भारत पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती ओसंडून वाहत आहे. परिणामी, नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आणि भीतीचं वातावरण आहे. शनिवारी पाकिस्तानने पुन्हा एकदा खोटा दावा करत भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पकडल्याचे सांगण्यात येत होते. हवाई दलातील पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांचे लढाऊ विमान पाडल्यानंतर सियालकोटजवळ त्यांना अटक करण्यात आली अशी अफवा पसरली गेली. काहींनी तर त्यांना पकडल्याचे दाखवण्यासाठी असंबंधित व्हिडीओदेखील प्रसारित केला. मात्र, पीआयबी फॅक्ट चेक टीमने हा दावा फेटाळत ही माहिती खोटी असल्याचे सांगितले.
कोण आहेत शिवांगी सिंग?
शिवांगी सिंग या भारतीय हवाई दलातील महिला पायलट आहेत. फ्रान्समध्ये बनवलेले राफेल लढाऊ विमान उडवणारी भारताची पहिली महिला होण्याचा ऐतिहासिक मान स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांना मिळाला आहे. ३० वर्षीय शिवांगी या वाराणसीच्या रहिवासी आहेत. वाराणसीच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केली, त्यावेळी त्या एनसीसीतही सहभागी होत्या. जॅकलिन थ्रोमध्ये शिवांगी यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे. २०१३ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये त्यांनी उत्तर प्रदेश आणि एनसीसीचे प्रतिनिधित्व केले होते. २०१७ मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये एअरफोर्स अकादमीत प्रवेश घेतला. तिथे त्यांना मिग-२१ विमान उडवण्याचं प्रशिक्षण मिळालं होतं.
शिवांगी यांचे आजोबादेखील भारतीय सैन्यात कर्नल होते. बालपणी त्या त्यांच्या आजोबांसोबत एअरफोर्स बेसवर जात, त्यामुळेच त्यांना या क्षेत्रात येण्याची ओढ लागली. शिवांगी यांनी त्यांच्या पालकांसह नवी दिल्लीतील हवाई दल संग्रहालयाला भेट दिल्याने त्याचा कायमच त्यांच्यावर प्रभाव पडला. त्या पंजाबमधील अंबाला इथे असलेल्या भारतीय हवाई दलाच्या प्रतिष्ठित गोल्डन अॅरोज स्क्वॉड्रनच्या भाग आहेत.
२०१७ मध्ये भारतीय हवाई दलाच्या महिला लढाऊ वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीचा भाग म्हणून सिंग यांना भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले. हा हवाई दलाच्या इतिहासातला ऐतिहासिक निर्णय होता; कारण महिलांना लढाऊ विमानांसाठी पायलटच्या भूमिकेत सामील करण्यासाठी दलाला दोन दशकांहून अधिक काळ लागला. २०२३ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले की, भारतीय हवाई दलात १,६०० हून अधिक महिला अधिकारी सेवेत होत्या, यामध्ये अनेक वैमानिकांचा समावेश होता.
राफेल उडवणे आणि सीमांचे रक्षण करणे
शिवांगी सिंग यांनी पहिल्यांदाच मिग-२१ या लढाऊ विमानाचे नियंत्रण केले, तेव्हा त्यांना उड्डाणाचे नियंत्रण करण्यासाठी किती कौशल्य लागते याची जाणीव झाली. २०२० मध्ये स्पर्धात्मक मूल्यांकन उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची राफेल प्रशिक्षणासाठी निवड झाली. या कार्यक्रमात फ्रेंच प्रशिक्षकांसह सिम्युलेटर सत्रे समाविष्ट होती. “मी प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकले, मग ते मिग-२१ बायसन विमान उडवणे असो किंवा राफेल लढाऊ विमान”, असे त्यांनी इंडिया टुडेला सांगितले. त्यांचे प्रशिक्षण राफेलच्या हाय-टेक सिस्टीममध्ये प्रभुत्व मिळवण्यावर केंद्रित होते, ज्यामध्ये थेल्स आरबीई२ एईएसए रडार आणि अचूक शस्त्रे यांचा समावेश होता. यामुळेच त्यांची ऑपरेशन सिंदूर अंतर्गत येणाऱ्या अवघड मोहिमांसाठी निवड करण्यात आली.
तेव्हापासून सिंग यांनी पूर्व लडाख आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC)सारख्या संवेदनशील भागात उड्डाणे केली. २०२३ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या एक्सरसाईज ओरियन या आंतरराष्ट्रीय लष्करी सरावांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
अवकाशाचे लक्ष्य
शिवांगी सिंग या नवीन राफेल जेट्स उड्डाणाचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक होत्या. मात्र, त्यांची स्वप्ने आणखी मोठी आहेत. “मी अशा क्षेत्रात यशस्वी झाले, जे खूप पूर्वीपासून पुरुषांसाठी राखीव होते आणि जर मी आणखी प्रगती करू शकले तर महिला कोणत्याही क्षेत्रात काम करू शकतात”, असे त्या म्हणाल्या. एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी “मला अंतराळवीर व्हायचे आहे”, अशीही इच्छा व्यक्त केली आहे.