Thunderstorm impact on Plane : २१ मे रोजी संध्याकाळी दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला गारपीट आणि वादळाचा तडाखा बसला. प्रवाशांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विमानात मोठ्या प्रमाणावर हादरे जाणवत असल्याचे दिसून येत होते. विजांच्या कडकडाटामुळे पडणाऱ्या प्रकाशात विमानातील खिडक्यांमधून बाहेरचे भयावह दृश्य दिसत होते. या विमानातून २२७ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, वैमानिकाने सतर्कता दाखवत श्रीनगरच्या धावपट्टीवर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास विमानाचे आपत्कालीन लँडिग केले. त्यावेळी असे दिसून आले की, गारपीटीच्या तडाख्यामुळे विमानाच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले होते.
“इंडिगोच्या 6E 2142 विमानाला खराब हवामान आणि गारपीटीचा सामना करावा लागला. विमानाने यासंदर्भात एटीसीला आपत्कालीन स्थितीची माहिती दिली होती. आता विमान सुरक्षितरित्या श्रीनगरमध्ये लँड झाले असून सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत,” अशी माहिती श्रीनगर विमानतळ प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली. वादळ आणि गारपीट ही विमानांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. त्यातून यंत्रणा बिघडणे किंवा नियंत्रण गमावण्यासारख्या गंभीर अपघातांची शक्यता असते. त्यामुळे पायलट शक्य तितक्या प्रमाणात वादळी ढगांपासून दूर राहण्याचा किंवा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करतात.
वादळं म्हणजे नेमकं काय?
क्युम्युलोनिंबस ढग हे आकाशातील सर्वात प्रचंड आणि प्रभावी ढगांपैकी एक आहेत. हे ढग मुख्यतः वादळी हवामान, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, पाऊस, गारपीट आणि कधी कधी चक्रीवादळ किंवा वादळ वाऱ्यांचे झंझावात निर्माण करतात. कधीकधी हे ढग ५० हजार फूटांपेक्षा जास्त उंचीपर्यंत जातात, ज्यामुळे आकाशात उघडणाऱ्या विमानांना त्यापासून धोका निर्माण होऊ शकतो.
विमान वाहतुकीला अडथळा ठरणारे वादळांचे प्रकार
- विमान उड्डाणासाठी अनुकूल हवामान आवश्यक असते. मात्र काही प्रकारचे वादळ विमानासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. हवामानशास्त्रानुसार वादळांचे पुढीलप्रमाणे विविध प्रकार आहेत.
आणखी वाचा : China wants Pakistani Donkeys: पाकिस्तानची गाढवं चीनच्या रडारवर; कारण काय?
- सिंगल-सेल वादळ : क्युम्युलोनिंबस ढगामध्ये फक्त एक वादळी पेशी असते. या पेशीमुळे वादळाची निर्मिती होते. साधारणत: हे वादळ कमी वेळ टिकतं, परंतु ते जास्त धोका निर्माण करू शकतं.
- मल्टी-सेल वादळ : या वादळात अनेक पेशी असतात, ज्या वेगवेगळ्या अवस्थेत वादळाची निर्मिती करतात. यामुळेच हे वादळ अधिक काळ टिकते आणि त्याचा परिणाम अधिक गंभीर असतो.
- स्क्वॉल लाईन वादळ : हे मल्टी-सेल वादळांचे एक रूप असून यातील वादळी पेशी शेकडो मैल लांब रांगेत पसरलेल्या असतात. हे वादळ जोरदार वारे, गारपीट आणि विजा घेऊन येते आणि एकाच वेळेस सर्वाधिक क्षेत्रावर परिणाम करते.
- सुपर-सेल वादळ : हे वादळ फिरणारे आणि अत्यंत तीव्र स्वरूपाचे असते. ज्यामुळे मेसोसायक्लोन नावाचा वर चढणारा हवामान भंवर तयार होतो. या वादळांमध्ये विजा, मोठ्या गारांचा समावेश असतो. जे विमानांसाठी सर्वात विध्वंसक व घातक मानले जाते.
- एम्बेडेड वादळ : ही वादळे सामान्य ढगांच्या स्तरामध्ये लपलेली असतात. त्यामुळे ती दृश्यदृष्ट्या दिसत नाहीत आणि हवामान रडारशिवाय ओळखणे कठीण असते. उड्डाणादरम्यान अचानक अशा वादळात विमान अडकल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.
वादळांमुळे विमानावर काय परिणाम होतात?
काही वादळांमध्ये गारपीट होत असल्याने विमानाच्या पंखांवर बर्फ साचतो. परिणामी, विमान हवेत राहण्याची क्षमता कमी होते. शिवाय, विमानाच्या समोरील भागाजवळ बर्फ अडकल्याने त्याची गती कमी होते. विजेच्या प्रहारामुळे विमानाच्या बाह्य भागाला, संचार अँटेना, इलेक्ट्रॉनिक नेव्हिगेशन उपकरणे, चुंबकीय कंपास इत्यादींना नुकसान होते. तसेच काही प्रसंगी पायलट क्षणभरासाठी समोर काहीच दिसत नाही, जे खूपच धोकादायक मानले जाते. डाऊनबर्स्ट, मायक्रोबर्स्ट व अपड्राफ्ट्स – ही हवेच्या तीव्र वर-खाली हालचाल करणारी शक्तिशाली वाऱ्यांची स्तंभ आहेत. विमान जर यामधून गेल्यास वैमानिक त्यावरील नियंत्रण गमावू शकतो.
विंडशेअर हा अचानक दिशादर्शक आणि वेगदर्शक बदल करणारा वारा आहे. विमानाच्या एकाच वेळी डोक्यावरून व पाठीमागून हा वारा गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते. जमिनीपासून कमी उंचीवर हे घडल्यास घातक अपघात होण्याची शक्यता जास्त असते. वादळांचे हे विविध प्रकार आणि त्याचे विमानावर होणारे परिणाम पाहता, विमान चालवणाऱ्या वैमानिकासाठी तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलसाठी योग्य हवामान माहिती आणि सतर्कता ही अत्यावश्यक ठरते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा वादळांपासून शक्य तितके अंतर ठेवणे हेच अधिक शहाणपणाचे ठरते.
‘नो-गो’चा पर्याय नेमका काय आहे?
प्रसिद्ध अमेरिकन वैमानिक अर्नेस्ट के. गॅन यांनी त्यांच्या ‘The Fate is the Hunter’ या पुस्तकात विमान गारपिटीच्या वादळात अडकण्याचा अनुभव सांगितला आहे. ते लिहितात की, अशा वेळी विमानात बसलेल्या व्यक्तींना वाटतं की, आपण जणू काही एखाद्या टिनच्या डब्यात अडकलो आहोत आणि शेकडो मशीनगन्स विमानावर गोळ्या झाडत आहेत. दरम्यान, विमानांना वादळाचा इशारा मिळाल्यानंतर वैमानिकाला लगेचच ‘नो-गो’ म्हणजेच विमान न उडवण्याचा निर्णय घेणे आवश्यक नसतो. कारण,
जर एखाद्या मार्गावर वादळाचा इशारा मिळाल्यानंतर त्या मार्गावर जाणारी सर्व विमानं थांबवली गेली, तर शेकडो उड्डाणं रद्द होतील आणि त्याचा मोठा परिणाम प्रवाशांवर व विमान कंपन्यांवर होईल.
इंडिगो विमानाबरोबर नक्की काय घडलं?
इंडिगोचे 6E 2142 हे विमान वादळी हवामानात अडकल्याने वैमानिकांनी सतर्कता बाळगत आपत्कालीन लँडिग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला वैमानिकांनी पाकिस्तानातील एका विमानतळावर विमान उतरविण्यासंदर्भात तेथील प्रशासनाला मदत मागितली. मात्र, त्यांनी नकार दिल्यानंतर वैमानिकाने वादळातूनच दुसऱ्या विमानतळाकडे प्रवास केल्याची माहिती विमान प्राधिकरणाने निवेदनातून दिली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पाकिस्तानची ही नकारात्मक भूमिका त्यांच्या हवाई क्षेत्रावर असलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर होती.
हेही वाचा : सोन्यावरील कर्जासाठी आता नवीन नियम; ‘आरबीआय’च्या नवीन नियमांचा कर्जदारांवर काय परिणाम होणार?
लाहोर विमानतळानेही नाकारली परवानगी
यानंतर वैमानिकाने लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे काही काळासाठी पाकिस्तानी हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची विनंती केली, परंतु तीही नाकारण्यात आली. पाकिस्तानकडून मिळालेल्या नकारानंतर इंडिगोच्या वैमानिकांनी सुरुवातीला मागे वळण्याचा विचार केला. परंतु, वादळी ढग फारच जवळ असल्याने त्यांनी वादळाच्या दिशेने सरळ जाण्याचा निर्णय घेतला. ‘DGCA’च्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत मागे वळणं धोकादायक ठरू शकतं, कारण विमानाच्या संरचनेवर ताण येतो. त्यामुळे वादळातून सरळ जाणं हा पर्याय अधिक सुरक्षित मानला जातो.
गारपीटीमुळे विमानाचा समोरील भाग तुटला
वादळाच्या आत प्रवेश केल्यानंतर, इंडिगोच्या विमानाला जोरदार वर-खाली होणाऱ्या वाऱ्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागला. त्याचवेळी झालेल्या गारपिटीमुळे विमानाचा समोरील भाग, ज्यामध्ये हवामान रडार असतो तो अचानक तुटला, ज्यामुळे हवामानाशी संबंधित माहिती देणारी यंत्रणा कार्यरत राहू शकली नाही. यादरम्यान विमानाच्या यंत्रणांमध्ये विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि अनेक इशाऱ्यांचे सिग्नल मिळाले.
विमानाचा समोरील भाग तुटल्यानंतरही प्रवाशांच्या सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला नाही. त्यामागचं कारण म्हणजे, प्रवासी बसायचा भाग म्हणजेच केबिन पूर्णपणे बंद होती. त्यामुळे बाह्य भागातील हवेचा हा दाब प्रवाशांपर्यंत पोहोचला नाही. ही घटना भीतीदायक असली तरी, वैमानिकांनी परिस्थितीवर योग्य नियंत्रण ठेवून विमान सुरक्षितपणे लँडिग केल्याने मोठा अनर्थ टळला, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.