वन्यप्राणी आणि त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा याकरिता जनजागृती करण्याच्या उद्देशाने गेल्या सात दशकांपासून आपल्या देशात दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वन्यजीव सप्ताह का साजरा केला जातो?

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी संपूर्ण भारतात राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतरही वन्यप्राण्यांच्या अधिवासात होणाऱ्या मानवी घुसखोरीमुळे, वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे वन्यप्राणी त्यांच्या अधिवासातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. अधिवासाचा ऱ्हास, अवैध शिकार, विकास प्रकल्प यांमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासासह त्यांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक कायदे असले तरीही अंमलबजावणीचा अभाव हे त्यातले दुखणे आहे. त्यामुळे या सर्वांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने देशभरातील संरक्षित क्षेत्रात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. जंगल क्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, हा त्यामागचा खरा उद्देश आहे. कारण पृथ्वीवर राहण्याचा जेवढा माणसांना आहे, तेवढाच हक्क वन्यप्राण्यांनाही आहे.

वन्यजीव सप्ताहाची सुरुवात कशी झाली?

जैवविविधतेचा घटक असलेले वन्यप्राणी हे मानवी जीवनाचाही एक अविभाज्य घटक आहेत. या वन्यजीवांच्या निसर्गातील महत्त्वाविषयी, त्यांच्या जनजागृतीविषयी माहिती व्हावी म्हणून केंद्रीय वन्यजीव मंडळाने वन्यजीव सप्ताहासाठी पुढाकार घेतला. केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थापनेनंतर भारतातील वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी १९५२ साली वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मांडण्यात आली. सुरुवातीला १९५५ साली वन्यजीव दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर १९५७ मध्ये वन्यजीव सप्ताहाची सुरुवात झाली. २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणारा वन्यजीव सप्ताह दरवर्षी एका संकल्पनेवर आधारित असतो. या वर्षीदेखील देशभरात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असून ‘सहजीवनाद्वारे वन्यजीव संरक्षण’ ही संकल्पना आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?

वन्यजीव सप्ताहाचा उद्देश हरवला का?

या सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. तरुण पिढीला याचे महत्त्व कळावे म्हणून शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना यात सामावून घेतले जाते. स्वयंसेवींचा यात सहभाग असतो. मात्र हा सहभाग आता अतिशय कमी झाला आहे. अलीकडच्या काही वर्षांत वन्यजीव सप्ताह साजरा करणे हा एक प्रकारे ‘इव्हेंट’ बनत चालला आहे. या ‘इव्हेंट’मध्ये वन्यजीवांचे व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण कितपत केले जाते, हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सप्ताहातील कार्यक्रमाची आखणी केली जात होती. मात्र आता वन विभाग स्वत:च कार्यक्रम ठरवून मोकळे होत आहे. त्यामुळे वन्यजीव सप्ताह ज्या उद्देशाने सुरू करण्यात आला होता, तो मूळ उद्देश आता हरवत चालला आहे.

स्वयंसेवींसाठीदेखील प्रसिद्धीचा सोहळा?

वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रत्यक्षात काम करणारे स्वयंसेवी आणि स्वयंसेवी संस्थांची फळी अगदी मोजकी आहे. तर प्रसिद्धीसाठी या सर्वांचा वापर करून घेणारी फळी मात्र फार मोठी आहे. ही मोठी फळीच वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाचा देखावा करत प्रसिद्धीमाध्यमावर स्वत:चे कोडकौतुक करते. वन विभागालाही अलीकडच्या काळात त्यांच्या मनाप्रमाणे वागणारी हीच फळी जवळची वाटायला लागली आहे. त्यामुळे काही विशिष्ट स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवी यांनाच सप्ताहात सहभागी करून घेतले जाते. यात वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी प्रत्यक्षात काम करणारी स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवी मात्र बाजूलाच राहतात.

हेही वाचा >>> युद्ध इराण-इस्रायलचं, पण भुर्दंड जगाला! कच्च्या तेलाचे भाव वाढले, भारतावर नेमका काय परिणाम होणार?

हा सप्ताह संकल्पनेनुसार साजरा होतो का?

वन्यजीव सप्ताह दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. त्याचा मूळ उद्देश हा सप्ताह त्या संकल्पनेला अनुसरून वन्यजीव सप्ताह साजरा करणे हा असतो. या संकल्पनेनुसार वर्षभर काम करावे लागते आणि पुढच्या सप्ताहात त्याचा लेखाजोखा मांडावा लागतो. प्रत्यक्षात या संकल्पनेचा विसर हा सप्ताह साजरा करताना वन खात्याला पडलेला दिसतो. कधी तरी पहिल्या दिवशी ही संकल्पना राबवली जाते आणि इतर दिवशी दरवर्षीप्रमाणे चर्चासत्र, छायाचित्र स्पर्धा, विद्यार्थी, जंगलफेरी असे ठरावीक कार्यक्रम राबवले जातात. यात इतर विभाग, सामान्य नागरिक यांना सहभागी करून घेतले जात नाही. सामान्य माणसांपर्यंत विभाग पोहोचत नाही. 

rakhi.chavan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis reason behind celebration of wildlife week print exp zws