Donald trump on paracetamol autism risk अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या न कोणत्या कारणामुळे सातत्याने चर्चेत आहेत. मुख्यतः त्यांनी भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्कामुळे आणि अलीकडेच त्यांनी H1B व्हिसा शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे भारतीयांनाच सर्वाधिक फटका बसला आहे. आता त्यांनी केलेल्या एका दाव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी गर्भवती महिलांना एक अजब सल्ला दिला आहे, त्यामुळे ट्रम्प यांना अमेरिकेत टीकांचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या या दाव्यामुळे जागतिक तणावातही वाढ पाहायला मिळत आहे.
ओव्हल ऑफिसमधून बोलताना ट्रम्प यांनी सांगितले, “यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) लवकरच डॉक्टरांना सांगेल की गर्भवती असताना टायलेनॉलचा (पॅरासिटामॉल/एसिटामिनोफेन) वापर मर्यादित ठेवण्यास सांगतील.” त्याच्या वापरामुळे बाळाला ऑटिजमचा धोका उद्भवू शकतो असेही ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ट्रम्प यांच्यावर टीका केली जात आहे. ट्रम्प नक्की काय म्हणाले? खरंच गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक आहे का? त्याविषयी जाणून घेऊयात…
टायलेनॉल म्हणजे काय?
- टायलेनॉल हे अॅसिटामिनोफेन किंवा पॅरासिटामॉलचे ब्रँड नाव आहे.
- हे औषध आपण वेदना कमी करण्यासाठी किंवा ताप कमी करण्यासाठी घेतो.
- हे एक ओव्हर-द-काउंटर औषध आहे, म्हणजेच याचा वापर डोकेदुखी, स्नायू दुखणे, संधिवात कमी करण्यासाठी वापरले जाते आणि सर्दी व फ्लूची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी केला जातो.
नवी दिल्लीतील एम्सच्या बालरोगशास्त्र विभागातील बाल न्यूरोलॉजी विभागाच्या प्रभारी प्राध्यापक शेफाली गुलाटी म्हणतात, “वैद्यकीय देखरेखीखाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरले जाणारे, पॅरासिटामॉल गर्भधारणेदरम्यान वापरण्यासाठी सुरक्षित आहे. प्रत्येक औषध ताप आणि संसर्गाच्या तीव्रतेनुसार तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले पाहिजे. गर्भधारणेदरम्यान ते सहज घेतले जाऊ नये. भारतीय लोक शरीरात थोड्या वेदना जाणवल्या तरीही स्वतः पॅरासिटामॉल घेतात.”
गुलाटी यांच्या मते, गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटामॉल घेतल्यास ते ऑटिझमचे कारक आहे हे दाखवणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा संशोधन आजपर्यंत उपलब्ध नाही. गेल्या वर्षी स्टॉकहोममधील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटने केलेल्या नवीनतम संशोधनाचा उल्लेख डॉ. गुलाटी यांनी केला आहे. त्यामध्ये असे आढळून आले की, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचा वापर मुलांच्या ऑटिझम, एडीएचडी (अटेंशन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर) किंवा बौद्धिक अपंगत्वाच्या जोखमीशी संबंधित नाही.
ट्रम्प यांच्या दाव्यावर तज्ज्ञांचे मत काय?
‘सीएनएन’ने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधकांमध्ये यावर एकमत आहे की ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांच्या संयोगामुळे होतो. तसेच, एसिटामिनोफेन आणि ऑटिझममधील कोणत्याही संभाव्य संबंधांबद्दलची माहिती अद्याप निर्णायक नाही आणि त्यावर अभ्यास सुरू असल्याचे संशोधक सांगतात. अनेक वैज्ञानिक आणि औषधनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या दाव्याशी आपली असहमती दर्शवली आहे.
रविवारच्या निवेदनात, टायलेनॉलची निर्माता कंपनी ‘केनव्ह्यू’ने म्हटले, “एसिटामिनोफेन हे गर्भवती महिलांसाठी त्यांच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान आवश्यकतेनुसार सर्वात सुरक्षित वेदनाशामक औषध आहे. या औषधाशिवाय महिलांसमोर धोकादायक पर्याय उभे राहतात. तापासारख्या परिस्थितीत हे औषध महत्त्वाचे ठरते, कारण या परिस्थितीत आई आणि बाळ दोघांनाही हानी पोहोचू शकते.”
ट्रम्प यांनी लहान मुलांच्या सध्याच्या लसीकरण प्रोटोकॉलवर आणि नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या हिपॅटायटीस बी सारख्या लसींवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहित)
ट्रम्प यांनी ज्यावेळी हे विधान केले, त्यावेळी त्यांच्याबरोबर यूएस हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसचे सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनिअर, एफडीए आयुक्त मार्टी मकारी, एनआयएच संचालक जे भट्टाचार्य आणि सीएमएस प्रशासक मेहमत ओझ उपस्थित होते. या ब्रीफिंगदरम्यान, ट्रम्प यांनी लहान मुलांच्या सध्याच्या लसीकरण प्रोटोकॉलवर आणि नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या हिपॅटायटीस बी सारख्या लसींवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु, त्यांच्या दाव्याला समर्थन देण्यासाठी त्यांनी कोणताही वैज्ञानिक पुरावा दिला नाही.
वैद्यकीयतज्ज्ञ आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) चा समावेश असलेल्या आरोग्य संस्थांनी लहान मुलांच्या लसीकरण आणि ऑटिझममध्ये कोणताही संबंध नसल्याचे वारंवार सांगितले आहे. केनेडी यांनी सांगितले की, आरोग्य आणि मानव सेवा विभाग (HHS) गर्भवती असताना एसिटामिनोफेनच्या वापराबाबत एक सार्वजनिक शिक्षण मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहे. त्यांनी डॉक्टरांना रुग्णांना सल्ला देताना त्यांच्या व्यावसायिक निर्णयावर अवलंबून राहण्याचे आवाहन केले.
या महिन्याच्या सुरुवातीला, टायलेनॉलची निर्माता कंपनी ‘केनव्ह्यू’ने सांगितले की त्यांनी एचएचएस अधिकाऱ्यांशी या विषयावर संवाद साधला आहे आणि गर्भवती महिलांना कोणतेही ओव्हर-द-काउंटर औषध वापरण्यापूर्वी त्यांच्या आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घेण्यास सांगितले आहे. “एसिटामिनोफेन हे गर्भवती महिलांसाठी त्यांच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान आवश्यकतेनुसार सर्वात सुरक्षित असे वेदनाशामक औषध आहे,” असे कंपनीने रविवारी ‘सीएनएन’शी बोलताना सांगितले आहे.
“एक दशकाहून अधिक काळ चाललेल्या संशोधनात हे निश्चित केले आहे की, एसिटामिनोफेनचा ऑटिझमशी संबंध असल्याचा कोणताही विश्वसनीय पुरावा नाही. त्याला प्रमुख वैद्यकीय व्यावसायिक आणि जागतिक आरोग्य नियामकांनी समर्थन दिले आहे. अनेक सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी याचा आढावा घेतला आहे,” असेही कंपनीने म्हटले. दरम्यान, ‘सीएनएन’ने वृत्त दिले की एफडीएने काही ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये उपचारासाठी प्रिस्क्रिप्शन ल्यूकोवोरिन (Leucovorin) मंजूर केले आहे. हे एक उच्च-डोस कॅल्शियम फोलिनिक ॲसिड आहे, ज्याचा सामान्यतः केमोथेरपीमध्ये वापर केला जातो.
अमेरिकेत ऑटिझम असणाऱ्यांच्या संख्येत वाढ
ऑटिझमचे निदान झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, २०२२ मध्ये आठ वर्षांपर्यंतच्या सुमारे ३१ मुलांपैकी एका मुलाला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचे निदान झाले. २०२० मध्ये हा आकडा ३६ मुलांमध्ये एक असा होता, तर २०१५ मध्ये हे प्रमाण अधिक कमी होते. त्यावेळी ६८ पैकी एका मुलाला या आजाराचे निदान होत होते.
तज्ज्ञांनी या वाढीची अनेक कारणे सांगितली आहेत. टेक्सास चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ आणि सेंटर फॉर व्हॅक्सीन डेव्हलपमेंटचे सह-संचालक डॉ. पीटर होतेझ यांनी यावर जोर दिला की, ऑटिझमची कारणे अनेक घटकांवर अवलंबून आहेत. ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे वेगवेगळ्या कर्करोगांमध्ये अनेक जीन्स (Genes) सामील असतात, त्याचप्रमाणे ऑटिझममध्येही किमान १०० जीन्स सामील आहेत.” त्यामुळे एकाच प्रकारे ऑटिझम बरा करता येतो किंवा तो होतो, असा दावा करणे बेजबाबदारपणाचे ठरेल, असे त्यांनी नमूद केले.