Marathi, Pali, Bengali get classical language status: अलीकडेच केंद्र सरकारने पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. यात पाली आणि प्राकृत या प्राचीन भारतातील लोकप्रिय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. “पाली आणि प्राकृत या भाषा भारतीय संस्कृतीच्या मुळाशी आहेत. या अध्यात्म, ज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या भाषा आहेत… त्यांना अभिजात भाषांचा दर्जा देणे हे भारतीय विचार, संस्कृती आणि इतिहासावर त्यांच्या असलेल्या शाश्वत प्रभावाचा सन्मान करणे आहे,” अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर केली आहे.
प्राकृत: जनसामान्यांची भाषा
‘प्राकृत’ हा शब्द ‘प्रकृती’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ ‘स्रोत’ किंवा ‘मूळ’ असा होतो. प्राकृत भाषेची व्युत्पत्ती संस्कृतमधून झाल्याचे अनेक अभ्यासक मानतात, या अभ्यासकांच्या मते ही (संस्कृत) आधी वेदांची आणि नंतरच्या हिंदू साहित्याची भाषा होती. प्राकृत ही फक्त एक भाषा नाही. याउलट, प्राकृत हा परस्पर संबंधित इंडो-आर्यन भाषांच्या समूहाला सूचित करणारा शब्द आहे, या भाषा इतर नावांनीही ओळखल्या जाऊ शकतात किंवा ओळखल्या जातात. त्या संस्कृतपेक्षा खूप सोप्या होत्या आणि म्हणूनच जनसामान्यांमध्ये वापरल्या जात होत्या (संस्कृत ही उच्च वर्गातील लोक आणि साहित्याची भाषा होती).
अधिक वाचा: Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं?
इतिहासकार ए. एल. बशम यांनी त्यांच्या पुस्तकात ‘द वंडर दॅट वॉज इंडिया’ (१९५४) मध्ये म्हटले आहे की: “बुद्धाच्या काळापर्यंत सामान्य जनसमुदाय संस्कृतपेक्षा खूप सोप्या भाषांचा वापर संवादासाठी करत होता. या प्राकृत म्हणून ओळखल्या जात होत्या. अनेक बोली भाषा तेव्हा अस्तित्वात होत्या.” बशम यांनी प्राकृत भाषा “ध्वनी आणि व्याकरणाच्या बाबतीत संस्कृतपेक्षा खूप सोप्या” असल्याचे सांगितले आहे. याशिवाय, प्राचीन गुप्तपूर्व काळातील बहुतेक शिलालेख, जसे की अशोकाचे प्रसिद्ध शिलालेख (इ.स. पूर्व ३ऱ्या शतकातील), प्राकृत भाषांमध्ये लिहिलेले होते (काही वगळता). शिलालेख आणि फर्माने सामान्य जनतेसाठी असतात, उच्चविद्यावंतांसाठी नसतात, संस्कृत साहित्य उच्चविद्यावंतांसाठी होते. बशम यांनी हेही नमूद केले की “संस्कृत नाटकातील स्त्रिया आणि निम्न वर्गातील पात्रे विविध बोली भाषांमध्ये… औपचारिक प्राकृत भाषेत संवाद साधतात.”
अनेक प्राकृत भाषा
अनेक भाषा आणि बोली भाषांना प्राकृत म्हटले जाऊ शकते. खरं तर, काही विद्वानांनी सर्व मध्य-इंडो-आर्यन भाषांना प्राकृत म्हणून समाविष्ट केले आहे – त्या भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्या आणि कालांतराने आधुनिक भाषांमध्ये विकसित झाल्या… हिंदुस्तानी, मराठी, बंगाली इत्यादी त्याचीच उदाहरणं आहेत.
प्रमुख प्राकृत भाषांमध्ये काही महत्त्वाच्या भाषा अशा आहेत:
मागधी: मौर्यकालीन राजसभेची अधिकृत भाषा, तसेच मागध (आधुनिक बिहार) प्रदेशातील जनतेची भाषा. अशोकाचे शिलालेख या भाषेत होते. पूर्व भारतात या भाषेचा व्यापक वापर झाला आणि कालांतराने ती आधुनिक बंगाली, असमिया, ओडिया आणि बिहारी भाषांमध्ये (भोजपुरी, मागधी, मैथिली) विकसित झाली.
