जगातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या प्रमाणात कंपनीतील कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. अस्थिर आर्थिक परिस्थितीमुळे मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन व गूगलसह मोठ्या टेक कंपन्या पुन्हा हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आधारित कार्यालयांचा समावेश करणे हे कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गूगलसारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी जाहीर केलेल्या सर्व नोकऱ्यांविषयी आणि त्यामागील प्रमुख कारणांविषयी जाणून घेऊ.
टेक इंडस्ट्रीवर ले ऑफचे संकट?
२०२५ च्या पहिल्या काही महिन्यांतच तंत्रज्ञान क्षेत्रात टाळेबंदीचा मोठा परिणाम झाला आहे. ५०,००० हून अधिक लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ‘layoffs.fyi’च्या आकडेवारीनुसार, वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत १२६ तंत्रज्ञान कंपन्यांमधील ५३,१०० हून अधिक कामगारांना याचा फटका बसला आहे आणि त्यांनी आपली नोकरी गमावली आहे. अलीकडेच प्रकाशित झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, कंपनी काही दिवसांत सुमारे २० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. आर्थिक संघर्षात असणाऱ्या चिपमेकरने आतापर्यंत जवळ जवळ १५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. इंटेलने नोकरकपातीचे दावे फेटाळले असून, असा दावा केला आहे की, २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत टाळेबंदी सुरू होईल आणि ही टाळेबंदी अनेक महिने सुरू राहील.
मायक्रोसॉफ्टकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात जाहीर
जगातील प्रमुख सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मायक्रोसॉफ्टने या काळात मोठी नोकरकपात जाहीर केली. १३ मे रोजी मायक्रोसॉफ्ट रेडमंडआधारित कंपनीने ६,००० नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. २०२३ नंतरची मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कपात असल्याचे सांगितले जात आहे. मायक्रोसॉफ्टच्या जगभरातील कर्मचाऱ्यांची संख्या २,२८,००० आहे. या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे तीन टक्के कर्मचाऱ्यांवर मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयाचा परिणाम झाला आहे. या कपातीमुळे सर्व स्तरांतील आणि ठिकाणांवरील कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. मुख्य म्हणजे केवळ वॉशिंग्टन राज्यातील जवळजवळ २,००० कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
मायक्रोसॉफ्टने माहिती दिली आहे की, कंपनी ही गतिशील बाजारपेठ म्हणून वर्णन केलेल्या क्षेत्रात स्पर्धात्मक राहण्याकरिता संपूर्ण टीमची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, नुकत्याच जाहीर करण्यात आलेली नोकरकपात कामकाजाशी संबंधित नाही. हा निर्णय व्यवस्थापनाचे स्तर कमी करण्याच्या आणि अभियंत्यांचे गैर-तांत्रिक कर्मचाऱ्यांशी गुणोत्तर वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. उल्लेखनीय म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने कामावर आधारित लहान नोकरकपात जाहीर केली होती. तसेच, गेमिंग आणि विक्री विभागातील नोकऱ्याही कमी केल्या होत्या.
गूगलकडूनही मोठ्या नोकरकपातीची घोषणा
२०२३ मध्ये गूगलकडून मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात आली होती. त्या कपातीनंतर गूगल मोठ्या आणि लहान कर्मचाऱ्यांची संख्या कमी करीत आहे. अलीकडेच कंपनीकडून पुन्हा एकदा कपातीची घोषणा करण्यात आली आहे आणि कपात करणाऱ्या इतर टेक कंपन्यांच्या यादीत गूगलचेदेखील नाव सामील झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला गूगलने त्यांच्या जागतिक व्यवसाय युनिटमधून सुमारे २०० नोकऱ्या कमी केल्या आहेत. ही टीम विक्री आणि भागीदारी विभागात होती. आता कंपनी अधिक सहकार्य वाढविण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक प्रभावीपणे सेवा देण्यासाठी टीमची पुनर्रचना करीत आहे, असे ‘रॉयटर्स’च्या एका वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
गूगलमधील नोकरकपात या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर घडली आहे. सुरुवातीला म्हणजेच एप्रिलमध्ये त्याच्या प्लॅटफॉर्म आणि डिव्हायसेस युनिट (अँड्रॉइड, पिक्सेल, क्रोम)मधील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले, फेब्रुवारीमध्ये अनेक कर्मचारी स्वेच्छेने बाहेर पडले. तसेच, क्लाउड विभागातही नोकरकपात करण्यात आली. सर्वांत मुख्य म्हणजे कंपनीची पालक कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’ने जानेवारी २०२३ मध्ये १२,००० कामगारांना कामावरून काढले. हा आकडा त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सहा टक्के इतका होता.
अमेझॉनकडूनही अनेकांची नोकरकपात
अमेझॉनकडूनही या महिन्यात आणखी एकदा नोकरकपात करण्यात आली. अमेझॉन कंपनीने इको स्पीकर्स, अलेक्सा, किंडल व झूक्स सेल्फ-ड्रायव्हिंग कार यांसारख्या उत्पादनांची देखरेख करणाऱ्या त्यांच्या डिव्हायसेस अँड सर्व्हिसेस युनिटमधील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. उत्पादन रोडमॅपशी अधिक चांगल्या पद्धतीने जुळवून घेण्यासाठी आणि कामकाज सुलभ करण्यासाठी या कपातीची आवश्यकता होती, असे कंपनीचे सांगणे आहे. यापूर्वीही अमेझॉनकडून नोकरकपात करण्यात आली होती.
क्राउडस्ट्राइककडून कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा
सायबर सुरक्षा कंपनी क्राउडस्ट्राइकने आणखी एकदा नोकरकपातीची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या ईमेलमध्ये नमूद केले आहे की, नफा आणि दीर्घकालीन यशावर लक्ष केंद्रित करण्याकरिता ते त्यांच्या पाच टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. कंपनी किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढेल याची अधिकृत संख्या त्यांनी जाहीर केलेली नाही. महसूल कमी होत असल्याने, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कार्यालये समाविष्ट करण्यात आल्याने आणि कंपन्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.