इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक हवाई प्रवासावर विशेषत: युरोप, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियामधील उड्डाणांवर लक्षणीय परिणाम होत आहे. इराण, इराक व इस्रायल यांसारख्या देशांवरील महत्त्वपूर्ण हवाई क्षेत्र बंद केले गेल्यामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या उड्डाणांचा मार्ग बदलावा लागत आहे. त्यामुळे इंधनाचा वापर जास्त होत असल्याने तिकिटे अधिक महाग होत आहेत. इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर तणाव वाढल्यामुळे हवाई क्षेत्रावर निर्बंध लावण्यात आले आहेत. जागतिक आणि भारतातील विमान वाहतुकीवर याचा कसा परिणाम होत आहे? तिकिटे आणखी महागणार का? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संघर्षाचा जागतिक विमान वाहतुकीवर कसा परिणाम झालाय?

ब्रिटिश एअरवेज, एमिरेट्स व ड्युश लुफ्थान्सा यांसह अनेक प्रमुख एअरलाइन्स कंपन्यांनी त्यांचे उड्डाण मार्ग बदलले आहेत. १ ऑक्टोबर रोजी इराणी सैन्याने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यामुळे इराकी हवाई क्षेत्रापासून असलेले उड्डाण मार्ग बदलावे लागले आहेत. फ्लाइट रडार २४ नुसार, विमानांची उड्डाणे इराण आणि इराकच्या मार्गाने न केली जाता, सौदी अरेबिया आणि इजिप्तमार्गे केली जात आहेत. याचा परिणाम केवळ संघर्षग्रस्त मार्गावरून जाणार्‍या कंपन्यांनाच नाही तर भारत, आग्नेय आशिया आणि युरोपमधील गंतव्य स्थानांशी जोडण्यासाठी या प्रदेशातून उड्डाण करणाऱ्या युरोपियन आणि आशियाई विमान कंपन्यांवरही झाला आहे. ‘एमिरेट्स’च्या प्रवक्त्यानुसार, “आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहोत आणि ग्राहकांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागेल, याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.” ‘एतिहाद एअरवेज’नेही अशाच प्रकारची चिंता व्यक्त केली आहे.

ब्रिटिश एअरवेज, एमिरेट्स व ड्युश लुफ्थान्सा यांसह अनेक प्रमुख एअरलाइन्स कंपन्यांनी त्यांचे उड्डाण मार्ग बदलले आहेत. (छायाचित्र-फ्लाइट ट्रेडर 24/एक्स)

हेही वाचा : ऑक्टोबर हिटला संक्रमण काळ का म्हणतात? याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

त्याचा भारतातील उड्डाणांवर कसा परिणाम झाला?

इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर मंगळवारी फ्रँकफर्टहून हैदराबाद आणि मुंबईला जाणाऱ्या विमानांना जर्मनीला परतावे लागले. हे विमान लुफ्थान्सा कामणीचे होते. LH 752 व LH 756 या दोन्ही उड्डाणे तुर्कीवरून परत वळवण्यात आली. त्यानंतर लुफ्थान्साने भारतात परतीची उड्डाणे रद्द केल्याने प्रवासी अडकून पडले. लुफ्थान्साच्या प्रवक्त्याने सांगितले, “सध्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही यापुढे इराक, इराण व जॉर्डनच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाही.” संघर्ष सुरू असलेले क्षेत्र टाळण्यासाठी उड्डाणाच्या फेरबदलामुळे काही उड्डाणाच्या प्रवासाच्या वेळेत आठ तासांपर्यंत वाढ झाली आहे. विशेषतः याचा भारत आणि दुबईच्या मार्गांवर परिणाम झाला आहे.

‘स्विस’ या आणखी एका प्रमुख कंपनीनेही त्यांच्या उड्डाण योजनांमध्ये बदल जाहीर केले आहेत. एअरलाइनने सांगितले की, ते किमान ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत इराणी, इराकी आणि जॉर्डनच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करणार नाही. “यामुळे आमच्या दुबई, भारत आणि आग्नेय आशियातील उड्डाणाच्या वेळा १५ मिनिटांपर्यंत वाढतील,” असेही कंपनीने सांगितले. एअर इंडियावरही या संघर्षाचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले, “आमच्या सर्व विमानांचे दररोज सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या जोखमीसाठी मूल्यांकन केले जाते. मग ते मध्य पूर्वेतील असो किंवा इतर कोणत्याही भागातील असो.” आमच्या विमान वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला नसला तरी आम्ही प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

उड्डाणे अधिक महाग होतील का?

हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे इंधनाचा वापर आणि उड्डाणाचा कालावधी यांच्यात वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच एअरलाइन्सच्या ऑपरेशनल खर्चात वाढ होत आहे. या अतिरिक्त खर्चाची भरपाई प्रवाशांना नाहक तिकिटांच्या वाढीव किमतींच्या रूपात करावी लागणार आहे. सिनाई प्रायद्वीप आणि सौदी अरेबिया यांसारख्या पर्यायी हवाई क्षेत्रांद्वारे उड्डाणे पुन्हा मार्गी लावली गेली असली तरी काही मार्गांमध्ये शेकडो किलोमीटरची भर पडत आहे; ज्यामुळे इंधनाच्या खर्चात लक्षणीय वाढ होत आहे. एमिरेट्स आणि कतार एअरवेजने इराक आणि इराणला जाणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. परंतु, काही प्रकरणांमध्ये उड्डाणे पूर्णपणे रद्द करण्यात आली आहेत.

‘फ्लाइट रडार २४’ डेटानुसार, इराणच्या इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पहिल्या दिवसात एकूण १६ एअरलाइन्सची ८१ उड्डाणे वळवण्यात आली. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे कतार एअरवेजने इराक आणि इराणला जाणारी उड्डाणेही स्थगित केली आहेत. इस्तंबूल विमानतळावर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे; जिथे १९ उड्डाणे वळवण्यात आली आहेत. जोपर्यंत तणाव कायम आहे तोपर्यंत पश्चिम आशियातील हवाई क्षेत्रावरील निर्बंध कायम राहू शकतात. इराणने आधीच इस्रायली प्रत्युत्तराच्या अंदाजाने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा कालावधी वाढविला आहे.

हेही वाचा : ‘या’ राज्यात खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मालकांची नावे लावण्याचे आदेश; काय आहेत राज्यांमधील अन्न सुरक्षा कायदे?

यापूर्वीही असे घडले आहे का?

अशी परिस्थिती २०२२ साली उद्भवली होती, जेव्हा युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियन हवाई क्षेत्र बंद करण्यात आले होते. जपान एअरलाइन्स, ब्रिटिश एअरवेज आणि फिनएअर यांसारख्या एअरलाइन्सना रशियन हवाई क्षेत्र टाळण्यासाठी उड्डाण वेळ चार तासांपर्यंत वाढवावी लागली होती. पश्चिम आशियातील हवाई क्षेत्र बंद झाल्याने आता अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी युरोप आणि भारत किंवा आग्नेय आशियातील इराणी व इराकी हवाई क्षेत्रातून थेट मार्गांवर अवलंबून असलेली उड्डाणे आता लांब मार्गावरून जाणार असल्याने ऑपरेशनल खर्च आणखी वाढेल. याचा अर्थ प्रवाशांची प्रवास वेळ वाढणार आहे. बहुतेक एअरलाइन्स कंपन्या शिफारस करीत आहे की, प्रवाशांनी एअरलाइन ॲप्स आणि वेबसाइट्सद्वारे त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासून घ्यावी.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel iran conflict international flights india getting longer and costlier rac