मेटा सीईओ आणि फेसबुकचे सह संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी लोकांची माफी मागितली आहे. बुधवारी ऑनलाइन बाल सुरक्षा सुनावणीदरम्यान प्रेक्षकांमधील काही लोकांनी इन्स्टाग्रामवर आत्महत्या आणि मुलांच्या शोषणाला कसे प्रोत्साहन देत आहेत, याचे पोस्टर दाखवले. बऱ्याच पालकांनी त्यांच्या मुलांचे फोटो असलेले फलक घेतले होते, त्यापैकी काहींच्या मुलांनी आत्महत्या केली होती. रिपब्लिकन सिनेटर जोश हॉले यांनी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैयक्तिकरीत्या भरपाई दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. झुकेरबर्ग म्हणाला, ‘तुम्हाला ज्या काही गोष्टींचा सामना करावा लागला, त्याबद्दल मी माफी मागतो.’ फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांच्या सुरक्षेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. मार्कने म्हटले आहे की, हे खूप भयानक आहे. तुम्हाला ज्यातून जावं लागलं होतं त्यातून कोणीही जाऊ नये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेक सीईओंसाठी सुनावणी होती?

यूएस सिनेटच्या न्यायपालिकन समिती ही सार्वजनिक चर्चेसाठी एक मंच म्हणून काम करते, त्यांनी ही सुनावणी घेतली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील चुकीच्या माहितीपासून ते युजर्सचा डेटा परवानगीशिवाय सामायिकरणापर्यंतच्या प्रकरणांवर झुकेरबर्गसह अनेक तंत्रज्ञान नेते यापूर्वी यूएस काँग्रेससमोर हजर झाले आहेत. सुनावणीच्या वेळी दोन्ही डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन सिनेटर्सनी सीईओंना प्रश्न विचारले की, त्यांचे प्लॅटफॉर्म मुलांचे ऑनलाइन संरक्षण करण्यासाठी काय करीत आहेत? तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था स्थापित केली गेली नसल्याचाही युक्तिवाद केला.

रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूझ यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीवरील मेटाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कॅपिटल हिलच्या हाऊस फ्लोअरवर झालेल्या सुनावणीदरम्यान मेटा सीईओला सांगण्यात आले की, इंस्टाग्रामवर १३ ते १५ वर्षे वयोगटातील ३७ टक्के मुलींना एका आठवड्यात आक्षेपार्ह सामग्रीचा सामना करावा लागला. अशा स्थितीत त्यांनी कोणती कारवाई केली आणि कोणाला नोकरीतून काढून टाकले? हा प्रश्न अनेक वेळा विचारल्यानंतर मार्क झुकरबर्ग म्हणाला, मी याचे उत्तर देणार नाही. यावर बोलणे योग्य होईल, असे वाटत नाही. त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करणाऱ्या वकील जोश हॉलेने मेटा बॉसलाही विचारले की, मागे कोण बसले आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हे देशातील ते लोक आहेत, ज्यांच्या मुलांचे सोशल मीडियामुळे नुकसान झाले आहे. त्यातील काही जणांच्या मुलांना जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत तुमच्याकडून कोणती पावले उचलली गेली किंवा कोणाला नोकरीतून काढून टाकण्यात आले याबद्दल बोलले पाहिजे… तुम्ही एखाद्या पीडिताला नुकसानभरपाई दिली का? मार्क झुकेरबर्गने उत्तर दिले की, “मला तसे वाटत नाही.” यावर वकिलाने त्यांना विचारले, तुम्हाला नाही वाटत की, त्यांना या (झालेल्या नुकसानीची) भरपाई द्यावी. मेटाच्या सीईओने दावा केला की, “आमचे काम लोकांना सुरक्षित ठेवणारी साधने तयार करणे आहे. आम्ही आमचे काम गांभीर्याने घेतो, तसेच हानिकारक गोष्टी सापडल्यास तिथून तात्काळ काढून टाकतो, असंही झुकरबर्ग म्हणाला.

या टेक कंपन्यांवर पालकांनी काय आरोप केले आहेत?

