नेदरलँड्समधील संग्रहालयातून २४५० वर्षे जुन्या सोन्याच्या शिरस्त्राणासह चार प्राचीन कलाकृती चोरीला गेल्या आहेत. ही घटना २५ जानेवारीच्या पहाटे अस्सेन येथील ड्रेंट्स संग्रहालयात घडली. चोरलेल्या कलाकृती रोमानियाच्या बुखारेस्ट येथील नॅशनल हिस्ट्री म्युझियमने ड्रेंट्स संग्रहालयाला कर्ज स्वरूपात दिल्या होत्या. या वस्तू डॅशियन या प्राचीन समाजावर आधारित प्रदर्शनाचा भाग होत्या. डॅशियन हा प्राचीन रोमानियामध्ये वास्तव्य करणारा समाज होता. नंतर हा भाग रोमन लोकांनी जिंकला. ड्रेंट्स संग्रहालयाचे व्यवस्थापकीय संचालक हॅरी टुपन यांनी निवेदनात म्हटले आहे की, “ड्रेंट्स संग्रहालय, अस्सेन आणि बुखारेस्ट येथील नॅशनल हिस्ट्री म्युझियमसाठी हा काळा दिवस आहे. काल रात्री संग्रहालयात घडलेल्या घटनेमुळे आम्हाला जबर धक्का बसला आहे. १७० वर्षांच्या इतिहासात एवढी मोठी घटना कधीच घडलेली नाही.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याच पार्श्वभूमीवर चोरट्यांनी चोरलेले सोन्याचे शिरस्त्राण का महत्त्वाचे होते आणि ही चोरी कशी झाली, याचा घेतलेला हा आढावा.

चोरीला गेलेले २४५० वर्षे जुने सोन्याचे शिरस्त्राण हा महत्त्वाचे आहे?

चोरीला गेलेले हेल्मेट म्हणजेच शिरस्त्राण हे कोटोफेनेश्टीचे शिरस्त्राण म्हणून ओळखले जाते. हे शिरस्त्राण शुद्ध सोन्याचे असून इ.स.पू. ४५० च्या सुमारास तयार करण्यात आल्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करतात. १९२९ साली एका रोमानियन गावातील मुलाला हे शिरस्त्राण सापडले. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, “ज्यावेळेस हे शिरस्त्राण सापडले त्यावेळी ते खेळण्याप्रमाणे वापरले गेले आणि नंतर कोंबड्यांसाठी पाण्याच्या भांड्यासारखे वापरल्यामुळे काही प्रमाणात खराब झाले.”

सुमारे एक किलो वजन असलेल्या या शिरस्त्राणाच्या समोरच्या भागात वापरणाऱ्याच्या भुवयांच्यावर दोन मोठे डोळे कोरलेले आहेत. याशिवाय, त्यावर अनेक पौराणिक प्राणी कोरलेले आहेत आणि एका लढवय्या पुरुषाचे चित्र आहे. जो हातात कट्यार घेत बोकडाचा बळी देताना दिसतो, असे वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. तपासादरम्यान तज्ज्ञांनी हे साधेसुधे शिरस्त्राण नसल्याचे ओळखले होते. ते एका अज्ञात स्थानिक डॅशियन राजा किंवा उच्चभ्रू सरदाराचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. हे शिरस्त्राण रोमानियामध्ये प्रसिद्ध असून अनेक इतिहासांच्या पुस्तकांमध्ये आणि पुरातत्त्वीय सूचींमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. १९६० च्या दशकातील द डॅशियन्स या रोमानियन चित्रपटासाठी या शिरस्त्राणाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. या चित्रपटात इसवी सन ८६-८८ दरम्यान रोमानियन सम्राट आणि डॅशियन साम्राज्य यांच्यातील विध्वंसक ऐतिहासिक युद्धाची पार्श्वभूमी दाखवली गेली होती, असे वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंची किंमत सांगण्यास अधिकार्‍यांनी नकार दिला. परंतु, रोमानियन अधिकाऱ्यांनी या वस्तू त्यांच्या संस्कृतीसाठी अमूल्य ठेवा असल्याचे म्हटले आहे.

कलाकृती कशा चोरल्या गेल्या?

पोलिसांनी जाहीर केलेल्या CCTV फुटेजमध्ये तीन हुडी घातलेले संशयित ड्रेंट्स संग्रहालयाच्या बाहेरील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यानंतर एक स्फोट आणि ठिणग्यांचा मारा होतो. पोलिसांच्या मते, चोरट्यांनी स्फोटकांचा वापर करून संग्रहालयात प्रवेश केला. या घटनेची माहिती अधिकार्‍यांना सुमारे अर्धा तासानंतर मिळाली. त्याच वेळी जवळच एका गाडीला आग लागल्याचेही समजले. या घटनेचा संबंध या गुन्ह्याशी असू शकतो. “संभाव्य शक्यता अशी आहे की, संशयितांनी आगीच्या ठिकाणाजवळ दुसऱ्या वाहनात स्वार होऊन पळ काढला,” असे डच अधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. आत्तापर्यंत संशयितांची ओळख पटलेली नाही. डच पोलिसांनी सांगितले की, ते जागतिक पोलीस एजन्सी इंटरपोलबरोबर काम करत आहेत आणि CNN ने दिलेल्या वृत्तानुसार रविवारीपर्यंत त्यांना ५० हून अधिक सूचना मिळाल्या आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How thieves stole a 2450 year old golden helmet from a museum in netherlands svs