भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत तंत्रज्ञानाचा आविष्कार दिसला. शत्रूने डागलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना पाडून हवाई संरक्षणाची फळी सर्वांना दिसली. यामध्ये केवळ रशियाकडून घेतलेली ‘एस-४००’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा नव्हती, तर सुरक्षेचे विविध स्तरांवरील हवाई कवच या यंत्रणेद्वारे तयार केले गेले आहे. ड्रोन युद्धात, बहुस्तरीय हवाई संरक्षणात, इलेक्ट्रॉनिक युद्धपद्धतीची चाचणी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून झाली. तंत्रज्ञानाच्या पातळीवरील युद्धातही आपली सज्जता याद्वारे दिसली. या प्रणालीचा घेतलेला हा आढावा…
हवेतल्या हवेत शस्त्र-प्रतिशस्त्रांचा मारा
नव्वदच्या दशकात देशभरात रामायण-महाभारताच्या मालिका लोकप्रिय होत्या. आजही अनेक जण इंटरनेटवर या मालिका बघतात. या मालिकांमध्ये जी युद्धे दाखवली जायची, ती पाहून गंमत वाटायची. एक धनुर्धारी मंत्रोच्चार करून शत्रूवर बाण सोडत असे. एकाने बाण सोडल्याबरोबर शत्रू पक्षातील धनुर्धारी त्याला भेदक असा दुसरा बाण सोडायचा. दोन्ही बाण बरोबर एकमेकांवर आदळायचे. ज्याची भेदकक्षमता अधिक असेल, तो बाण दुसऱ्या बाणाला नष्ट करायचा! या मालिकांमधील अशी युद्धे पाहून तेव्हा गंमत वाटली. मात्र, अशाच प्रकारचे युद्ध आताच्या आधुनिक काळात लढले जात आहे! फरक एवढाच, की बाणांची जागा आता क्षेपणास्त्रांनी, ड्रोन्सनी घेतली आहे. विविध देशांच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी ही किमया साधली आहे. इस्रायल-पॅलेस्टिनींमधील संघर्ष असो, की रशिया-युक्रेन; हवाई संरक्षण प्रणालीचा वापर बघायला मिळत आहे. भारत-पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि नंतर झालेल्या संघर्षात भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची चाचणी झाली, असे म्हणता येईल. हवाई संरक्षण तंत्रज्ञानामुळे हजारो नागरिकांचे संरक्षण होते. ही यंत्रणा नागरिकांसाठी, संरक्षण दलांसाठी एक प्रकारचे वरदानच आहे. भारताने आतापर्यंत या क्षेत्रात मोठी प्रगती केली असून, आणखी बरीच प्रगती करणे बाकी आहे. या तंत्रामुळे ड्रोन, रॉकेट, लघु आणि मध्यम पल्ल्याच्या हवाई लक्ष्यांना भेदता येत असले, तरी दीर्घ पल्ल्याच्या आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या मोठ्या शस्त्रांना भेदण्याचे आव्हान कायम आहे. हवाई संरक्षण यंत्रणेत समन्वय आणि अचूकता यांचे योगदान बहुमोलाचे असते.
पाकिस्तानचे हल्ले निष्प्रभ
पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंडीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई, भूज अशा विविध ठिकाणी लष्करी तळांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. एकत्रित मानवरहित हवाई यंत्रणाविरोधी ग्रिड (इंटिग्रेटेड काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टीम्स) आणि हवाई संरक्षण यंत्रणांनी (एअर डिफेन्स सिस्टीम्स) पाकिस्तानचे हे हल्ले निष्फळ ठरवले. हवाई संरक्षण यंत्रणा रडार, नियंत्रण केंद्रे आणि लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रांच्या मदतीने हवाई संरक्षण यंत्रणा शत्रूने डागलेल्या ड्रोन, क्षेपणास्त्रांना निकामी करते. भारताने हवाई संरक्षण करताना पेचोरा, ओएसए-एके क्षेपणास्त्रे, कमी उंचावरील लक्ष्यांना टिपण्यासाठी हवाई संरक्षण तोफा, देशी बनावटीचे आकाश क्षेपणास्त्रांचा प्रामुख्याने वापर केला.
