Handwriting Anxiety Real?: पेन आणि कागद घेऊन लिखाण करणं हे खरं तर साधं आणि निरुपद्रवी आहे. पण अनेकांसाठी हा भीती, वेदना आणि जुने अपमान जागे करणारा अनुभव ठरतो. भारतात अजूनही परीक्षा आणि नोकरभरतीसाठी पेन-कागद महत्त्वाचेच आहेत. त्यामुळे ही भीती हाच खरा अडथळा ठरते. डिजिटल युगात ही समस्या आता अधिक तीव्र होत आहे…
एखादा फॉर्म भरताना… नाव, पत्ता, तारीख एवढंच भरायचं असतं, पण जेव्हा एखादा तरुण पेन हातात घेतो, तेव्हा त्याचा हात थरथरतो, मनगट दुखायला लागतं, छातीवर ताण येतो आणि तो फॉर्म डोळ्यांसमोर धूसर होतं जातो. त्याला तो फॉर्म बाजूला सारून द्यावासा वाटतो. “हे ऑनलाइन का नव्हतं?” असा प्रश्न मनात येतो.
ती शरीराची प्रतिक्रिया असते. वाईट हस्ताक्षराबद्दल शिक्षकांचा ओरडा, फाटलेली वही, नापास होणं किंवा कधीतरी वहीतलं वाचून सगळ्यांसमोर केलेली चेष्टा अशा अनेक आठवणी अचानक जाग्या होतात. म्हणूनच गेल्या वीस वर्षांत शालेय समुपदेशनात आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे यासंबंधी येणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. हस्ताक्षराबद्दलची ही भीती दैनंदिन जीवनात अडथळा आणते. याला वैद्यकीय भाषेत ग्राफोफोबिया (हस्ताक्षराची भीती) किंवा स्क्रिप्टोफोबिया (सार्वजनिक ठिकाणी लिहिण्याची भीती) म्हणतात. ही भीती लिखाणासाठी टाळाटाळ, शारीरिक वेदना अशा लक्षणांतून ती दिसते. यामुळे शिक्षण, करिअर आणि दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम होतो.
भारताचं सांस्कृतिक वास्तव
- भारतामध्ये अजूनही शालेय शिक्षणात हस्तलेखनाचं प्राबल्य आहे. अनेक कुटुंबांमध्ये स्वच्छ हस्ताक्षरावर भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर सतत ताण येतो.
- २०१२ मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार ३६% विद्यार्थ्यांनी वाईट हस्ताक्षरामुळे लिहिणं टाळल्याचं मान्य केलं होतं.
- २०२५ मध्ये मुंबईत एका शिक्षकाने मुलाचं हस्ताक्षर खराब असल्यामुळे त्याच्या हाताला मेणबत्तीने चटके दिले होते. अशी शिक्षा भारतात आजही अनेक ठिकाणी, अनेक विद्यार्थ्यांना केली जाते. त्यामुळे त्याविषयीची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरही कुणाला त्यात फारसे काही वावगे वाटले नाही. त्यामुळे शाळा म्हणजे वेदना किंवा भीती असं नातं तयार होतं.
- यात भरीस भर म्हणून आजही पाठांतरावर आधारित शिक्षणपद्धतीच रेटली जाते आहे. अनेकांना अधिक लांबीची उत्तरं लिहिणं, हेच परीक्षेत सर्वांत अवघड काम वाटतं. हीच चिंता मोठेपणीही टिकून राहाते.
- शाळांमध्ये शिक्षा म्हणून वारंवार लिहायला लावलं जायचं, उदा. “मी पुन्हा वर्गात बोलणार नाही” हे २०० वेळा लिहिणं. त्यामुळे लिखाणाची शिक्षा होणं आणि अपमान यांची एकत्र सांगड अनेकांच्या मनात घट्ट रुतून बसते.
- डिजिटल- पूर्व काळात कागदावर लिहिलेला प्रत्येक वैयक्तिक विचार, प्रेमपत्रं, डायरी, टिपा हे सगळं कायम पुरावा म्हणून उरायचं. त्यामुळे लिहिणं म्हणजे उघड होण्याची भीती असंही काहींच्या मनात समीकरण तयार झालेलं असतं
आघात आणि फोबिया
- बालपणी वारंवार होणारा आघात मेंदूतील शिकण्याचे आणि भावना सांभाळण्याचे भाग बदलतो. त्यामुळे लक्ष, स्मरणशक्ती आणि भावना सांभाळणं कठीण होतं.
- लेखनाशी निगडित आघात वारंवार झाल्यास मेंदू नकारात्मक स्मृती तयार करतो. मग लिहिताना हात थरथरणं, घाम येणं, छातीत धडधड, मळमळ अशा शारीरिक प्रतिक्रिया दिसू लागतात.
- सगळ्यांचीच समस्या आघातामुळेच असेल असं नाही. काहींना प्रत्यक्ष शारीरिक अडचणी असतात. उदा. ऑटिस्टिक मुलांना मोटर स्किल्सच्या अडचणींमुळे लिहिणं अवघड जातं. २०२१ मधल्या एका संशोधनानुसार ८७% ऑटिस्टिक लोकांमध्ये अशी समस्या असते.
डिजिटल युगाची भर
- आज बहुतेक विद्यार्थी पेनऐवजी मोबाईल किंवा लॅपटॉपवर टायपिंग, मेसेजिंग किंवा व्हॉइस नोट्स पाठवतात. स्क्रीनवरच्या चुका ऑटोकररेक्टमुळे दुरुस्त होतात, जे हस्तलिखाणात कधीच शक्य नव्हतं.
- पूर्वी शर्टाच्या खिशात पेन ठेवणं प्रतिष्ठेचं मानलं जायचं. पण आज अनेक व्यावसायिक मंडळी बाहेर कुठेही जाताना पेन सोबत नेतही नाहीत. लिहिण्याचा सराव कमी झाला आणि कागदावर विचार मांडतानाचा आत्मविश्वासही त्यामुळे कमी झाला.
- ज्यांनी वर्षानुवर्षं हाती लिहिणं टाळलं, त्यांचा हात सरावात नसतो. मग लिहिताना त्रास जाणवतो, हा त्रास आयुष्यातील खासकरून शालेय आयुष्यातील अपमानाशी जोडला गेला तर त्याचे परिवर्तन भीतीमध्ये होते.
पिढी आणि स्त्री- पुरुष भेद
- हाती लिहिण्याची भीती फक्त जनरेशन Z मध्येच नाही. मिलेनियल्स, जनरेशन X आणि बेबी बूमर्समध्येही ती वेगवेगळ्या प्रकारे दिसते.
- स्त्री- पुरुष भेद हा देखील यात मोठा भाग आहे. मुलींवर नेहमीच स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षर असण्याचा ताण असतो. त्यातूनच काहींनी सुंदर अक्षराची आवड जोपासलेली दिसते.
- मुलींना वैयक्तिक डायरी ठेवण्यासही घरात मनाई केली जाते, कारण ‘गुपितं’ उघड होण्याची भीती असते. मुलं मात्र “आपलं हस्ताक्षर कधीच चांगलं होणार नाही” असं गृहीत धरतात आणि टायपिंगला जास्त पसंती देतात.
- दोन्ही गटांत लेखन म्हणजे सर्जनशीलता किंवा संवाद नसून इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणं, अशी मानसिकताच तयार झालेली दिसते.
प्राधान्य विरुद्ध भीती
- टायपिंगची आवड असणं ही नियमित बाब आहे. अशी मंडळी गरज पडल्यास लिहितात आणि शारीरिक त्रास अनुभवत नाहीत.
- पण फोबिया असलेले लोक मात्र लिहिण्याच्या आधीच घाबरतात, हात थरथरतो, घाम येतो आणि ते काम टाळतात. त्यामुळे करिअर किंवा शिक्षणाच्या संधी गमावतात.
- तज्ज्ञांच्या मते, लिहिणं भीतीशी जोडलेलं असेल, सतत टाळाटाळ होत असेल आणि आयुष्यावर परिणाम होत असेल, तर उपचाराची गरज असते.
- हस्ताक्षराच्या भीतीवर CBT थेरपी, हळूहळू लेखनाकडे घेऊन जाणारी पद्धत, शरीरातील ताण कमी करणाऱ्या तंत्रांचा वापर आणि स्वतःबद्दल करुणा निर्माण करणारे सराव उपयुक्त ठरतात.
उपाय आणि पुढचा मार्ग
- शाळांनी वाईट हस्ताक्षराबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षा देणं थांबवायला हवं. विद्यार्थ्यांचं मूल्यमापन सादरीकरणाऐवजी आशयावर करावं. पालक-शिक्षकांनी मुलांना स्वतःसाठी लिहिण्याची जागा द्यावी आणि त्यांच्या प्रयत्नाचं कौतुक करावं.
- डिजिटल साधनं कितीही वाढली तरी हाती लिखाण करणं हे महत्त्वाचं कौशल्य आहे. काही लोकांना टायपिंग आवडेल, तर काहींना खरा आघात असेल. पण योग्य उपचार आणि समजूतदारपणाने ही भीती दूर करता येते.
- शेवटी उद्दिष्ट सोपं आहे. पेन पुन्हा एक साधन बनू द्या, धोका नाही. मुलांना, तरुणांना लिहायला, चुका करायला आणि शिकायला लाज न बाळगता मोकळीक द्या.
- कारण जेव्हा एखाद्याचा हात फॉर्म भरताना थरथरतो, तेव्हा त्या थरथरण्यामागे एक कथा-जखम दडलेली असते आणि ती कथा काळजीपूर्वक पुन्हा लिहिली येऊ शकते!