इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अर्थात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (आयएसएस) अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर पृथ्वीवर कधी परतणार याची तारीख अद्याप निश्चित नसली तरी अमेरिकन अंतराळ संस्था, नासाने नुकतेच जाहीर केले की त्यांना परत येण्यासाठी फेब्रुवारी २०२५ पर्यंत विलंब होऊ शकतो. सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर जूनपासून अवकाशात अडकले आहेत. दोन्ही अंतराळवीर बोईंग स्टारलाइनर या व्यावसायिक अवकाशयानाने ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. अंतराळातील त्यांचे मिशन केवळ १० दिवसांचे होते, परंतु स्टारलाइनरमधील बिघाडामुळे ते गेल्या दीड महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. आता त्यांना जवळपास आठ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात राहावे लागणार आहे, अशा प्रदीर्घ मोहिमेचा अंतराळवीरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, हे जाणून घेऊ. अंतराराळात किरणोत्सर्गाचा धोका? आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक सुसज्ज प्रयोगशाळा, राहण्याची सोय, झोपण्यासाठी योग्य व्यवस्था आणि अगदी व्यायामशाळेने सुसज्ज असले तरी, स्वत:च्या मूळ ग्रहावर मिळणाऱ्या संरक्षणापासून दूर असलेले कृत्रिम वातावरण नेहमीच आव्हानात्मक ठरते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या कक्षेत ‘आयएसएस’मध्ये अंतराळवीर गेल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाद्वारे आणि चुंबकीय क्षेत्राद्वारे हानिकारक सौर विकिरणांपासून केले जाणारे संरक्षण त्यांना मिळत नाही. दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळ, आयएसएस एका ठरावीक अंतरावरून फिरते तेथे किरणोत्सर्गाची पातळी पृथ्वीवरील किरणोत्सर्गापेक्षा ३० पट जास्त आहे. म्हणजेच आयएसएसवर एका आठवड्यात, अंतराळवीरांना पृथ्वीवरील एक वर्षाच्या समान किरणोत्सर्गाचा अनुभव येतो. म्हणजेच अंतराळवीरांना ५० ते २० हजार मिलि-सिव्हर्ट्स (mSv) पर्यंतच्या किरणोत्सर्गाच्या क्षमतेचा सामना करावा लागतो. मिलि-सिव्हर्ट हे किरणोत्सर्ग मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे. छातीचे तीन एक्स रे काढण्यासाठी एक मिलि-सिव्हर्ट्स किरणोत्सर्गाचा वापर केला जातो. यावरून अंतराळवीरांना किरणोत्सर्गाचा असणारा धोका लक्षात येतो. हेही वाचा.Bangladesh 1971: चार लाख महिलांवर बलात्कार, ३० लाख मृत्यू; बांगलादेश पुन्हा त्याच वाटेवर आहे का? काय सांगतो इतिहास? किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम काय? किरणोत्सर्गाच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. तसेच ऊतींचा ऱ्हास होऊ शकतो आणि मज्जासंस्थेचे नुकसान होते. किरणोत्सर्गाच्या उच्च क्षमतेमुळे लिम्फोसाइट्स पेशींचे नुकसान होते. या पेशी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाच्या असतात. यामुळे अंतराळवीरांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यांच्या शरीरात वेगाने सूक्ष्मजंतूची वाढ होऊन त्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. शून्य गुरुत्वाकर्षणाचाही प्रभाव? अंतराळातील दुसरी प्रमुख समस्या म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किंवा शून्य गुरुत्वाकर्षणाचा दीर्घकाळ संपर्क. आपण पृथ्वीवर असताना सतत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असतो. आपले शरीर याविरुद्ध सतत एक प्रकारचा लढा देत असते किंवा त्याविरुद्ध कार्यरत असते. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात दीर्घकालीन राहिल्याने हा लढाच बंद होतो. यामुळे हाडे आणि स्नायूंचे नुकसान होऊ शकते. यामुळे अंतराळवीरांची कार्यक्षमता बिघडू शकते. दुखापतीचा धोका वाढतो. त्यांची हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली मंद होऊ शकते. मानवी शरीरात मुख्यतः द्रवपदार्थ असतात. गुरुत्वाकर्षण शरीराच्या खालच्या अर्ध्या भागामध्ये द्रवपदार्थ साठवण्यास भाग पाडते. ही परिस्थिती संतुलित करण्यासाठी आपल्या शरीरात अनेक प्रणाली आहेत. परंतु जेव्हा शून्य गुरुत्वाकर्षण असते तेव्हा शरीराच्या वरच्या अर्ध्या भागात द्रवपदार्थांचे पुनर्वितरण होते, किंवा वरच्या भागात ते ढकलले जातात. अंतराळवीरांमध्ये दिसणाऱ्या फुगलेल्या चेहऱ्यामागचे रहस्य हेच आहे. यामुळे अंतराळवीरांमध्ये आवाज बदलतो, वास, चव आणि संतुलन गमावण्याचा धोका असतो. दीर्घकाळ अंतराळयानामध्ये अडकून पडलो असण्याचे विचार अनेकदा मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवतात. एकटेपणा आणि जगण्यासाठीची नवनवीन आव्हाने अनेकदा मानसिक संतुलन बिघडवू शकतात. हेही वाचा.Earthquake In Japan: जपानने पहिल्यांदाच दिला महाभूकंपाचा इशारा; याचा नेमका अर्थ काय? सुटका करण्यासाठी कोणते उपाय? बोईंग स्टारलाइनर दुरुस्त करण्यात अपयश आले तरी नासाकडे अंतराळवीरांना वाचवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. नासाकडे स्पेस एक्सद्वारे चालवले जाणारे पूर्णपणे कार्यरत ड्रॅगन अंतराळयान तर आहेच, परंतु ते अंतराळवीरांना वाचवण्यासाठी रशियन अंतराळ एजन्सी Roscosmos ची मदतदेखील घेऊ शकतात. मात्र, सध्या अमेरिका आणि रशियाचे संबंध खालावले असल्यामुळे यासाठी बऱ्याच तांत्रिक आणि राजकीय बाबींना सामोरे जावे लागणार आहे. अंतराळवीरांनी दीर्घकाळ अंतराळात व्यतीत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. रशियन अंतराळवीर व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांनी ‘मीर’ अंतराळ स्थानकावर सलग ४३७ दिवस व्यतीत केले. पृथ्वीवर परतल्यावर त्यांनी स्पेस कॅप्सूलपासून त्याच्या खुर्चीपर्यंत थोडे अंतर चालण्याचा पर्याय निवडला. यातून पृथ्वीपासून दीर्घ कालावधीच्या प्रवासानंतर मानव काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. pradnya.talegaonkar@expressindia.com