Gandhi portrait sold in London for Rs 1.75 cr: महात्मा गांधींचं तैलरंगातील एक दुर्मीळ व्यक्तिचित्र (पोर्ट्रेट) ब्रिटिश कलाकार क्लेअर लीटन यांनी १९३१ साली गांधीजींच्या लंडन भेटीदरम्यान म्हणजेच दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी चितारलं होतं. तेच व्यक्तिचित्र आता १.५२ लाख पाऊंड्स (सुमारे १.७५ कोटी रुपये) एवढ्या मोठ्या किंमतीला विकलं गेलं. हे पोट्रेट गांधीजींनी प्रत्यक्ष बसून काढून घेतलेलं तैलरंगातील एकमेव व्यक्तिचित्र मानलं जातं आणि त्याला लिलावात अंदाजित मूल्याच्या दुपटीपेक्षा अधिक किंमत मिळाली . सुरुवातीला या चित्राची किंमत ५० हजार ते ७० हजार पाऊंड्स (सुमारे ५७ लाख ते ८० लाख रुपये) असेल असा अंदाज होता.
लिलाव विक्रीत सर्वाधिक किंमत
बोनहॅम्स या संस्थेने लिलावाचे आयोजन केलेले होते. त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, हे चित्र गांधीजींनी प्रत्यक्ष समोर बसून रंगवून घेतलेलं एकमेव व्यक्तिचित्र असल्यानं ते सर्वाधिक दुर्मीळ आहे. यापूर्वी हे चित्र कधीही लिलावासाठी आलेलं नव्हतं. ७ ते १५ जुलैदरम्यान ऑनलाइन पार पडलेल्या ‘ट्रॅव्हल अँड एक्सप्लोरेशन’च्या लिलाव विक्रीत हे सर्वाधिक किंमत मिळवणारे चित्र ठरले.
गांधीजी- लीटन भेट
हे दुर्मीळ ऑइल पेंटिंग लीटन यांच्या वैयक्तिक संग्रहात त्यांच्या मृत्यूपर्यंत (१९८९) होतं, त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबाकडे गेलं. १९३१ साली गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी आले होते. त्यावेळेस लीटन यांच्या भेटीदरम्यान हे चित्र चितारले गेले. भारतात घटनात्मक सुधारणा करण्यासाठी ब्रिटिश सरकारने आयोजित केलेल्या परिषदेच्या मालिकेत ही परिषद महत्त्वाची होती. राजकीय पत्रकार हेन्री नोएल ब्रेल्सफोर्ड यांनी गांधीजींना लीटन यांची ओळख करून दिली होती. ब्रेल्सफोर्ड भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये महत्त्वाचे होते.
एका ब्रिटीश पत्रकाराचा गांधींबाबतचा आदरभाव
१९३१ साली नोव्हेंबर महिन्यात क्लेअर लीटन यांनी गांधीजींचं पोर्ट्रेट लंडनमधील अल्बानी गॅलरीजमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनात प्रदर्शित केलं. पत्रकार विनिफ्रेड होल्टबी यांनी या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली आणि त्याबद्दल ‘द स्कूलमिस्ट्रेस या ट्रेड युनियन’ मासिकातील आपल्या सदरामध्ये लिहिलं, असं बोनहॅम्सने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे. होल्टबी यांनी गांधीजींचं एक कुशल वाटाघाटी करणारे आणि विलक्षण राजकारणी म्हणून वर्णन केलं आणि वेस्टमिन्स्टरमधील एका मेजवानीप्रसंगी दिसलेल्या त्यांच्या आयकॉनिक हालचाली आणि व्यक्तिमत्त्वाचं चित्रण केलं आहे. “तो लहान माणूस, डोक्यावर काहीही न घालता, आपल्या पंचामध्ये गुंडाळून बसलेला, मुद्दा अधोरेखित करण्यासाठी नेहमीप्रमाणे एक बोट वर केलेलं आणि ओठ थोडे उघडे …जणू एखादं हसू लपवल्यासारखं. अगदी असंच मी त्यांना काही काळापूर्वी वेस्टमिन्स्टरमध्ये झालेल्या एका मोठ्या मेजवानीमध्ये पाहिलं होतं, जिथे ते पाहुणे म्हणून आले होते,” असं होल्टबी यांनी त्या चित्राच्या संदर्भात लिहिल्याचं बोनहॅम्सच्या निवेदनात म्हटलं आहे.
“ते तिथे एक राजकीय नेता होते, एक कुशल वाटाघाटी करणारे, काँग्रेसचे कुशल नियोजक, एक उत्तम वकील आणि असे राजकारणी जे मित्र आणि शत्रू दोघांच्या मानसशास्त्रावर नेमका कसा प्रभाव टाकावा हे चांगलं जाणतात,” असंही होल्टबी यांनी पुढे लिहिलं आहे.
गांधीजींच्या सचिवाने व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव
यानंतर गांधीजींचे वैयक्तिक सचिव महादेव देसाई यांनी लीटन यांना एक पत्र लिहिलं, जे सध्या या पोट्रेटच्या मागील भागावर लावलेलं आहे आणि कृतज्ञता व्यक्त केली. “गांधीजींचं पोर्ट्रेट तयार करण्यासाठी तुम्ही अनेक सकाळी येथे आलात, हे आमच्यासाठी खूप आनंददायी होतं.” कलाकाराच्या कुटुंबाच्या माहितीनुसार, हे पोर्ट्रेट १९७४ साली सार्वजनिक प्रदर्शनात होतं, तेव्हा एका आरएसएस स्वयंसेवकाने यावर चाकूने हल्ला केला होता. पोर्ट्रेटच्या मागील बाजूस लावलेल्या लेबलनुसार, हे चित्र त्याच वर्षी लाइमन अॅलिन म्युझियम कन्झर्वेशन लॅबोरेटरीमध्ये संवर्धित करण्यात आलं होतं.
२०१७ साली गांधीजींचं एक दुर्मीळ पेन्सिल पोर्ट्रेट लिलावात ३२,५०० पाउंड्स (सुमारे ३७ लाख रुपये) या किंमतीत विकलं गेलं होतं, ही अंदाजित किमतीपेक्षा सुमारे चारपट जास्त होती, असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. अनेक महान व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव त्यांच्या मृत्यूनंतरही विविध कलाकृतींच्या माध्यमातून दीर्घकाळ जगावर राहातो, हे गांधींजींच्या या व्यक्तिचित्राला मिळालेल्या चौपट किंमतीनंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.