अर्धमागधी: शाब्दिक अर्थ “अर्ध-मागधी”. ही मागधी भाषेची नंतरची आवृत्ती होती जी प्रामुख्याने जैन पंडितांनी वापरली. प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ ए. सी. वूलनर यांनी असे मत व्यक्त केले की, हीच भाषा प्राकृत भाषेचे निश्चित स्वरूप व्यक्त करते, तर इतर रूपे अर्धमागधीचेच विविध प्रकार आहेत (Introduction to Prakrit, १९२८). आज बहुतेक प्राकृत अभ्यासक्रम अर्धमागधी शिकवतात.
शौरसेनी: उत्तर आणि मध्य भारतात वापरली जाणारी भाषा. संस्कृत नाटकांमध्ये स्त्रिया आणि निम्न वर्गातील मंडळी या प्राकृत भाषेत बोलतात असे दाखवले जात असे. नंतर या भाषेचा हिंदुस्तानी, पंजाबी आणि हिंदी समूहातील इतर भाषांमध्ये विकास झाला.
पाली: बौद्ध धर्माचा भाषिक आविष्कार
प्राकृत ही लोकभाषा असल्यामुळे ती जैन आणि बौद्ध धर्मांच्या शिकवणीसाठी योग्य होती. हे धर्म वैदिक परंपरेतील कठोर सामाजिक व्यवस्था आणि अतिरीक्त कर्मकांडांच्या विरोधात होते आणि धर्म सामान्य जनतेसाठी सुलभ करण्याचा प्रयत्न करीत होते. अर्धमागधी व्यतिरिक्त जैन आगमांनीही पाली भाषा महत्वाची मानली. थेरवादी बौद्ध धर्माच्या ग्रंथाची भाषा पालीच होती. बौद्ध धर्मासाठी तिच्या महत्त्वामुळे, पाली ही प्राकृतची सर्वाधिक अभ्यासली जाणारी आवृत्ती आहे.
पाली धर्मग्रंथ तीन मुख्य प्रकारांमध्ये विभागले जातात, त्यास पिटक असे म्हणतात. त्यांचा उल्लेख एकत्रितपणे “त्रिपिटक” असा केला जातो. त्याचा इंग्रजी अर्थ ‘बास्केट ऑफ नॉलेज’ असा आहे:
- विनय पिटक- यात बौद्ध संघाच्या (भिक्षुसंघ) नियम किंवा शिस्तीबाबत चर्चा आहे.
- सुत्त पिटक- हे सर्वात मोठे आहे. यात बुद्धांची प्रवचने आणि उपदेशांचा समावेश आहे, तसेच काही धार्मिक काव्यही आहे.
- अभिधम्म पिटक- हे बौद्ध तत्त्वज्ञानावर अधिक सखोल चर्चा करते.
थेरवादी बौद्ध धर्माची लाट भारतात ओसरल्यानंतरही, पाली ही भाषा धार्मिक भाषा म्हणून श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस, आणि कंबोडिया या देशांत टिकून राहिली, जिथे बौद्ध धर्माचा विकास झाला. पारंपरिकरित्या पालीला मागधी प्राकृतशी जोडले जाते, ज्यात ‘पाली’ या शब्दाचा अर्थ “रेखा किंवा शृंखला” असा आहे, ज्याचा संदर्भ पाली भाषेत रचलेल्या बौद्ध ग्रंथांच्या शृंखलेशी आहे. मात्र, काही आधुनिक विद्वानांचे मत असे आहे की, पाली ही अनेक प्राकृत भाषांची मिश्रण आहे (ज्यात काही पाश्चिमात्य बोलींचाही समावेश आहे), ज्यांना एकत्र करून काही अंशी संस्कृतमध्ये परिवर्तित केले गेले.
© IE Online Media Services (P) Ltd