जमिनीवर जीवजंतूंचे अस्तित्व असते याची जाणीव प्रत्येकालाच आहे. परंतु, आकाशातही असेच जीवजंतूं आहेत, असे म्हटल्यास कदाचित लोकांचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. १९२० च्या दशकात शास्त्रज्ञांनी संपूर्ण अमेरिकेमध्ये विमाने उडवून हवेत तरंगणारे बीजाणू पकडले होते. त्याला आज अनेक वर्षे झाली आहेत. नुकतंच केलेल्या संशोधनात आकाशात अनेक अशा गोष्टी आढळून आल्या आहेत; ज्याने संशोधकही चिंतेत आहेत. सोमवारी संशोधकांनी नोंदवले की, त्यांना तब्बल १० हजार फूट उंचीवर, शेकडो विविध प्रकारचे जीवाणू आणि बुरशीचे नमुने मिळवले आहेत. मुख्य म्हणजे, यातील बहुतेक प्रजातीचे जीवाणू लोकांमध्ये रोग निर्माण करण्यास सक्षम असू शकतात. संशोधकांना नक्की काय आढळून आले आणि याचा परिणाम काय होईल? याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थचे संगणकीय पर्यावरणशास्त्रज्ञ झेवियर रोडो म्हणाले, “आकाशात आढळून आलेले एक तृतीयांश जीवाणू आणि बुरशी हे माणसांसाठी रोगजनक ठरू शकतात.” रोडो यांनी चेतावणी दिली की, नवीन अभ्यासाने कोणतेही थेट पुरावे दिले नसले तरी आकाशातील सूक्ष्मजंतू जमिनीवर पडल्यास माणसांमध्ये पसरू शकतात. वार्‍यामुळे रोग पसरू शकतात, त्यामुळे याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

कावासाकी रोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजारात ताप, पुरळ आणि कधीकधी प्राणघातक हृदयविकाराचा झटका येतो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : खरंच अमेरिकेतील स्थलांतरित पाळीव मांजरी खातात? ट्रम्प यांनी वादविवाद सत्रात प्राण्यांचा मुद्दा का उपस्थित केला? नेमकं प्रकरण काय?

कावासाकी रोग आणि हवाईजंतूंचा संबंध

कावासाकी रोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजारात ताप, पुरळ आणि कधीकधी प्राणघातक हृदयविकाराचा झटका येतो. हा आजार नक्की कशामुळे होतो, याविषयी संशोधकांमध्येच मतभेद राहिले आहेत. दोषपूर्ण रोगप्रतिकारक शक्तीमुळे हा आजार होत असल्याचे अनेकांचे सांगणे आहे. कावासाकी रोगाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. रोडो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळून आले की, जपानमध्ये ईशान्य चीनमधून वारे वाहून आले तेव्हा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. तेच वारे जेव्हा कॅलिफोर्नियापर्यंत पोहोचले, तेव्हा तिथेही रुग्णसंख्या वाढली. “वारे यासाठी कारणीभूत असू शकतात अशी अपेक्षा आम्ही केली नव्हती, माझ्यासाठी हा संबंध खरोखरच धक्कादायक होता,” असे रोडो म्हणाले.

कावासाकी रोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजारात ताप, पुरळ आणि कधीकधी प्राणघातक हृदयविकाराचा झटका येतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

चीनच्या ज्या प्रदेशातून वारे येत होते तिथे अनेक खुल्या खड्ड्यांच्या खाणींसह शेत आणि पशुधन आहेत. “संशोधनात या वार्‍यांमध्ये काहीतरी जिवंत असल्याचे संकेत दिले, त्यामुळे मी विचार केला की त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन पाहायचे आणि वार्‍याचा पाठलाग करायचा,” असे रोडो म्हणाले. त्यांच्या टीमने सेसना विमान चीनमधून वाहू लागलेल्या हवेच्या दिशेने उडवले. विमानाच्या बाजूला त्यांनी एक इनलेट उघडला; ज्यामुळे हवा एका ट्यूबमध्ये वाहू लागली आणि हवेतील कण तिथे अडकले. १० हजार फूट उंचीवर १० वेळा उड्डाण केल्यानंतर संशोधकांनी नमुने गोळा केले. त्यानंतर संशोधकांनी नमुने त्यांच्या प्रयोगशाळेत नेले. तिथे त्यांना जैवसुरक्षा सूटमध्ये ठेवण्यात आले, जेणेकरून हे जीवाणू पसरू नये.

