– अन्वय सावंत

फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण… पेले, दिएगो मॅराडोना, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेसी की अन्य कुणी? जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये याबाबत कायम चर्चा सुरू असते. पेले (ब्राझील) आणि मॅराडोना (अर्जेंटिना) यांनी आपापल्या देशांना विश्वचषक जिंकवून दिला, जे मेसी आणि रोनाल्डोला करता आलेले नाही, असे यंदाच्या विश्वचषकापूर्वी म्हटले जात होते. मात्र मेसीच्या अलौकिक कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाने यंदा तब्बल ३६ वर्षांच्या कालावधीनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विश्वविजयानंतर मेसीने क्लब आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व स्पर्धा किमान एकदा जिंकण्याची किमया साधली आहे. त्यामुळे मेसीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतानाच फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जाण्यासाठी आपली दावेदारी अधिकच भक्कम केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेसीसाठी यंदाचा विश्वचषक का महत्त्वाचा ठरला?

मेसीने दीड दशकांहून अधिक काळ स्पॅनिश संघ बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना क्लब फुटबॉलमधील सर्वच स्पर्धा जिंकल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते. एकीकडे तो वैयक्तिक पुरस्कार पटकावत होता, पण अर्जेंटिनाच्या संघाला पुढे नेण्यात त्याला अपयश येत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे चित्र पालटले. गेल्या वर्षी अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अर्जेंटिनाकडून खेळताना कोणतीही मोठी स्पर्धा जिंकण्याची ही मेसीची पहिलीच वेळ ठरली. तसेच तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वाधिक गोल करणारा खेळाडू या दोन पुरस्कारांचा मानकरी ठरला. त्यानंतर कोपा अमेरिका विजेते अर्जेंटिना आणि युरो अजिंक्यपद स्पर्धा विजेते इटली यांच्यात झालेला फिनालिसिमा चषकाचा सामनाही अर्जेंटिनाने जिंकला. तसेच विश्वचषकापूर्वी अर्जेंटिनाचा संघ ३६ सामने अपराजित होता. त्यामुळे त्यांच्याकडून विश्वचषकातही जेतेपदाची अपेक्षा केली जात होती. ३५ वर्षीय मेसीची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असल्याने त्याच्यावर अतिरिक्त दडपण होते. मात्र त्याने या दडपणाला न जुमानता आपला खेळ उंचावला आणि अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा विश्वविजेते म्हणून मिरवण्याचा मान मिळवून दिला.

मेसीच्या कारकीर्दीतील सर्वांत निर्णायक कामगिरी का?

खेळाडू आणि चाहत्यांकडून अनेकदा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपेक्षा क्लब फुटबॉलला अधिक महत्त्व दिले जाते. युरोपातील नामांकित क्लबमध्ये जगभरातील अनेक आघाडीचे खेळाडू एकत्रित खेळतात. त्यामुळे क्लब स्पर्धांचा दर्जा वेगळा असतो, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय संघांमध्ये तारांकित खेळाडूंच्या सभोवती त्याच दर्जाचे खेळाडू असतात असे नाही. जॉर्ज बेस्ट (उत्तर आयर्लंड), रायन गिग्ज (वेल्स) आणि जॉर्ज वी (लायबेरिया) यांसारख्या दिग्गज खेळाडूंना विश्वचषकात खेळण्याची संधीही मिळाली नाही. मात्र असे असले तरी, विश्वचषक ही कोणत्याही खेळातील सर्वोच्च स्पर्धा मानली जाते. त्यामुळे मेसीने क्लब फुटबॉलमधील सर्व स्पर्धा जिंकल्या असल्या, तरी विश्वचषकाच्या विजेतेपदापासून तो वंचित राहिल्याने त्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून उल्लेख केला जाऊ शकत नाही, असे अनेकांकडून म्हटले जायचे. मात्र पेले आणि मॅराडोना यांच्याप्रमाणेच आता मेसीच्या नावावरही विश्वविजेतेपद झाल्याने त्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या दावेदारीला अधिक बळ मिळाले आहे.

मेसीचे वेगळेपण काय?

मेसी हा मॅराडोना यांचा वारसदार म्हणून ओळखला जातो. दोघांच्याही खेळातील जादू आणि कला ही दैवी देणगी होती. त्या देणगीला मेहनतीची साथ लाभली आणि दोन ऐतिहासिक कारकीर्दींचा जन्म झाला. डाव्या पायाने चेंडू खेळवणे, खेळातील कौशल्य, चातुर्य, कोणत्या क्षणी काय करायचे याची समज आणि एक हाती सामने जिंकवण्याची क्षमता ही मेसी आणि मॅराडोना यांच्यातील साम्य. मात्र प्रदीर्घ काळ कामगिरीत सातत्य आणि आकड्यांच्या बाबतीत मेसी हा मॅराडोना यांच्यापेक्षाही वरचढ ठरतो. मॅराडोना यांनी क्लब कारकीर्दीत ५८९ सामन्यांत ३१० गोल केले, तर अर्जेंटिनाकडून ९१ सामन्यांत ३४ गोल नोंदवले होते. दुसरीकडे मेसीने आतापर्यंत क्लब फुटबॉलमध्ये ८६३ सामन्यांत ७०६ गोल, तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये १७२ सामन्यांत ९८ गोल केले आहेत. पेले (कारकीर्दीत एकूण ७२० गोल) आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो (कारकीर्दीत एकूण ८१९ गोल) हे सांघिक खेळापेक्षा वैयक्तिक खेळासाठी आणि गोल करण्याच्या अलौकिक क्षमतेसाठी ओळखले जातात. मात्र मेसीने आतापर्यंतच्या कारकीर्दीत ३५०हून अधिक गोलसाहाय्यांचीही (असिस्ट) नोंद केली आहे. परिपूर्ण खेळ हेच मेसीचे वेगळेपण आहे.

मेसीने कोणकोणते प्रतिष्ठेचे वैयक्तिक पुरस्कार मिळवले आहेत?

मेसीने यंदाच्या विश्वचषकात सात गोल आणि तीन गोलसाहाय्यांची (असिस्ट) नोंद करताना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला मिळणारा ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार जिंकण्याची ही मेसीची (यापूर्वी २०१४च्या स्पर्धेत) दुसरी वेळ ठरली. ‘गोल्डन बॉल’ दोन वेळा जिंकणारा मेसी पहिलाच खेळाडू ठरला. तसेच मेसीने वर्षातील सर्वोत्तम खेळाडूला मिळणारा प्रतिष्ठेचा बॅलन डी ओर पुरस्कार विक्रमी सात वेळा जिंकला आहे. युरोपीय स्पर्धांमध्ये एका हंगामात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला मिळणाऱ्या ‘गोल्डन शू’ पुरस्काराचा मेसी सहा वेळा मानकरी ठरला आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षांचा अपवाद वगळता २००५ पासून त्याची अर्जेंटिनाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड होते आहे. आता त्याने सांघिक पातळीवर विश्वचषकही जिंकत फुटबॉल इतिहासातील स्वत:चे स्थान अढळ केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know what is the greatness of lionel messi in football as compared to other players print exp pbs