आपल्या पायाखाली अर्थात जमिनीखाली जगातील सर्वात मोठा जलसाठा दडलेला आहे, त्यालाच आपण भूजल असे म्हणतो. सर्व वापरण्यायोग्य गोड्या पाण्यापैकी ९७ टक्के हे भूजल आहे. परंतु ते नेमके कुठे आहे? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. खडकांच्या आत छिद्रांमध्ये हे भूजल प्रवाहित होते. जेव्हा हे पाणी झऱ्यांच्या स्वरूपात, गुहांमध्ये किंवा इतरत्र पाझरू लागते किंवा पृष्ठभागावर येते अथवा आपण ते वापरण्यासाठी पंपाने काढतो त्याच वेळी ते आपल्याला दिसते. केवळ मानवच नव्हे तर प्राणी- पक्षी यांच्याही अस्तित्त्वासाठी हे भूजल अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र गेल्या काही वर्षांत त्याचेही तापमान वाढू लागले आहे आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला येत्या काही वर्षांत भोगावे लागतील असे अलीकडेच एका संशोधनात लक्षात आले आहे, त्याविषयी…

पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत

एकूणच पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याचे मुख्यत: पृष्ठीय जल आणि अध:पृष्ठीय जल अशा दोन भागांत वर्गीकरण करण्यात येते. भूपृष्ठाखाली असलेले पाणी म्हणजे अध:पृष्ठीय जल होय. त्याला भूजल किंवा भूमिजल असेही म्हणतात. भूस्तराच्या संरचनेमुळे भूपृष्ठाखाली साठलेले पाणी हे डोंगरातील झऱ्याचे पाणी, उथळ व खोल विहिरीतील पाणी, कारंजी इत्यादी माध्यमातून भूपृष्ठावर येते. भूजल हे जमिनीखाली दडलेले असले तरी, जगाच्या असलेल्या एकूणच परिसंस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. हा पिण्याच्या पाण्याचा जगभरातील मुख्य स्रोत आहे.

अधिक वाचा: केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?

भूजल भूगर्भात असल्याने हवामान बदलापासून त्याचे संरक्षण होत असेल असे अनेकांना वाटते. परंतु आता परिस्थती तशी राहिलेली नाही. तापमानवाढीबरोबर अधिकाधिक उष्णता भूगर्भात शिरत आहे. भूपृष्ठाचे तापमान वाढत असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. आता या नव्या प्रयोगामध्ये जगभरातील वेगवेगळ्या बोअरहोल्समध्ये तापमानाचे मोजमाप करण्यात आले. या संशोधनाशी निगडित निष्कर्ष हे अलीकडेच द कॉन्झर्वेशन या अकादमिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसलमधील हायड्रोजिऑलॉजी विभागाचे ग्रॅब्रिएल राऊ, डलहौसी विद्यापीठाचे डेलन आयर्विन, कार्लस्रुहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील सुसान बेन्झ या प्राध्यापकांनी एकत्र येऊन हे संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये काही धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत.

भूजल तापमानातही वाढ

आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या या संशोधन चमूने भूजलाच्या तापमानाच्या नोंदी घेतल्या आणि भविष्यात भूजलाचे तापमान किती वाढण्याची शक्यता आहे त्या संदर्भातील प्रायोगिक मॉडेल तयार केले. सध्या होत असलेल्या हरित वायू उत्सर्जनामुळे यापूर्वीच जगात तापमानवाढ झालेली असून त्यासंदर्भात पुरेसे संशोधन झालेले आहे. या प्रस्तुत संशोधनातही असे लक्षात आले आहे की, २००० ते २१०० या शंभर वर्षांमध्ये जागतिक तापमानामध्ये तब्बल २.७ अंश सेल्सियसने वाढ अपेक्षित असून एकूणच या प्रक्रियेमुळे भूजलाचे तापमानही सरासरी २.१ अंश सेल्सियसने वाढणार आहे.

ही भूजलाची तापमानवाढ त्या त्या प्रदेशानुसार कमी- अधिक असू शकते. पृष्ठभागाच्या तुलनेत भूगर्भातील पाण्याचे तापमान वाढण्यास दशकांचा विलंब होतो. यामागील कारण म्हणजे भूगर्भातील वस्तुमान गरम होण्यास वेळ लागतो. कारण सर्वप्रथम पृथ्वीच्या पृष्ठभागानंतर जमिनीचा भाग तापतो आणि जमिनीखालचा मोठा स्तर तापला की त्यानंतर भूजलाच्या तापमानामध्ये वाढ होते.

घातक परिणाम

भूपृष्ठाखालील तापमानवाढीचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम असल्याचे संशोधकांना लक्षात आले आहे. युरोप- अमेरिका जिथे वर्षातील बराच काळ वातावरण थंड असते तिथे कदाचित ही तापमानवाढ चांगली ठरू शकेल. संशोधनात असे लक्षात आले आहे की, भूपृष्ठाखालील तापमानवाढ महासागरातील तापमान वाढीच्या तुलनेत २५ पट कमी आहे, परंतु तरीही ती लक्षणीय आहे. ही उष्णता दहा मीटर खोलपर्यंत थरांमध्ये साठवली जाते. या उष्णतेपर्यंत पोहचणे सहज शक्य आहे. या अतिरिक्त उष्णतेचा वापर अतिथंड प्रदेशात घरं उबदार ठेवण्यासाठी करता येऊ शकतो. हीट पंपचा वापरून जमिनीखालची उष्णता बाहेर काढता येऊ शकते. जिओथर्मल हीट पंप हे संपूर्ण युरोपमध्ये स्पेस हीटिंगसाठी लोकप्रिय होत आहेत. परंतु या भूजल उष्णतावाढीचे दुष्परिणामदेखील आहेत. आणि हे दुष्परिणाम अधिक घातक आहेत.