सभेतील पालक आणि पालकांच्या असोसिएटेडने प्रेसशी बोलताना सांगितले की, कंपन्यांनी लैंगिक सामग्री मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध केली असून, ॲप्सची व्यसनाधीन वैशिष्ट्ये आणि प्रदर्शनावर अवास्तव खर्च केला आहे. तसेच सौंदर्य मानकांसह आत्महत्या आणि खाण्याच्या विकारांचे बळावू शकतात अशा सामग्रीला प्रोत्साहन दिले आहे. या ॲप्स पाहण्यात प्रेक्षकांमध्ये लक्षणीय वाटा असून, त्यात जास्त करून तरुण, प्रौढ आणि किशोरवयीन आहेत. अलीकडील प्यू रिसर्च सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अमेरिकेतील १८ ते २९ वयोगटातील ७८ टक्के लोक म्हणतात की, ते इंस्टाग्राम वापरतात, जे ६५ आणि त्याहून अधिक वयाच्या (१५ टक्के) लोकांच्या शेअरपेक्षा कितीतरी जास्त आहेत. ३० वर्षांखालील अमेरिकेतील प्रौढांपैकी ६५ टक्के लोक Snapchat वापरत असल्याची तक्रार करतात, ज्याच्या तुलनेत फक्त ४ टक्के वृद्ध लोक आहेत. १८ ते २९ वयोगटातील ६२ टक्के लोक म्हणतात की, ते TikTok वापरतात.

आणि कंपन्यांनी कसा प्रतिसाद दिला?

मुख्यतः, सीईओंनी सांगितले की, ते विद्यमान धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, जसे की, १३ वर्षांखालील मुलांना ॲप्सवर परवानगी न देणे आणि मुलांचे कल्याण पाहण्यासाठी ग्रुपचा विस्तार करणे. विशेष म्हणजे भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) च्या २०२१ च्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, १० वर्षांच्या मुलांपैकी अनुक्रमे ३७.८ टक्के आणि २४.३ टक्के मुलांकडे Facebook आणि Instagram खाती आहेत, वयोमर्यादा असूनही खाते तयार करण्यास मनाई आहे. स्नॅपचे सीईओ इव्हान स्पीगल म्हणाले की, कंपनी अल्पवयीन मुलांसाठी हानिकारक सामग्रीची शिफारस करणाऱ्या ॲप्स आणि सोशल प्लॅटफॉर्मसाठी कायदेशीर दायित्व निर्माण करण्यासाठी देशव्यापी विधेयकाला समर्थन देणार आहे. एक्स सीईओ लिंडा याकारिनो यांनी सांगितले की, ॲप्स मुलांची पूर्तता करत नाही. X अशा विधेयकाला देखील समर्थन देईल, ज्यामुळे बाल शोषणाच्या बळींना टेक कंपन्यांवर दावा करणे सोपे होणार आहे.

अमेरिकेतील राजकारण्यांचे म्हणणे काय?

२०१७ मध्ये ब्लू व्हेल चॅलेंजने लोकांना इतर इंटरनेट आव्हानांप्रमाणेच स्टेप्स फॉलो करण्यासाठी प्रोत्साहित केले होते, दररोज एक कार्य करण्यासाठी विशिष्ट कालावधी दिला जात होता. परंतु ही कार्ये हिंसक होती आणि शेवटी “सहभागी”ला स्वतःला मारण्यास सांगितले जात होते. २०१८ मध्ये असे आढळून आले की, फेसबुकने सुमारे ८७ दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांचा डेटा तृतीय पक्षां (थर्ड पार्टी)बरोबर शेअर करण्याची परवानगी दिली. यामध्ये केंब्रिज ॲनालिटिका या राजकीय विश्लेषण फर्मचा समावेश होता, जो २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय मोहिमेशी जोडला गेला होता. गेल्या वर्षी ३३ यूएस राज्यांनी म्हटले होते की, मेटाने आपल्या प्लॅटफॉर्मच्या धोक्यांबद्दल जनतेची “दिशाभूल” केली आणि जाणूनबुजून तरुण मुले आणि किशोरांना व्यसनाकडे प्रवृत्त केले. सोशल मीडिया वापर करण्यास तरुणांना व्यसन लावले असून, त्यांनी कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आहे.

