Why Iran expelled Many Afghan People : इस्रायलसोबतच्या युद्धानंतर इराणने इस्रायलसोबतच्या युद्धानंतर इराणने देशातील घुसखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक अफगाणी लोकांना इराणमधून हद्दपार करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघ व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी या घडामोडीला दशकातील सर्वात मोठी हद्दपारी म्हटलं आहे. २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर लाखो लोकांनी देशातून पळ काढून इराणमध्ये आश्रय घेतला होता. त्यापैकी अनेक जण कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी इराणमध्ये अत्यंत कमी पैशांत मजुरी करीत होते. दरम्यान, इराणने अफगाणी लोकांना देशाबाहेर का हाकलून लावले ते जाणून घेऊ…

इराणने मार्च २०२५ मध्ये अफगाणिस्तानमधील नागरिकांना हद्दपार करण्याची घोषणा केली आणि त्यांना स्वत:हून देश सोडण्यासाठी ६ जुलैपर्यंत अंतिम मुदत दिली. त्यानंतर मागील महिनाभरात लाखो अफगाणी नागरिकांना इराणमधून हद्दपार करण्यात आले. काही वृत्तांनुसार, यामध्ये कायदेशीर पारपत्र घेऊन आलेल्या नागरिकांचाही समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (IOM) अंदाजानुसार, २४ जून ते ९ जुलै या कालावधीत तब्बल पाच लाख आठ हजार ४२६ अफगाणी नागरिक इराणमधून त्यांच्या मायदेशात परतले आहेत. हा आकडा गेल्या काही दशकांतील सर्वात मोठ्या हद्दपारीचा मानला जात आहे.

हद्दपारीमध्ये मुलांची संख्या सर्वाधिक

धक्कादायक बाब म्हणजे इराणमधून हद्दपार करण्यात आलेल्या अफगाणी नागरिकांमध्ये शेकडो अनाथ मुले आहेत. या संदर्भात माहिती देताना संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेचे मिशनप्रमुख मिह्युंग पार्क यांनी सांगितले, “गेल्या आठवड्यात इराणमधून हद्दपार झालेल्या नागरिकांमध्ये ४०० मुलांचा समावेश होता आणि ही संख्या खूपच मोठी आहे.” बशीर नावाच्या एका अफगाण निर्वासिताने सीएनएनला सांगितले की, सुरुवातीला इराणी सैन्याने माझ्याकडून २०० डॉलर्स (सुमारे १७,१५० रुपये) घेतले आणि मला केंद्रात पाठवले. तिथे दोन दिवस मुक्काम केल्यानंतर त्यांनी माझ्याकडून जबरदस्तीने ५० डॉलर्स (४,२०० रुपये) घेतले. त्या केंद्रात राहणाऱ्या २०० लोकांना अन्न व पाणीही दिले जात नव्हते. इराणच्या सैन्याकडून आम्हाला अपमानित करून मारहाण केली जात होती.

आणखी वाचा : शांततेच्या नोबेल पुरस्काराची निवड कशी केली जाते? काय असते प्रक्रिया? ट्रम्प यांना नोबेल मिळण्याची शक्यता किती?

तेहरानने पाच लाख अफगाणींना हद्दपार का केलं?

  • इराणच्या काही अधिकाऱ्यांनी अफगाण नागरिकांवर इस्रायलसाठी गुप्तहेरगिरी केल्याचा आरोप केला.
  • काही अफगाणी नागरिकांचे कबुलीजबाब दाखवण्यात आले, ज्यात त्यांनी इस्रायली संपर्कासाठी माहिती दिल्याचे मान्य केले.
  • अफगाणिस्तानमधील निर्वासितांमुळे इराणमध्ये अस्थिरता, बेरोजगारी आणि सामाजिक तणाव वाढत असल्याचे सरकारचे मत आहे.
  • इराण सरकारचे म्हणणे आहे की, बेकायदा राहणाऱ्या अफगाणी नागरिकांना परत पाठवणे गरजेचे आहे.
  • इराणमध्ये राहणाऱ्या अनेक अफगाणी नागरिकांकडे वैध व्हिसा किंवा ओळखपत्रे नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
  • आर्थिक संकट, वाढती महागाई आणि संसाधनांची कमतरता यामुळे इराणमधील सरकारवर दबाव वाढला आहे.
  • इस्रायल-गाझा संघर्षानंतर इराणमध्ये सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर झाला आणि अफगाणी नागरिकांकडे संशयाने पाहिलं जातंय.
  • काही तज्ज्ञांच्या मते, सरकार ही मोहीम अंतर्गत असंतोष दूर करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकजूट वाढवण्यासाठी वापरत आहे.

