What is cannibalism and necrophilia?: नेटफ्लिक्सवर ‘सेक्टर 36’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा नोएडामध्ये घडलेल्या निठारी हत्याकांड या सत्यघटनेवर आधारित असल्याची चर्चा आहे. ही घटना म्हणजे हत्याकांडाची मालिका होती. हे हत्याकांड २००६ साली पहिल्यांदा उघडकीस आलं. विक्रांत मेस्सी अभिनीत ‘सेक्टर 36’ हा ओटीटी सिनेमा या हत्याकांडाच्या मालिकेवर आधारित आहे. या प्रकरणाच्या घटनाक्रमाची आठवण करून देणारा हा लेख.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेटफ्लिक्सवरील ‘सेक्टर 36’, या ओटीटी सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य निंबाळकर यांनी केले आहे. यात विक्रांत मेस्सी आणि दीपक डोब्रियाल हे प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या तरी या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळत असून २००५-०६ च्या कुप्रसिद्ध निठारी सिरीयल किलिंग्जच्या चित्रणासाठी त्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. या प्रकरणात नेमके काय घडले हेच जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

मुली नाहीशा होत होत्या… तक्रारी ऐकून घेतल्या जात नव्हत्या

हे साल २००३ होत… नोएडाच्या मध्यभागी असणाऱ्या निठारी या शहरवजा गावातील स्त्रिया- मुली बेपत्ता होत होत्या. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याच्या तक्रारी वाढत होत्या आणि हे प्रमाण नेहमीपेक्षा खचितच वेगळे होते. अनेक प्रकरणांमध्ये, नोएडा पोलिसांनी तक्रारी दाखल करण्यास नकार दिला. ज्या प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल झाल्या, त्यातही तपासकर्त्यांना काहीच यश मिळाले नाही. २००६ साली एका उद्विग्न पित्याने आपली मुलगी बेपत्ता झाली म्हणून पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी असा दावा केला की, तिच्या बेपत्ता होण्याच्या दिवशी ती नोएडातील सेक्टर-३१ मधील मोनिंदर सिंग पंढेर यांच्या घरी गेली होती. तरीही पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही. शेवटी त्या बेपत्ता मुलीच्या पित्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अधिकृत निवासस्थानी गोंधळ घातला आणि त्यानंतर त्या पित्याची तक्रार दाखल झाली. बेपत्ता झालेल्या मुलीच्या फोनचा मागोवा घेतल्यानंतर पोलिसांना सुरिंदर कोली याचा सुगावा लागला. सुरिंदर कोली हा त्या वेळी पंढेर यांच्या घरात घरकाम करणारा मदतनीस होता. कोलीला अटक करण्यात आली, परंतु लवकरच जामिनावर सोडण्यात आले.

अधिक वाचा: Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं?

मानवी अवशेषांचा शोध आणि एक धक्कादायक खुलासा

त्यानंतर, २००६ साली डिसेंबर महिन्यात, पंढेर यांच्या डी-५ घराच्या मागे असलेल्या ड्रेनमध्ये मानवी सांगाड्यांच्या अवशेषांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या. या अवशेषांबरोबरच काही बेपत्ता पीडितांचे सामानही आढळून आले. यामुळे पोलिसांनी २९ डिसेंबर रोजी कोली आणि पंढेर यांना अनेक स्त्रिया आणि मुलांचे अपहरण व हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले.

नोएडा पोलिसांची पूर्वीची निष्क्रियता आणि अक्षम्य दुर्लक्ष उजेडात आल्यामुळे हे प्रकरण १० जानेवारी २००७ रोजी तपासासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (CBI) सोपविण्यात आले. सीबीआयच्या फोरेन्सिक्स टीमने पंढेर यांच्या घराची पुढील भागाची तपासणी केली. त्यात आणखी काही सांगाड्याचे अवशेष आणि भयानक गुन्ह्यांचे पुरावे उघडकीस आणले. १ मार्च रोजी, सीबीआयने कोलीचा कबुलीजबाब एका न्यायाधीशाच्या उपस्थितीत नोंदवला. घरकाम करणाऱ्या कोलीने हत्यांची सविस्तर कबुली दिली. त्याने पीडितांना डी-५ मध्ये आणून गळा दाबून मारले होते आणि नंतर ‘त्यांच्या शरीराचे भाग चिरून, शिजवून खाल्ले’ असे त्याने सांगितले.