किड्स ऑनलाइन सेफ्टी ऍक्ट (KOSA) नावाचे द्विपक्षीय विधेयक नुकतेच यूएस काँग्रेसमध्ये सादर करण्यात आले. सीईओंना विचारण्यात आले की, ते या विधेयकाला समर्थन देतील का? त्याला X आणि Snap सीईओंनी सहमती दर्शवली, तर Meta, TikTok आणि Discord सीईओंनी सांगितले की, ते सध्याच्या स्वरूपात समर्थन करणार नाहीत. काही समीक्षकांचे म्हणणे आहे की, विधेयकातील काही तरतुदी भाषण स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा घालू शकतात. सरकारने जारी केलेल्या आयडी कार्डद्वारे युजर्सना त्यांच्या वयाची पडताळणी करणे आवश्यक केल्याने “डेटा भंग होण्याच्या जोखमीसह वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो आणि संवेदनशील माहिती ऑनलाइन ऍक्सेस करण्याची त्यांची इच्छा कमी होऊ शकते, कारण ते असे निनावीपणे करू शकत नाहीत,” असे एका खुल्या पत्रात म्हटले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

‘बिग टेक अँड द ऑनलाइन चाइल्ड सेक्शुअल एक्स्प्लॉयटेशन क्रायसिस’ या मुद्द्यावर अमेरिकन खासदार हे मार्क झुकरबर्ग आणि इतर मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना प्रश्न विचारत होते. खासदारांनी हा प्रश्न केवळ मेटाच्या सीईओंनाच नाही तर टिकटॉक, डिस्कॉर्ड, एक्स आणि स्नॅपच्या सीईओंनाही विचारला आहे. खासदार जेव्हा या कंपन्यांच्या सीईओंना प्रश्न विचारत होते, तेव्हा सर्वसामान्य जनता त्यांच्या मुलांचे फोटो घेऊन हजर होती. त्यांनी निळ्या रंगाची रिबनही घातली होती, ज्यामध्ये ‘STOP Online Harms!’ कोसा पास!’. KOSA म्हणजे Kids Online Safety Act ज्या अंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. मार्क झुकेरबर्ग सुनावणीसाठी पोहोचताच त्यांना चौकशी आणि टीकेला सामोरे जावे लागले. फेसबुकला टीकेला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.

मार्क झुकरबर्ग काय म्हणाले?

जेव्हा झुकरबर्गने पालकांची माफी मागितली तेव्हा हे शब्द मायक्रोफोनमध्ये नव्हते, परंतु लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान ऐकू येत होते. पालकांची माफी मागितल्यानंतर मार्क झुकरबर्ग म्हणाला की, यामुळेच आम्ही इतकी गुंतवणूक करीत आहोत. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर सुधारणा करण्यासाठी चांगले प्रयत्न करत राहू, जेणेकरून तुमच्या कुटुंबासारख्या परिस्थितीला कोणालाही तोंड द्यावे लागणार नाही. मेटा अनेक फेडरल केसेसचा सामना करत आहे. डझनभर स्टेटसने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मानसिक अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुलांना इन्स्टाग्राम आणि फेसबुकचे व्यसन लागले आहे.

सोशल मीडिया कंपन्यांवर काय आरोप?

मेटा सीईओ व्यतिरिक्त स्नॅप इंकचे सीईओ इव्हान स्पीगल यांनीदेखील सोशल मीडियाद्वारे गुन्हेगारी वाढल्याबद्दल पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. अमेरिकेतील वाढत्या ऑनलाइन गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी झाली. मार्क झुकरबर्ग व्यतिरिक्त X, Snap, TikTok यासह अनेक कंपन्यांचे अधिकारी देखील कॅपिटल हिलमध्ये उपस्थित होते. या कंपन्यांवर आरोप आहे की, त्यांनी असे काही फिचर्स तयार केले आहेत, ज्यामुळे बालगुन्हे आणि आत्महत्या यांसारख्या घटना वाढल्या आहेत. खासदार डिक डर्बिन यांच्या मते, २०१३ मध्ये यूएसमध्ये मुलांविरुद्ध ऑनलाइन लैंगिक शोषणाच्या १३८० तक्रारी होत्या, परंतु सध्या हा आकडा लाखांवर पोहोचला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta ceo mark zuckerberg apologizes what exactly is the case vrd
First published on: 04-02-2024 at 19:09 IST