अनेकांना गुप्तहेराच्या आरोपाखाली अटक व मारहाण

तेहरानमध्ये राहणाऱ्या एका तरुण अफगाणी स्थलांतरिताने सांगितले की, माझ्या वडिलांना गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली इराणी पोलिसांनी अटक केली. त्यांचे हातपाय साखळदंडाने बांधण्यात आले आणि त्यांना अन्नपाण्याशिवाय तसेच ठेवले. इराणमध्ये असलेल्या अफगाणिस्तानमधील निर्वासितांची परिस्थिती खूपच वाईट असल्याचंही त्याने सांगितले. इराणमध्ये तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ राहत असलेल्या एका अफगाणी महिलेने तिच्या पाच मुलांसह मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. या महिलेने ‘The Guardian’ला सांगितले की, अचानक मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस आमच्या घरात शिरले आणि त्यांनी आम्हाला जबर मारहाण केली. मी त्यांना माझं सामान भरायला थोडा वेळ मागितला; पण त्यांनी काहीही न ऐकता आम्हाला कचऱ्यासारखं घराबाहेर फेकलं.

इराणपाठोपाठ पाकिस्ताननेही देशात बेकायदा राहणाऱ्या अफगाणी लोकांची हद्दपारी सुरू केली आहे.

भुकेने व्याकूळ झालेल्या अनेकांचा मृत्यू

इराणच्या सीमेवरून अफगाणिस्तानमध्ये परतणाऱ्या लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, ज्यामध्ये बहुतांश महिला व लहान मुलांचा समावेश आहे. ही परिस्थिती त्यांच्यासाठी अधिकच कठीण ठरत आहे, कारण अफगाणी कायद्यानुसार महिलांना पुरुषांशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई आहे. हा कायदा मोडल्यास त्यांना चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा होऊ शकते. मानवी हक्क संघटनांनी या घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. इराणमधून बाहेर पडणाऱ्या बहुतांश निर्वासितांकडे फक्त अंगावरचे कपडेच शिल्लक असून ते उपाशीच प्रवास करीत आहेत. आंतरराष्ट्रीय रेड क्रेसेंट संस्थेने (IFRC) असा दावा केलाय की, अफगाणिस्तानकडे परतणाऱ्या लोकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत असून काहींचा परतीच्या प्रवासात मृत्यूही झाला आहे.

इस्रायल-इराण युद्धादरम्यान काय घडलं?

इराणमधील हद्दपारीची ही कारवाई काही माध्यमसंस्था व अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर झाली आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की, इस्रायलने युद्धाच्या काळात इराणमधील हेरगिरीसाठी अफगाणिस्तानमधील लोकांचा वापर केला होता. इराणी सरकारी मीडियावर एका अफगाणी गुप्तहेराचे कथित कबुली जबाबाचे फुटेजही दाखवण्यात आले. त्या व्यक्तीने कबूल केले की, तो जर्मनीतील एका व्यक्तीसाठी काम करत होता. त्याने सांगितले की, इराणमधील घडामोडींची माहिती देण्यासाठी जर्मनीतील एका व्यक्तीने त्याला दोन हजार डॉलर्स (सुमारे १ लाख ७० हजार रुपये) दिले होते.

हेही वाचा : विश्लेषण: कधी संजय गायकवाड, कधी आणखी कोणी… स्वपक्षियांकडून एकनाथ शिंदेंची शिवसेना वारंवार अडचणीत का येते?

संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली

संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड बेनेट यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “इराणने शेकडो अफगाणी लोकांवर गुप्तहेरगिरीचे आरोप ठेवले आहेत. तसेच त्यांनी इतर अल्पसंख्यांक समुदायांना देशद्रोही ठरवले असून ही परिस्थिती खूपच गंभीर आहे”, असं बेनेट यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराण हा जगातील सर्वाधिक निर्वासितांना आश्रय देणारा देश राहिला आहे. परंतु, इस्रायलबरोबर युद्ध सुरू असताना अफगाणिस्तानमधील घुसखोरांनी शत्रू देशाला गोपनीय माहिती पुरवली असा आरोप इराणकडून केला जात आहे.

पाकिस्तानमध्येही हद्दपारीची कारवाई

इराणपाठोपाठ पाकिस्ताननेही देशात बेकायदा राहणाऱ्या अफगाणी लोकांची हद्दपारी सुरू केली आहे. आतापर्यंत पाकिस्तानमधून हजारो लोक अफगाणिस्तानमध्ये परतले आहेत. इराण आणि पाकिस्तानमधून एकूण किमान १२ लाख अफगाणी लोकांना हद्दपार करण्यात आले असा दावा एका संस्थेनं केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक मायदेशात परतत असल्याने अफगाणिस्तानवर मोठं संकट निर्माण झालं आहे. निर्वासितांमुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो, असा इशारा आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे.