Pink diamond theft हिरे हे अत्यंत महाग असतात हे सर्वज्ञात आहे. मात्र, जगातल्या सगळ्यात दुर्मीळ हिऱ्याच्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दुबईमध्ये ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी तब्बल २१८ कोटींच्या गुलाबी हिऱ्याची (पिंक डायमंड) चोरी केली. ही चोरी अगदी फिल्मी स्टाईलने झाल्याने सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, अवघ्या आठ तासांत पोलिसांना हा हिरा सापडला. नक्की ही घटना काय आहे? २१८ कोटींच्या हिऱ्याची चोरी नक्की झाली कशी? जाणून घेऊयात.
२१८ कोटींच्या हिऱ्याची चोरी
- दुबईमध्ये दिवसाढवळ्या गुलाबी हिऱ्याची चोरी झाली. काही तासांसाठी सर्वांना असे वाटले की, हा हिरा आता कधीच सापडणार नाही. मात्र, पोलिसांनी आठ तासांच्या आत हिऱ्याचा शोध घेतला.
- दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अत्यंत दुर्मीळ हिरा एका व्यापाऱ्याकडून चोरट्यांच्या एका गटाने चोरला.
- हे चोरटे या चोरीची योजना एक वर्षापेक्षा जास्त काळापासून आखत होते.
- दुबई पोलिसांच्या सतर्कतेने गुन्हेगारांचा काही तासांतच शोध घेण्यात आला आणि तो हिरा त्याच दिवशी सुरक्षितपणे परत मिळवण्यात आला.
चोरी नक्की झाली कशी?
तपासादरम्यान, दुबई पोलिसांनी हे शोधून काढले की, अनेक महिन्यांपासून चोरीची पूर्वतयारी केली जात होती. एका श्रीमंत खरेदीदाराचा वेश धारण करून, संशयितांनी त्या हिरा व्यापाऱ्याशी संपर्क साधला. हा हिरा व्यापारी युरोपमधून हा दुर्मीळ हिरा घेऊन आला होता. पोलिसांनी सांगितले की, या गटाने या चोरीसाठी एक वर्षापेक्षा जास्त काळ काम केले होते आणि व्यापाऱ्याचा विश्वास संपादित करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले होते.
पोलिसांच्या निवेदनात सांगण्यात आले, “विश्वास प्रस्थापित करण्यासाठी संशयितांनी आलिशान गाड्या भाड्याने घेऊन आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये बैठका आयोजित करून स्वतःला श्रीमंत व्यक्ती असल्याचे दाखवले. व्यापाऱ्याला हिरा आणण्यास त्यांनी पटवून दिले आणि त्यामुळे त्यांना तो चोरणे शक्य झाले.” मुख्य म्हणजे त्यांनी हिऱ्याची तपासणी करण्यासाठी एका हिरा तज्ज्ञालाही नियुक्त केले. त्यामुळे व्यापाऱ्याचाही विश्वास बसला आणि त्यालाही ते खरे खरेदीदार असल्याचे वाटले.
चोरांनी ज्या हिऱ्याची चोरी केली, त्याची किंमत तब्बल २५ दशलक्ष डॉलर्स आहे म्हणजेच जवळपास हा हिरा २१८ कोटींचा आहे. त्याचे वजन २१ कॅरेटपेक्षा जास्त आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा हिरा इतका दुर्मीळ आहे की, असा दुसरा हिरा मिळण्याची शक्यता फक्त ०.०१ टक्का होती. अखेरीस संशयितांनी व्यापाऱ्याला व्यवहार पूर्ण करण्याच्या बहाण्याने एका व्हिलामध्ये आमंत्रित केले आणि सापळा रचला. जसा हिरा बाहेर काढला गेला, तसा त्यांनी तो हिसकावून घेतला आणि ते पळून गेले. दुबई मीडिया ऑफिसने जारी केलेल्या एका कॉलमध्ये घाबरलेल्या आवाजात एक व्यक्ती बोलत असल्याचे समजते. “मी एका समस्येत अडकलो आहे. मी एका ग्राहकाला हिरा विकण्यासाठी भेटायला आलो होतो. त्यांनी तो हिरा पाहिला आणि आता तो चोरीला गेला आहे,” असे व्यापारी म्हणताना दिसत आहे.
पोलिसांनी हिऱ्याचा शोध कसा घेतला?
दुबई गेल्या काही जागतिक हिरा व्यापारासाठी एक प्रमुख केंद्र म्हणून स्थापित झाले आहे.
पोलिसांनी चोरी झाल्यानंतर तातडीने कारवाईला सुरुवात केली. या चोरीच्या काही तासांतच, तपासकर्त्यांनी तीन संशयितांची ओळख पटवली. त्या हिऱ्याची तस्करी देशाबाहेर होऊ नये म्हणून ‘पिंक डायमंड’ ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी विशेष पथके तयार केली. या पथकांच्या मदतीने संशयितांच्या प्रत्येक हालचालीचा मागोवा घेण्यात आला. त्यासाठी पाळत ठेवणारी साधने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला.
तपासामध्ये प्रगती करीत आठ तासांपेक्षा कमी वेळेत आशियाई देशातील तीन पुरुषांना अटक करून, हिरा परत मिळवला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. “तज्ज्ञ आणि प्रादेशिक पथकांचे प्रयत्न आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमता तंज्ञज्ञानाच्या साह्याने ही मोहीम यशस्वी झाली,” असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. स्वतः ज्वेलर्सने सांगितले की, पोलिसांच्या प्रतिसादाचा वेग पाहता, आश्चर्य वाटले.
व्यापारी म्हणाला, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच दिवशी सकाळी पोलिसांनी त्यांना फोन करून सांगितले की, संशयितांना अटक करण्यात आली आहे आणि हिरा परत मिळवण्यात आला आहे.” त्याने इतर व्यापाऱ्यांना दुबईच्या सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. दुबई मीडिया ऑफिसने जारी केलेल्या फुटेजमध्ये अटक केलेल्या संशयितांचे अस्पष्ट चेहरे दाखवले आहेत. त्याबरोबरच चोरीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील आहे. पोलिसांनी सांगितले की, या कारवाईमुळे शहराच्या बाजारपेठांमध्ये सुरक्षा आणि विश्वास कायम ठेवण्याची आमची वचनबद्धता सिद्ध झाली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
जगातील दुर्मीळ हिरे
हिरे अनेक रंगांमध्ये आढळतात आणि हे हिरे जगातील सर्वांत दुर्मीळ आणि मौल्यवान रत्नांपैकी एक आहेत. लाल हिरा हा सर्वांत दुर्मीळ हिरा आहे आणि जगात असे अंदाजे फक्त ३० हिरे आहेत. निळा हिरा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत दुर्मीळ हिरा आहे. कारण- तो फक्त ऑस्ट्रेलिया, भारत व दक्षिण आफ्रिकेत खाणकाम करून काढला जातो. जगातील ९० टक्के गुलाबी हिरे पश्चिम ऑस्ट्रेलियातील किम्बर्ले प्रदेशातील आर्गिल खाणीतच आढळतात. जुलै २०२२ मध्ये गेल्या ३०० वर्षांतील सर्वांत मोठा गुलाबी हिरा अंगोलातील एका खाणीत सापडला आहे आणि त्याचे वजन तब्बल १७० कॅरेट आहे. त्याला ‘लुलो रोज’, असे नाव देण्यात आले आहे. गुलाबी हिऱ्याची दुर्मीळता निळ्या हिऱ्यांसारखीच असली तरी गुलाबी हिरे विशेषत: अधिक महाग असतात.