नोएडा पोलिसांनी पंढेर आणि कोली यांच्यावर १९ वेगवेगळ्या मुलींसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांसाठी १९ एफआयआर- FIR दाखल केले होते. सीबीआयने त्यापैकी १६ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले. २००७ साली दाखल केलेल्या एका प्रकरणाच्या आरोपपत्रात, सीबीआयने असा आरोप केला की, कोलीमध्ये नेक्रोफिलियाक आणि कॅनिबलिस्टिक प्रवृत्ती होती.

नेक्रोफिलिया म्हणजे काय?

नेक्रोफिलिया (Necrophilia) हा एक गंभीर मानसिक विकार आहे. यात व्यक्तीला मृतदेहांप्रती असामान्य आणि विकृत लैंगिक आकर्षण असते. हा विकार पॅराफिलियाच्या श्रेणीत मोडतो. हे एक अनैसर्गिक वर्तन मानले जाते. Necrophilia हा एक गुन्हा आहे आणि यावर कठोर कायदेशीर शिक्षा दिली जाते. नेक्रोफिलिया या विकारामध्ये व्यक्तीला मृत व्यक्तीच्या शरीराशी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते किंवा तसा प्रयत्न केला जातो. या विकाराच्या विविध प्रकारांमध्ये, काही व्यक्तींना केवळ मृतदेह पाहून किंवा त्याच्या जवळ राहूनच आनंद मिळतो, तर काही व्यक्तींना प्रत्यक्ष लैंगिक क्रिया करण्याची इच्छा होते.

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, नेक्रोफिलिया हा विकार बालपणातील आघात, मानसिक आजार किंवा लैंगिक विकारांमुळे विकसित होऊ शकतो. या विकाराची कारणे सखोल मानसिक विश्लेषणातून समजतात आणि यावर योग्य उपचार करणे अत्यावश्यक आहे. उपचारांच्या प्रक्रियेमध्ये मानसोपचार, औषधोपचार, आणि मानसोपचारांशी संबंधित थेरपीचा वापर होतो. नेक्रोफिलियासाठी अनेक देशांमध्ये कठोर कायदे आहेत आणि याचे उल्लंघन केल्यास व्यक्तीला दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. एकूणच, नेक्रोफिलिया हा अत्यंत गंभीर मानसिक विकार आहे. जो बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. समाजात याबद्दल जागरूकता वाढवणे आणि योग्य उपचाराची व्यवस्था करणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा रुग्णांना योग्य मदत मिळू शकेल आणि समाज सुरक्षित राहील.

कॅनिबलिस्टिक म्हणजे काय?

कॅनिबलिस्टिक म्हणजे स्वजातीभक्षक, म्हणजेच एखाद्या व्यक्तीने किंवा प्राण्याने आपल्या स्वतःच्या जातीतील इतर व्यक्ती किंवा प्राण्यांचे मांस खाणे. मानवांच्या संदर्भात, कॅनिबलिझम म्हणजे एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचे मांस खाणे. हा प्रकार अत्यंत विकृत, अस्वाभाविक आणि अनैतिक मानला जातो. कॅनिबलिझम हा जगभरात कायदेशीरदृष्ट्या गुन्हा आहे आणि हे वर्तन अत्यंत निंदनीय समजले जाते.

अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपती बालाजीचे घेतले होते दर्शन; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

लांबलचक न्यायालयीन खटले आणि निर्दोष मुक्तता

१३ फेब्रुवारी २००९ रोजी कोली आणि पंधेर या दोघांनाही विशेष सीबीआय न्यायालयाने १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर, पंढेरची निर्दोष मुक्तता करण्यात आली परंतु कोलीला फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आली. त्यानंतर कोली याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने २०११ साली त्याचे अपील फेटाळले आणि त्यानंतर २०१४ साली पुनर्विचार याचिका फेटाळली. परंतु जानेवारी २०१५ साली अलाहाबाद हायकोर्टाने ‘दया याचिका निकाली काढण्यात अवास्तव विलंब’ केल्याचे कारण देत कोलीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली.

जन्मठेपेच्या शिक्षेमुळे कोली तुरुंगात आहे. २०१७ साली, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पंधेर आणि कोली याला महिलांवर बलात्कार आणि हत्येसाठी फाशीची शिक्षा सुनावली होती. मुलींच्या वडिलांच्या तक्रारींमुळे पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘असमाधानकारक’ पुरावे, सदोष प्रक्रिया, शक्यतांमधील अनिश्चिती, छळ यांचा हवाला देत कोलीला १२ खटल्यांतून आणि पंढेरला दोन खटल्यांतून निर्दोष ठरवले. पंढेर २० ऑक्टोबर रोजी तुरुंगातून बाहेर आला, तर कोली अद्याप जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sector 36 on netflix the chilling story of the nithari murders what is cannibalism and necrophiliasvs