अभ्यासातील महत्त्वाचे निष्कर्ष कोणते?

रोडो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हवेतील कणात हाफनियम नावाच्या दुर्मीळ खनिजाची उच्च पातळी आढळली, जी बहुधा चीनमधील खाणींमधून आली होती. नमुन्यांमध्ये बुरशीचे बीजाणूदेखील होते, तसेच सूक्ष्म धूलिकणांना चिकटलेले जीवाणूदेखील होते. दीर्घ प्रवास केल्यानंतरही त्यातील काही जीवाणू जिवंत होते. हेच ते जीवाणू आहेत, जे माणसा-माणसांमध्ये पसरू शकतात. जेव्हा रोडो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सूक्ष्मजंतूंमधून डीएनए काढला, तेव्हा त्यांना कमीतकमी २६६ प्रकारच्या बुरशी आणि ३०५ प्रकारचे जीवाणू सापडले. अनेक सूक्ष्मजंतू वनस्पतींवर किंवा मातीत वाढणाऱ्या गटांशी संबंधित होत्या. काही विशेषत: प्रदूषित मातीत वाढणार्‍या होत्या, तर इतर आपल्या शरीरात राहण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गटांशी संबंधित होत्या.

रोडो यांनी असा अंदाज लावला की, वायव्य चीन हा रोगजनकांचा एक शक्तिशाली स्त्रोत असू शकतो. कारण त्या भागात पिकांची आणि पशुधनाची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. हे शक्य आहे की, मातीतील काही सूक्ष्मजंतू किंवा अगदी खत किंवा सांडपाणी रोगास कारणीभूत ठरू शकतात. व्हर्जिनिया टेकचे एरोबायोलॉजिस्ट डेव्हिड श्माले म्हणाले की, रोग निर्माण करणाऱ्या जंतूंचा संबंध संशोधनातील जिवंत जंतूंशी असू शकतो. त्यांचे खरे स्वरूप शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, मानवी पेशी किंवा प्रयोगशाळेतील प्राण्यांना संक्रमित करून संशोधन करणे.

पुढील संशोधनाला वाव

रोडो म्हणाले की, ते आणि त्यांचे सहकारी मानवी फुफ्फुसाच्या पेशींमध्ये हवेचे नमुने शोधून काढण्यासाठी प्रयोग तयार करत होते. नवीन अभ्यास कावासाकी रोगाचे गूढ शोधू शकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाल, हे शक्य आहे की रोगास एकापेक्षा जास्त रोगजनक चालना देऊ शकतात. हेदेखील शक्य आहे की, मुले केवळ त्याच वाऱ्यामध्ये किंवा वायू प्रदूषणामध्ये श्वास घेत असतील. नक्की काय चालले आहे, याची माहिती अद्याप आम्हालाही नाही. ते आणि त्यांचे सहकारी आता जपानमधील त्यांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत आणि विषाणूंसह अतिरिक्त जीवांचे पुरावे शोधत आहेत.

हेही वाचा : इराणने रशियाला दिले महाविध्वंसक क्षेपणास्त्र, अमेरिका-युक्रेनच्या चिंतेत वाढ; ‘Fath-360’ क्षेपणास्त्र किती घातक?

जरी रोडो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाऱ्यातील रोगजनकांचे स्पष्ट पुरावे सापडले, तरीही ते जंतू एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी रोग पसरवू शकतात का, हा एक मोठा प्रश्न असेल. हवेत १० हजारा फुटांवर असणारे रोगजनक अतिशय विरळ असतात. मात्र, एकच किटाणू आरोग्य बिघडवण्यासाठी पुरेसा आहे. हे विषाणू खूपचं विरळ असतात. आम्हाला त्यांचा अधिक अभ्यास करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New study reveals about the presence of airborne germs in air rac