पंजाबमधील नाभा तुरुंगातून पळालेला कश्मीर सिंग नेपाळमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. कश्मीर सिंग याने २०१५ साली पंजाब युनिटचे शिवसेनेचे सरचिटणीस हरविंदर सोनी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. १५ एप्रिल २०१५ रोजी पार्कमध्ये व्हॉलीबॉल खेळत असताना कश्मीर सिंग आणि त्याच्या तीन साथीदारांनी हरविंदर सोनी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याने देशी पिस्तुलाने सोनी यांच्या पोटात एक गोळी झाडली होती. हल्ल्यानंतर सोनी यांनी कसाबसा पळ काढत आपला जीव वाचवला होता. त्यानंतर जीवघेणा हल्ल्याप्रकरणी कश्मीर सिंगला अटक करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहे कश्मीर सिंग?
कश्मीर सिंग ऊर्फ बलबीर सिंग हा लुधियाना जिल्ह्यातील गलवाडी गावातील आहे. सोनी यांच्यावरील हल्ल्याव्यतिरिक्त कश्मीर सिंग हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी होता. हल्ला करण्यापूर्वी सिंग याला नाभा तुरुंगात पाठवण्यात आले होते, मात्र तो जामीनावर बाहेर पडला होता. तुरुंगात असताना त्याची ओळख खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख हरमिंदर सिंग मिंटू याच्याशी झाली. मिंटू याला २०१४ ला विविध गुन्ह्याअंतर्गत अटक झाली होती. कश्मीर सिंग हा मिंटू याच्या विचारांनी प्रभावित असल्याने त्याने जामीनावर सुटल्यानंतर सोनी यांच्यावर हल्ला केला होता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली. २०२२ च्यादरम्यान सिंग याच्यावर एनआयएकडून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.

नाभा तुरुंगातून कश्मीर सिंगने कसा काढला पळ?
२७ नोव्हेंबर २०१६ ला पोलिसांच्या वेशात १५ शस्त्रधाऱ्यांनी नाभा तुरुंगातील सुरक्षारक्षकांवर बेछूट गोळीबार केला. यावेळी चार गॅंगस्टर आणि दोन दहशतवादी पळाले होते. यामध्ये मिंटू आणि कश्मीर सिंग हे दोन दहशतवादी पळण्यात यशस्वी झाले. या सगळ्यांपैकी मिंटूसह तीन गॅंगस्टरना पुन्हा अटक करण्यात आली होती, तर एकाला ठार मारले होते. मात्र, कश्मीर सिंग अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. २०२३ ला पटियाला कोर्टाने १८ लोकांना या प्रकरणात दोषी ठरवले होते. नाभा जेलब्रेक प्रकरण हे चर्चेत होते, कारण त्यावेळी पळ काढलेल्यांपैकी एकटा कश्मीर सिंग अद्यापही फरार आहे.

नेपाळहून कश्मीर सिंग कसा सक्रिय आहे?
केंद्रीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये सिंग याने दीपक रंगा आणि एका अल्पवयीन व्यक्तीला आश्रय दिला होता. पुढे त्यांनी २०२२ ला पंजाब पोलिस गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर हल्ला केला होता.
जानेवारी २०२३ ला पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी दोघांपैकी एकाला अटक केली होती. तपासादरम्यान त्याने सिंग यानेच हल्ल्यासाठी रसद पुरवल्याची माहिती दिली होती.
नाभा तुरुंगातून पलायन केल्यानंतर सिंग याने पाकिस्तानातील दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा आणि कॅनडातील गॅंगस्टर-दहशतवादी लखबीर सिंग संधू यांच्याशी हातमिळवणी केली होती.
दीपक रंगा याचा नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियानी यांच्या हत्येमध्ये हात असल्याचेही बोलले जात होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khalistani terrorist kashmir singh likely hiding in nepal how he escaped from nabha jail in 2016 ssp