय संघात गेली काही वर्षे उत्तम फलंदाज खेळले, त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी त्याला थोडी प्रतीक्षा करावी लागली. परंतु आता कसोटी संघातील मधल्या फळीचे फलंदाज अस्थिर झाले आहेत आणि एकदिवसीय संघातही विशेषतः चौथ्या क्रमांकावर भरवशाचा फलंदाज न खेळवण्याचा मोठा फटका भारतीय संघाला २०१९ विश्वचषक स्पर्धेत बसला  होता. या दोन्ही प्रकारांमध्ये श्रेयस उत्तम योगदान देऊ शकेल, अशी त्याची सुरुवातीची कामगिरी दर्शवते. 

आयपीएलमध्ये स्टार फलंदाज…

२०१५ नंतर २०१६मधील हंगामात श्रेयसची कामगिरी फारशी चांगली नव्हती. पण २०१७मध्ये त्याला पुन्हा सूर गवसला आणि २०१८च्या हंगामाच्या मध्यावर गौतम गंभीरने राजीनामा दिल्यानंतर श्रेयस दिल्लीचा कर्णधार बनला. २३व्या वर्षी तो दिल्लीचा सर्वांत युवा, तर आयपीएलमध्ये तोपर्यंत चौथा सर्वांत युवा कर्णधार होता.

कोलकाताचे नेतृत्व नक्की आणि भारताचे…?

२०१९मधील आयपीएल हंगामात श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्ली सात वर्षांत प्रथमच प्ले-ऑफ स्तरावर पोहोचली. २०२०मध्ये तर दिल्लीला त्याने अंतिम फेरीपर्यंत नेले. २०२१चा बराचसा हंगाम त्याला दुखापतीमुळे सोडावा लागला. कोलकातामध्ये सुनील नरैन, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती हे कर्णधार मूळ संघात कायम आहेत. त्यांच्यापैकी कोणी कर्णधार होईल असे दिसत नाही. त्यामुळे ती जबाबदारी श्रेयसवरच सोपवली जाईल, कारण दोन पूर्ण आयपीएल हंगामांमध्ये त्याच्या नेतृत्वाची झलक दिसली होती. आंतरराष्ट्रीय टी-२०, एकदिवसीय आणि आता कसोटी संघातही स्थिरावण्याची संधी २७ वर्षीय श्रेयसकडे चालून आली आहे. त्याचे वय, गुणवत्ता, यशाची भूक आणि नेतृत्वगुण पाहता, सातत्य राखल्यास तिशीच्या आसपास भारतीय  कर्णधार होण्याची क्षमता त्याच्यात नक्कीच दिसते. आयपीएलमध्ये सव्वाबारा कोटीची बोली त्याच्या कारकीर्दीच्या दुसऱ्या गियरची नांदी ठरावी.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explainedipl mega auction 2022 shreyas iyer most expensive so far as kkr abn 97 prin exp 0222
First published on: 12-02-2022 at 15:49 IST