पृथ्वीशिवाय अन्य ग्रहांवर सजीव असण्याची शक्यता दीर्घकाळापासून अभ्यासली जात आहे. त्यामध्ये शास्त्रज्ञांच्या हाती आता महत्त्वाचा निष्कर्ष लागला आहे. आपल्या सौर मंडळाबाहेर दूरवरील ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असावी असे संकेत देणारा पुरावा सापडला आहे. तो ग्रह कोणता आहे, हा पुरावा काय आहे, आणि या संशोधनाचे प्रणेते प्रा. निक्कू मधुसूदन कोण याचा ऊहापोह.

नवीन शोध काय?

पृथ्वीपासून १२४ प्रकाश वर्षे अंतरावर असलेल्या ‘के२-१८बी’ या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे असे संकेत मिळाले आहेत. खगोलशास्त्रज्ञांना ‘के२-१८बी’ या ग्रहाच्या वातावरणात डायमिथाइल सल्फाइड (डीएमएस) आणि डायमिथाइल डायसल्फाइड (डीएमडीएस) या वायूंचे रासायनिक ठसे आढळले आहेत. पृथ्वीवर या दोन्ही वायूंचे रेणू केवळ सूक्ष्मजीवांद्वारेच तयार केले जातात. हे सूक्ष्मजीव सामान्यतः समुद्रामध्ये आढळतात. त्यांना फायटोप्लँक्टोन असे म्हणतात. डीएमएस आणि डीएमडीएस या दोन्ही वायूंचे पृथ्वीवरील प्रमाण एक अब्जामध्ये एक इतके कमी आहे. ‘के२-१८बी’वर मात्र ते पृथ्वीच्या हजारो पट आहे.

शोध कसा लागला?

खगोलशास्त्रज्ञांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप वापरून डीएमएस आणि डीएमडीएस या रेणूंच्या तरंगांचा अभ्यास केला. खगोलशास्त्रज्ञांच्या याच गटाला यापूर्वी ‘के२-१८बी’वर कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचे अस्तित्व आढळले होते. तो अभ्यास त्यांनी वेबच्या मिड-इन्फ्रारेड इमेजर, स्लिटसेस स्पेक्ट्रोग्राफ आणि निअर-इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ साधनांचा वापर करून केला होता. त्यांच्या डीएमएस आणि डीएमडीएसचा शोध लावणाऱ्या नवीन संशोधनात वेबच्या मिड-इन्फ्रारेड साधनाचा वापर करण्यात आला आहे.

खगोलशास्त्रज्ञांचा निष्कर्ष

यासंबंधीचा अभ्यास ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. पृथ्वीबाहेर सजीवांचा शोध घेताना हाती लागलेली ही सर्वात ठोस बायोसिग्नेचर (जैविक चिन्हे) आहेत असे या खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार, ‘के२-१८बी’ या ग्रहावर भूतकाळात किंवा वर्तमान काळात जैविक क्रिया होत असाव्यात अशी चिन्हे आहेत. मात्र असे असले तरी हे खगोलशास्त्रज्ञ आणि इतर तज्ज्ञ सावध भूमिका घेत असून त्यांनी पृथ्वीच्या बाहेर सजीव सृष्टी सापडल्याचा निश्चित शोध लागल्याची कोणतीही घोषणा केलेली नाही.

‘के२-१८बी’विषयी अधिक माहिती

‘के२-१८बी’ हा ग्रह पृथ्वीपासून १२४ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. (एक प्रकाशवर्ष हे अंतर सुमारे नऊ लाख कोटी किलोमीटर इतके असते.) ‘के२-१८बी’ हा ग्रह पृथ्वीपेक्षा मोठा आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा ८.६ पट अधिक आहे आणि त्याचा आकार पृथ्वीच्या २.६ पट आहे. हा ग्रह ‘हायसियन वर्ल्ड’ असावा अशी शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. ‘हायसियन वर्ल्ड’ म्हणजे हा ग्रह पूर्णपणे द्रवाने व्यापलेला असावा आणि त्याचे वातावरण हायड्रोजनने समृद्ध असावे, अशी माहिती या अभ्यासाचे मुख्य लेखक प्रा. निक्कू मधुसूदन यांनी दिली. प्रा. मधुसूदन हे केंब्रिज विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉमी’ येथे खगोल भौतिकशास्त्र आणि बाह्यग्रह या विषयांचे प्राध्यापक आहेत.

प्रा. मधुसूदन यांचे संशोधन

प्रा. मधुसूदन आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ काही काळापासून हायसियन जगताच्या शक्यतेवर काम करत आहेत. ‘के२-१८बी’च्या पृष्ठभागावर द्रवरूप पाणी असावे असे निर्धारित केल्यानंतर २०२१मध्ये त्यांनी सर्वात प्रथम हायसियन जगताची संकल्पना मांडली. प्रा. मधुसूदन यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, “सुरुवातीच्या सैद्धांतिक अभ्यासादरम्यान हायसियन जगतावर डीएमएस आणि डीएमडीएस यासारख्या गंधक आधारित वायूंचे उच्च प्रमाण असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता आपल्याला तसे निरीक्षणही दिसत आहे. आपल्याला या ग्रहाबद्दल असलेली सर्व माहिती आणि आपल्याकडच्या उपलब्ध माहितीवरून असे दिसते की, महासागरासह हायसियन जगत आणि त्यामध्ये सजीव हा सर्वात जवळ जाणारा निष्कर्ष आहे.”

अधिक डेटाची गरज

आतापर्यंत हाती लागलेल्या माहितीवरून सौरमंडळाबाहेरील ग्रहावर सजीवसृष्टी असल्याचा ठोस निष्कर्ष काढण्यास शास्त्रज्ञ तयार नाहीत. यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डीएमएस आणि डीएमडीएस या वायूंच्या निर्मितीवरून सजीव शक्यतेचे संकेत मिळाले असले तरी असेही शक्य आहे की, या दोन्ही रेणूंची निर्मिती त्या ग्रहावर सजीवांच्या सहभागाविना अन्य अज्ञात रासायनिक प्रक्रियेद्वारे झाली असावी. त्यामुळे या संशोधनाचा १६ आणि २४ तासांच्या पाठपुराव्याची गरज आहे असे प्रा. मधुसूदन व त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. पृथ्वीबाहेरील सजीवसृष्टीच्या पुराव्यांची घोषणा करण्यासाठी आणखी बराच डेटा आणि वेळ आवश्यक असल्याचे इतर तज्ज्ञांचेही म्हणणे आहे. बाह्यग्रहांवरील काही वायूंची निर्मिती नैसर्गिक नाही, ते पुन्हापुन्हा तयार करावे लागतात, बहुथा सजीवाद्वारे, या संकल्पनेवर आणि त्याच्याशी निगडीत शक्यतेवर खगोलशास्त्रज्ञ गेल्या १०० वर्षांपासून काम करत आहेत अशी माहिती ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथील खगोल भौतिकशास्त्रज्ञ सारा सागर यांनी दिली. सागर हे प्रा. मधुसूदन यांच्या संशोधनात सहभागी नव्हते.

nima.patil@expressindia.com