जपानमध्ये असणारा एक विमानतळ पाण्यावर बांधण्यात आला आहे. हा स्थापत्यकौशल्याचा नमुना असल्याचे म्हटले जाते. हा विमानतळ पूर्ण करण्यासाठी सात वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला. जपानमधील या कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (KIX) बऱ्याच काळापासून अभियांत्रिकी चमत्कार मानले जात आहे. हा विमानतळ ओसाका खाडीतील एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आला आहे. मात्र, आता हा विमानतळ समुद्रात बुडत असल्याने चिंता वाढली आहे. कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ बुडण्यामागील कारण काय? या विमानतळाला अभियांत्रिकी चमत्कार का म्हटले जाते? विमानतळ बुडाल्यास काय होणार? त्याविषयी जाणून घेऊयात.

कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ

कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी ३० दशलक्षाहून अधिक प्रवाशांना २५ देशांमधील ९१ शहरांमध्ये जोडणारे एक प्रमुख विमानतळ आहे. १९९४ पासून हे विमानतळ कार्यरत आहे. कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आशियातील सर्वात व्यस्त आणि सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक ठरले आहे. परंतु, जवळजवळ ३० वर्षांच्यानंतर हा विमानतळ बुडत आहे. ‘द साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, हा विमानतळ सुमारे १२.५ फूट बुडाले आहे. विस्तारादरम्यान नंतर जोडले गेलेले दुसरे बेट ५७ फूट खाली गेले आहे. गेल्या वर्षीच अधिकाऱ्यांनी नवीन बेटावरील ५४ वेगवेगळ्या ठिकाणी हे बेट २१ सेंटीमीटर बुडाले असल्याचे नोंदवले आहे, त्यामुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे. समुद्राची पातळी वाढत असल्याने आणि हवामानाच्या घटना वारंवार घडत असल्याने ही चिंता आणखी वाढली आहे. मात्र, हे धोके असले तरीही विमानतळ अजूनही पूर्णपणे कार्यरत आहे. अभियंते हे बेट पाण्याखाली जाण्याचा वेग नियंत्रित करण्याच्या उपायासाठी अहोरात्र काम करत आहेत.

ओसाका प्रदेशात जमिनीची कमतरता असल्याकारणाने आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागातून पाच किलोमीटर अंतरावर मानवनिर्मित बेटावर कान्साई विमानतळ बांधण्यात आले. (छायाचित्र-रॉयटर्स)

कान्साई विमानतळ पाण्यावर का बांधण्यात आले?

  • ओसाका प्रदेशात जमिनीची कमतरता असल्याकारणाने आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागातून पाच किलोमीटर अंतरावर मानवनिर्मित बेटावर कान्साई विमानतळ बांधण्यात आला.
  • हा विमानतळ बांधण्यासाठी सुमारे २० मीटर मऊ गाळाच्या मातीचा पाया तयार करण्यात आला. ही माती अस्थिर असल्याने अभियंत्यांनी माती एकत्रीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी २.२ दशलक्ष उभ्या पाईप ड्रेन बसवल्या आणि स्थिरतेसाठी २०० दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त लँडफिल आणि ४८,००० टेट्रापॉड वापरले.
  • मात्र, अशा अनेक उपाययोजना करूनदेखील मातीचा पाया विमानतळाच्या वजनाने दबला जातोय.
  • मेईजी विद्यापीठातील शहरी नियोजन आणि धोरण विषयाचे प्राध्यापक हिरू इचिकावा यांनी स्पष्ट केले, “बेट आता दरवर्षी १० सेंटीमीटरपेक्षा कमी वेगाने बुडत आहे. परंतु, याचा वेग मंदावत आहे आणि व्यवस्थापित होत आहे,” असे २०२४ च्या ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

जेबी वादळामुळे धोक्याची घंटा वाजली?

२०१८ मध्ये विमानतळाची असुरक्षितता लक्षात आली. जपानमध्ये २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली जेबी वादळामुळे प्रचंड पूर आला. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, वादळामुळे विमानतळाच्या तळघरातील आपत्ती प्रतिसाद केंद्र आणि विद्युत उपकेंद्र पाण्याखाली गेले, या पुरामुळे ५,००० प्रवासी २४ तासांहून अधिक काळ अडकले होते. तेव्हा तिथे वीज आणि अन्नाचीदेखील सोय नव्हती. विमानतळाला भूभागाशी जोडणाऱ्या एकमेव पुलावर एक इंधन टँकरदेखील आदळला आणि त्यामुळे एकमेव रस्त्याचा संपर्क तुटला आणि आपत्कालीन प्रतिसादात अडचणी निर्माण झाल्या. या घटनेमुळे कामकाजात व्यत्यय आला होता आणि अभियंत्यांना प्रमुख डिझाइन घटकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासदेखील भाग पाडले.

विमानतळाच्या बचावासाठी नक्की काय प्रयत्न करण्यात येत आहेत?

‘द स्ट्रेट्स टाईम्स’ आणि ‘द नेशन थायलंड’ (जून २०२४) मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार, दुसरे बेट एकाच वर्षात २१ सेंटीमीटर बुडाले आहे, तर मूळ बेट दरवर्षी सुमारे ४ इंच (१० सेमी) या वेगाने स्थिरावत आहे. मात्र, असे असले तरी भूस्खलन थांबलेले नाही. विमानतळाच्या खालील भाग मजबूत करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी १५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे.

अभियंत्यांनी वीज प्रणाली आणि आपत्ती प्रतिसाद केंद्रांसारखी प्रमुख उपकरणे संभाव्य पूर पातळीपेक्षा जास्त वाढवली आहेत. या उपाययोजनांनी विमानतळ बुडणे थांबणार नाही, कारण ते अशक्य आहे. हिरू इचिकावा यांनी म्हटले, “अभियंते या विमानतळावरील परिस्थितीचे सतत निरीक्षण करत आहेत आणि बुडण्याचे प्रमाण मर्यादित करण्यासाठी काम करत आहेत, परंतु काहीही अशक्य नाही,” असेही ते म्हणाले.

नागोयामधील एक स्मार्ट विमानतळ

कान्साईच्या अनुभवानंतर जपानमधील भविष्यातील विमानतळाच्या बांधकामाला आकार देण्यात मदत झाली आहे. २००५ मध्ये नागोयाजवळ चुबू सेंट्रॅर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले तेव्हा अभियंत्यांनी कान्साई विमानतळातील महत्त्वाचे धडे घेतले आणि अधिक स्थिर जमीन कशी निवडली जाऊ शकेल यावर भर दिला. ‘स्कायट्रॅक्स’च्या मते, चुबू सेंट्रॅरला २०२५ पर्यंत सलग ११ वर्षे जगातील सर्वोत्तम प्रादेशिक विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे विमानतळ नैसर्गिक आपत्तींना आणि हवामान परिस्थितींना तोंड देण्यासाठी अधिक सक्षम आहे.