भारताच्या अचूक हल्ल्यांचे दर्शन
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानमधील नूर खान आणि रहिमयार खान हे हवाई तळ अचूक उडवले. भारताच्या संरक्षण दलांनी ८ मे रोजी पाकिस्तानमधील हवाई संरक्षण रडार आणि यंत्रणांना लक्ष्य केले होते. लाहोर येथील हवाई संरक्षण यंत्रणा आपण निकामी केली. लक्ष्यावर घोंघावून त्याला नष्ट करणाऱ्या कामिकाझे किंवा आत्मघाती ड्रोन्सचा वापर करण्यात आला. चीनने पाकिस्तानला पुरविलेली हवाई संरक्षण यंत्रणा भारताने अवघ्या २३ मिनिटांत जॅम केली. या मोहिमेत चीनची पीएल-१५ क्षेपणास्त्रे, तुर्कीची यिहा ही मानवरहित वाहने, दीर्घ पल्ल्याची रॉकेट, क्वाडकॉप्टर्स आणि व्यावसायिक ड्रोन भारताने नष्ट केले. या मोहिमेत इस्रोचाही सहभाग आहे. ११ मे रोजी इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सामरिक कारणांसाठी किमान १० उपग्रह देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे वक्तव्य केले होते. संपूर्ण उत्तर भारतासह सात हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर उपग्रहांनी बारीक लक्ष ठेवले. तसेच, ड्रोननिर्मितीतही भारताने प्रगती केली असून, अनेक कंपन्यांशी तसे करार केले आहेत. भारताच्या अचूक हवाई यंत्रणेमुळे आपले नुकसान टळले. त्याच वेळी प्रभावी आणि परिणामकारक हल्ल्यांमुळे शत्रूचे मोठे नुकसान झाले.
बहुस्तरीय हवाई सुरक्षा यंत्रणा
- बहुस्तरावरील आणि एकत्रित हवाई संरक्षण यंत्रणेमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलातील यंत्रणांचा समावेश असतो.
- हवाई संरक्षणाच्या पहिल्या स्तरामध्ये ड्रोनविरोधी यंत्रणा आणि व्यक्तीला हातात घेऊन हवेतील लक्ष्याला मारा करता येतील, अशा शस्त्रांचा (मॅनपॅड्स) समावेश असतो. कमी उंचावरील लक्ष्यांना ही शस्त्रे भेदतात.
- हवाई संरक्षणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरामध्ये ‘पॉइंट डिफेन्स’ शस्त्रे (कमी उंचावरील लक्ष्यांना भेदणाऱ्या बंदुका), लघु आणि मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रांचा समावेश असतो.
- हवाई संरक्षणाच्या चौथ्या टप्प्यात दीर्घ पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा समावेश असतो.
हवाई यंत्रणाविरोधी यंत्रणा (आयएसीसीएस)
हवाई दलासाठी या यंत्रणेची निर्मिती ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ने केली आहे. ही यंत्रणा म्हणजे स्वयंचलित ‘कमांड अँड कंट्रोल’ यंत्रणा आहे. हवाई संरक्षणासाठी कार्यरत सर्व यंत्रणांची एकत्रित माहिती ही यंत्रणा घेते. त्यात रडार, सेन्सर्स, नागरी वस्तीसाठीचे रडार, कम्युनिकेशन नोड्स आणि हवाई दलातील इतर अनेक ‘कमांड अँड कंट्रोल’ केंद्रांचा समावेश यात असतो. एकत्रित डेटा, धोक्यांची तत्क्षणी मिळणाऱ्या माहितीमुळे (रिअल टाइम अपडेट्स) लष्करी अधिकाऱ्यांना युद्धामध्ये निर्णय जलद गतीने घेणे सुलभ होते.
‘आकाशतीर’
हवाई दलासारखी भारतीय लष्कराची ‘आकाशतीर’ ही हवाई संरक्षण नियंत्रण आणि माहिती देणारी यंत्रणा आहे. लष्कराच्या हवाई संरक्षण केंद्रांना ही यंत्रणा जोडलेली आहे. या यंत्रणेचीही निर्मिती ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ने केली आहे. कमी उंचावरील हवाई हद्दीतील क्षेत्रावर ही यंत्रणा देखरेख ठेवू शकते. तसेच, जमिनीवरील हवाई संरक्षण यंत्रणेवर परिणामकारक नियंत्रण ठेवू शकते. ‘आकाशतीर’ यंत्रणा सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. ही यंत्रणा हवाई दलाच्या ‘आयएसीसीएस’शी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लष्कर आणि हवाई दलामधील समन्वय अधिक परिणामकारक होईल.
बॅलिस्टिक क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा
भारतामध्ये ‘पृथ्वी डिफेन्स व्हेइकल’ (पीडीव्ही) या क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राची (इंटरसेप्टर मिसाइल) चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली आहे. ‘पृथ्वी एअर डिफेन्स’ (पीएडी) आणि ‘अॅडव्हान्स एअर डिफेन्स’ (एएडी) या दोन क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रांचा वापर त्यासाठी करण्यात आला. ‘पीएडी’ आणि ‘एएडी’द्वारे आत्तापर्यंत वातावरणाच्या आतील (५० किलोमीटर उंचीपर्यंत, एंडोअॅटमॉस्फिअरिक) आणि बाहेरील (५० ते ८० किलोमीटरपर्यंत, एक्झोअॅटमॉस्फिअरिक) चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. अद्याप ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा भेद करणे ही अतिशय कठीण बाब असून, विशेषतः एकापेक्षा अधिक लक्ष्यांना एकाच वेळी भेदणाऱ्या क्षेपणास्त्रांचा (‘मल्टिपल इंडिपेंडंटली टारगेटेबल रिएंट्री व्हेइकल’, एमआयआरव्ही) मारा झाला, तर त्याला भेदणे कठीण बाब ठरते. या क्षेत्रात आणखी प्रगतीची आणि लवकरात लवकर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून रक्षणाची देशी बनावटीची ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे. सध्या रशियाकडून घेण्यात आलेली एस-४०० ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा यासाठी तैनात आहे. काही ठरावीक भागांना, शहरांना याद्वारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून संरक्षण देता येते.