अधिक वाचा: खलिस्तानी कट्टरपंथीयांकडून गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना; खलिस्तानी समर्थकांना गांधीजींचा दुस्वास का?

भूगर्भातील पाणी गरम झाले तर…

भूगर्भात आढळणाऱ्या समृद्ध जीवनासाठी ज्यामध्ये भूपृष्ठाखालील जीवजंतूंचा समावेश होतो, त्यांच्यासाठी भूजलाची तापमानवाढ अतिशय घातक आहे. आजपर्यंत, भूजल तापमानात सर्वाधिक वाढ रशियाच्या काही भागांमध्ये झाली आहे. २००० सालापासून रशियातील पृष्ठभागाचे तापमान १.५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक वाढले आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये, सर्वात उथळ थरांमध्ये भूजल तापमानात लक्षणीय फरक अपेक्षित आहे.

ऑक्सिजनची कमतरता

भूजल नियमितपणे जगभरातील तलाव आणि नद्यांना तसेच महासागराला पाणी पुरविते. त्यामुळेच या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या जीवसृष्टीसाठी भूजल आधार स्तंभाप्रमाणे काम करते. एखाद्या नदी किंवा तलावात उष्ण/ उबदार भूजल वाहते, त्याच जलाशयातील पाणी सूर्याच्या उष्णतेमुळेही अधिक तापते. असे ठिकाण त्या परिसंस्थेत राहणाऱ्या प्रजातींसाठी असह्य होते किंवा होऊ शकते. शिवाय उबदार पाण्यात ऑक्सिजनची कमतरता असते. नद्या आणि तलावांमध्ये ऑक्सिजनची कमतरता सातत्याने होत असल्याने तलावाच्या काठांवर मोठ्या प्रमाणात मृत मासे पाहायला मिळण्याच्या घटना जगभरात वाढत आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या मुर्रे-डार्लिंग बेसिनमध्ये कोट्यवधी माशांच्या झालेल्या मृत्यूचे प्रकरण ताजे आहे. अटलांटिक सालमन या थंड पाण्यातील प्रजाती आहेत. परंतु त्यांचा उबदार पाण्याशी जुळवून घेण्याच्या संघर्ष त्यांच्या प्रजनन चक्रावर परिणाम करणारा आहे. सालमन हे एक उदाहरण झाले, पाण्यातील सर्वच प्रजातींच्या प्रजनन चक्रावर या भूजल तापमानवाढीचा गंभीर परिणाम होणार आहे.

भूजल अत्यावश्यक आहे

जगाच्या अनेक भागांमध्ये, लोक पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून भूजलावर अवलंबून असतात. परंतु भूजल तापमान वाढल्याने आपण जे पाणी पितो त्याची गुणवत्ता बिघडू शकते. पाण्याचे तापमान वाढले की, जमिनीखाली असलेली अनेक खनिजे वितळतात त्यात विषारी खनिजांचाही समावेश आहे. एरवी न वितळणारी ही खनिजे वितळून ती पाण्यात मिसळणे हे धोकादायक प्रदूषण असेल. या तापमानाचा परिणाम रासायनिक अभिक्रियांपासून सूक्ष्मजीवांच्या कार्यावर होतो. त्यामुळे हे जल हानिकारक परिणामांना कारणीभूत ठरू शकते. ज्या भागात धातू मिश्रित पाणी आहे. ज्या भागात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आधीच मर्यादित आहे अशा ठिकाणी ही समस्या अधिक भेडसावू शकते. शेतकी, औद्योगिक उत्पादन आणि ऊर्जा उत्पादन यासारखे उद्योग अनेकदा भूजलावर अवलंबून असतात. ते ज्या भूजलावर अवलंबून आहेत ते जर खूप उष्ण, उबदार किंवा जास्त दूषित झाले तर ते या उद्योगांवर परिणाम करू शकते.

द कॉन्झर्वेशनमध्ये प्रसिद्ध झालेला हा शोधनिबंध जागतिक अभ्यासातून आलेला आहे. जागतिक भूजल तापमानवाढ हा हवामान बदलाचा अद्याप उघड न झालेला अतिशय महत्त्वाचा परिणाम आहे. सध्या भूजलावर होणार प्रभाव दिसण्यास उशीर होत असला तरी त्याचे परिणाम दूरगामी आहेत. त्यांचा परिणाम जगभरातील परिसंस्थेवर आणि पिण्याच्या पाण्याचा साठा दूषित होणे असा असणार आहे, हा परिणाम जगाला परवडणारा नाही. कारण पिण्याच्या पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे.