Cancer Symptoms in Marathi : ‘कॅन्सर’ असे नाव जरी ऐकले तरी अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. गेल्या काही वर्षांत भारतात कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना कर्करोगाची लक्षणे लवकर समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधा आणि जागरूकतेच्या अभावामुळे कर्करोगाचे निदान अंतिम टप्प्यात असल्यामुळे मृत्युदराचा धोकाही वाढतो आहे. दरम्यान, तरुणांमध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याची कारणे कोणती? कॅन्सरसाठी कोणत्या सवयी कारणीभूत ठरत आहेत? कॅन्सरची लागण होऊ नये म्हणून तरुणांनी नेमकी काय काळजी घ्यावी? त्या संदर्भात जाणून घेऊ…

भारतात दरवर्षी कर्करोगाचे किती रुग्ण आढळतात?

भारतामध्ये दरवर्षी कर्करोगाचे सुमारे १४ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येतात, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आपल्या अहवालात म्हटले आहे. आगामी काळात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, अशी भीतीही वर्तवण्यात आली आहे. साधारणत: महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना कॅन्सरची लागण झाल्याचे आढळते. मात्र, मागील काही वर्षांपासून तरुणांनाही हा जीवघेणा आजार जडत असल्याचे दिसून येत आहे. झपाट्याने बदललेली जीवनशैली, असंतुलित आहार व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन यांमुळे तरुणांना कॅन्सरची लागण होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयसीएमआरच्या अंदाजानुसार, २०२५ पर्यंत देशातील कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या सुमारे १५.७ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०२२ साली ही संख्या १४.६५ लाख इतकी होती. आता त्यात सुमारे १२.५ टक्के वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

तरुणांमध्ये कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण

कर्करोगाचे हे आकडे केवळ एक आरोग्यतांत्रिक संकट दर्शवीत नाहीत, तर संपूर्ण देशासाठी ते सामाजिक व आर्थिक आव्हान असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारतातील प्रत्येक नऊ व्यक्तींमधील एकाला आयुष्यात कधी ना कधी कर्करोगाचे निदान होऊ शकते, असा अंदाज आयसीएमआरच्या अहवालात नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय आकडेवारीनुसार, किशोरवयीन तसेच तरुण आणि प्रौढांमध्ये (साधारणपणे १५ ते ३९ वर्षे) कर्करोगाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असून, एक लाखामागे १०५ प्रकरणे; तर पुरुषांमध्ये ९५ प्रकरणे नोंदली जात आहेत. भारतामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान होण्याचे सरासरी वय ५२ वर्षे; तर अमेरिका आणि युरोपमध्ये ६३ वर्षे आहे. भारतात फुप्फुसाच्या कर्करोगाचे सरासरी वय ५९ वर्षे असून, पाश्चात्त्य देशांमध्ये ते ७० वर्षे आहे.

आणखी वाचा : Cancer Symptoms : महाराष्ट्रातही वाढतोय कॅन्सरचा धोका,’या’ १० लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको; तज्ज्ञ काय सांगतात? 

भारतात कर्करोगाचे वेगळे रूप

देशातील कर्करोगाच्या काही उपचार केंद्रांमध्ये प्रत्येक २० रुग्णांपैकी एक रुग्ण हा ३० वर्षांखालील असल्याचे दिसून आले आहे. ही संख्या फार मोठी वाटत नसली तरी ही संख्या सातत्याने वाढत आहे. कारण- तरुणांचे आयुष्य पुढे अनेक दशकांचे असल्याने त्यांच्यामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्यास त्याचा सामाजिक आणि आर्थिक ताण खूप मोठा असतो. भारतातील तरुणांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाचे स्वरूप पाश्चात्त्य देशांपेक्षा काहीसे वेगळे आहे. डोके आणि मान, पचनसंस्था, स्तन, गर्भाशय, मेंदू व मज्जासंस्था, तसेच रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया, लिम्फोमा) यांसारखे कर्करोग भारतीयांना होत आहेत. याउलट पाश्चात्त्य देशांमध्ये तरुणांमध्ये कोलोरेक्टल, थायरॉईड, मूत्रपिंड व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे.

कर्करोगाची लागण होण्यास कोणते घटक कारणीभूत?

भारतामध्ये एकूणच कर्करोगाची लागण होण्याचा दर एक लाख लोकसंख्येमागे सुमारे १०० प्रकरणे इतका आहे. तरुणांमध्ये हा दर तुलनेने कमी असला तरी तो सातत्याने वाढत आहे. विशेषतः ४० वर्षांखालील महिलांमध्ये काही प्रदेशांमध्ये हा धोका जास्त असल्याचे दिसून येते. कर्करोगाच्या या वाढत्या प्रमाणाला जीवनशैलीतील बदल काही प्रमाणात कारणीभूत आहेतच. त्याव्यतिरिक्त पर्यावरण, आनुवंशिकता आणि आरोग्य सेवा मिळण्यास होणारा विलंब हे घटकदेखील जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

कोणत्या वयोगटाला कर्करोगाचा सर्वाधिक धोका?

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जसजसे वय वाढते, तसतसा कॅन्सरचा धोकादेखील वाढत जातो. याआधी फक्त वयोवृद्धांना कर्करोगाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता २५ ते ३९ या वयोगटातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवी चिंता निर्माण झाली आहे. ३० वर्षांच्या आतील तरुण वयोगटामध्ये कोलोरेक्टल, स्तन आणि मूत्रपिंडाचा कर्करोग झपाट्याने वाढताना दिसत आहे. २० वर्षांखालील तरुणही कर्करोगापासून पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. जरी त्यांचा एकूण धोका कमी असला तरी या वयोगटातही आक्रमक स्वरूपाचे कर्करोग आता अधिक प्रमाणात निदर्शनास येत आहे. जरी या वयोगटातील तरुणांना कर्करोगाचा एकूण धोका कमी असला तरी त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. १५ ते २४ या वयोगटातील किशोरवयीन व तरुणांमध्ये प्रामुख्याने रक्ताचा कर्करोग, हाडांचा कर्करोग व लिम्फोमा दिसून येत आहे.

हेही वाचा : Kidney Failure Causes: किडनी फेल्युअर होण्यासाठी ‘या’ ८ सवयी कारणीभूत; वेळीच आळा घालणं का गरजेचं आहे? 

कर्करोग उद्भभवण्याची नेमकी कारणे कोणती?

देशात ४० वर्षांखालील पुरुषांमध्ये डोके व मान कर्करोगाचे प्रमाण जास्त असून, त्यामागे प्रामुख्याने तंबाखू आणि सुपारीचे सेवन कारणीभूत आहे. तर, ४० वर्षांखालील महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळून येत आहे. तंबाखू, विडी, सिगारेट व गुटखा यांसारख्या गोष्टींचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. भारतात दरवर्षी सुमारे एक लाखापेक्षा जास्त पुरुषांचा तंबाखूजन्य कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने एका अहवालात नमूद केले आहे. केंद्र सरकारने तंबाखूविरोधी कायदे आणि त्याच्या विक्रीवर बंदी आणली असली तरी प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. फक्त तरुण आणि महिलांनाच नव्हे, तर कर्करोगग्रस्त बालकांच्याही संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक आहे. दरम्यान, कर्करोगापासून बचाव करायचा असेल, तर तरुणांनी व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.