तज्ज्ञ म्हणतात…
लेफ्टनंट जनरल पी. सी. कटोच (निवृत्त) यांनी माहिती यंत्रणेचे महासंचालक म्हणून काम केले आहे. ‘स्पेशल लँड फोर्सेस’वरील एका लेखात त्यांनी ‘आयएसीसीएस’ आणि ‘आकाशतीर’ या हवाई संरक्षण प्रणालींवर प्रकाश टाकला आहे. भारताच्या हवाई संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली आहे. जानेवारी २०२५ मध्ये एका भागामध्ये या दोन्ही यंत्रणा एकत्रित करण्यात यश आल्याचे लेखात म्हटले आहे. वेगळ्या हवाई संरक्षण कमांडचाही पूर्वी विचार झाला होता. सध्याचे वर्ष बदलांचे असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी जाहीर केले आहे. एकत्रित थिएटर कमांडच्या निर्मिती याद्वावरे केल्या जाण्याची शक्यता आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर उच्च संरक्षण व्यवस्थापनात आता नेमके कुठले बदल होतात, ते पाहावे लागणार आहे.
‘तक्षशीला इन्स्टिट्यूशन’मधील ‘रीसर्च फेलो’ आदित्य रामनाथन यांनी ‘मनीकंट्रोल’वर हवाई संरक्षणावर लिहिलेल्या लेखात भारताच्या हवाई संरक्षण व्यवस्थेत भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन अद्ययावतपणा आणण्याची गरज व्यक्त केली आहे. ड्रोनयुद्ध आणि रडार जॅमिंग यंत्रणा लक्षात घेता त्यानुसार अधिक अद्ययावत होण्याची गरज व्यक्त करतानाच सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, चीनकडे असणारी स्टेल्थ आणि अत्याधुनिक विमानांचा विचार करून येत्या काळात अधिक अत्याधुनिक रडार आणि सेन्सर निर्माण व्हायला हवेत, असे ते म्हणतात.
नवी दिल्लीस्थित ‘मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसिस’मधील संशोधक विश्लेषक राहुल वानखेडे यांनी सांगितले, की देशाचे हवाई संरक्षण विविध स्तरांवर केले जाते. त्यात प्रामुख्याने लष्कर आणि हवाई दलांतील समन्वय महत्त्वाचा ठरतो. शत्रूने कुठल्या शस्त्रांनी आपल्यावर हवाई हल्ला केला, त्यानुसार त्याला योग्य ठरेल, अशा शस्त्रांनी प्रत्युत्तर दिले जाते. त्यासाठी आवश्यक रडार प्रणाली, सेन्सर आपण विकसित केले आहेत. या ठिकाणी हवाई दलाची ‘आयएसीसीएस’ आणि लष्कराची ‘आकाशतीर’ ही प्रणाली उपयुक्त ठरते. विविध देशांकडून घेण्यात आलेल्या शस्त्रांमधील समन्वय, तसेच शत्रूने मोठ्या प्रमाणात ड्रोनचा मारा केला, तर त्याला प्रभावी ठरेल, अशी यंत्रणानिर्मितीचे आव्हान आहे. शत्रूने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना डागले, तर त्यांना भेदण्याचेही मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आता निवडक शहरांनाच अशा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवता येते. शस्त्र आणि यंत्रणांच्या बाबतीत जितक्या लवकर आत्मनिर्भर होऊ, तितकी आपली यंत्रणा आणखी मजबूत होईल.
पुढे काय?
हवाई संरक्षणाची बचावफळी अधिक मजबूत करून शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा प्रभावी आणि परिणामकारक रीतीने निकामी करण्यामधील सज्जता आणि त्यातील सातत्य, समन्वय कायम राहायला हवे. तसेच, भारतासमोर मुख्य आव्हान पाकिस्तानबरोबरच चीनचे आहे, हे ध्यानात घेऊन चीनला निष्प्रभ करण्याच्या दिशेने तातडीने आणि निर्धाराने पावले टाकायला हवीत.
prasad.kulkarni@expressindia.com
© The Indian Express (P) Ltd