Was water used to build pyramids? २०१० साली इजिप्तमध्ये पुरातत्त्ववेत्त्यांना खुफूच्या पिरामिड्सजवळ कारागीर आणि कामगार वस्तीच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे केवळ कुशल कामगारांनीच पिरॅमिडचं बांधकाम केलं, असं मानलं जात होतं. परंतु, नव्याने सापडलेल्या पुराव्यांमुळे प्राचीन इजिप्तमध्ये पिरॅमिड बांधण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, हे आता उघड झालं आहे. या नव्या शोधामुळे पुरातत्त्वज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा नवा शोध काय सांगतो याचाच घेतलेला हा आढावा.

प्राचीन इजिप्तमध्ये पिरॅमिड बांधण्यासाठी पाण्याच्या शक्तीवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यात आला होता हे उघड झालं आहे. पुरातत्त्वज्ञांनी जोझर पिरॅमिडच्या (Pyramid of Djoser) सभोवताली असलेली एक प्रगत जलव्यवस्थापन प्रणाली शोधून काढली आहे. इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिड्स हे अनेक वर्षांपासून इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ आणि जिज्ञासूंना भुरळ घालत आहेत. जोझर पिरॅमिडच्या सभोवताली सापडलेल्या विस्तृत जलव्यवस्थापन प्रणालीमुळे प्राचीन इजिप्तमधील बांधकाम तंत्रज्ञानाबद्दलचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. या शोधामुळे इजिप्तच्या पूर्वसुरी बांधकामकारांनी वापरलेली तांत्रिक कौशल्यं आपल्या कल्पनेपेक्षा किती प्रगत होती, हे उघड झालं आहे.

वाळवंटात पाणी साठवण्यासाठी बांधलेले दगडी धरण

सक्काराच्या मध्यभागी असलेल्या Gisr el-Mudir या भव्य दगडी रचनेने संशोधकांना अनेक वर्षांपासून गुंतवून ठेवलं आहे. सुमारे १,१८१ फूट लांब असलेली ही आयताकृती संरचना इजिप्तमधील सर्वात जुन्या दगडी बांधकामांपैकी एक मानली जाते. अलीकडेच CEA Paleotechnic Institute मधील झाविए लाँद्रो (Xavier Landreau) आणि त्यांच्या संशोधन टीमने या रचनेचा सखोल अभ्यास केला. त्यांनी PLOS ONE या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या संशोधनात म्हटले आहे की, ही रचना केवळ धार्मिक विधींसाठी किंवा संरक्षणासाठी बांधलेली भिंत आहे, असा समज होता.

पुराचे पाणी अडवण्यासाठी वापर

परंतु, ही केवळ धार्मिक संरचना नाही. ही रचना आसपासच्या वाळवंटातील नद्या (wadis) आणि ओढ्यांमधून येणाऱ्या पुराच्या पाण्याला अडवण्यासाठी वापरली जात होती. संशोधकांनी त्या भागातील उतार, प्राचीन जलमार्गाचा अभ्यास करून त्या भागाचा जलप्रवाह पुन्हा संकल्पित केला. या संरचनेद्वारे जवळपास १०५ मिलियन गॅलन पाणी साठवता येत असावं. हा साठा त्या काळातील मोठ्या बांधकामांसाठी पुरेसा होता. हंगामी पुराच्या काळात हे धरण भरलं की, त्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे खालच्या भागातील नैसर्गिक खाचांमध्ये गाळही साचत असे. यामुळे पुढील शेती किंवा बांधकामासाठी उपयुक्त माती उपलब्ध होत असे. एकूणच हे ठिकाण भूगर्भशास्त्र आणि जलव्यवस्थापन यांचाही विचार करून निवडले गेले होते.

पिरॅमिड्सच्या जलतांत्रिक बांधकामाची पद्धत कशी होती?

संपूर्ण प्रणाली चालवण्यासाठी केवळ पुरेसे पाणी साठवणं गरजेचं होतं, पण तेवढ्यानेच चुनखडीच्या दगडांचे अवजड तुकडे उचलता येत नव्हते. यासाठी मुख्य यंत्रणा जोझरच्या पिरॅमिड संकुलाच्या खोल भागात होती. या स्मारकाच्या दक्षिणेकडे एक मोठी खाच आहे, ही खाच खडकात खोदलेली आहे. यामध्ये एकमेकांशी जोडलेल्या अनेक टाक्या आणि कप्पे आहेत. या जाळ्याला ‘डीप ट्रेंच’ असं म्हटलं जातं. हे एक प्रकारचं जलशुद्धीकरण यंत्र म्हणून काम करत होतं. मोठे गाळाचे कण खाली बसून हळूहळू पाणी स्वच्छ होत जात असे आणि नंतर ते पुढे नेलं जात असे.

पाण्याच्या दाबाचा वापर

हे शुद्ध केलेलं पाणी कदाचित पिरॅमिडच्या खाली असलेल्या उभ्या यंत्रणेसाठी वापरलं जात असावं. दोन उभ्या दांड्यांना एका ६५६ फूट लांब भूमिगत मार्गाने जोडलेलं होतं. त्यामध्ये एक तरंगणारी यंत्रणा बसवलेली होती. चुनखडीचे अवजड तुकडे या तरंगणाऱ्या प्लॅटफॉर्मवर ठेवले जात आणि पाण्याचा दाब वाढवून ते वर उचलले जात. एकदा दगड हव्या त्या उंचीवर गेला की, तो पिरॅमिडच्या वरच्या थरांवर सरकवला जात असे.

गॅलऱ्या, भूमिगत कप्पे आणि पिरॅमिडमधील जलवाहिन्यांमध्ये दिसणाऱ्या रचना या संकल्पनेला पाठिंबा देतात. यापैकी काही ग्रॅनाईटच्या वस्तूंना पूर्वी केवळ दफनविधींसाठी वापरण्यात आलं असं मानलं जात होतं. पण आता असं आढळून आलं आहे की, त्यामध्ये प्रवाह नियंत्रण आणि सीलिंग सिस्टीमची वैशिष्ट्यं दिसून येतात. संपूर्ण व्यवस्था एका जलचालित लिफ्टसारखी कार्य करत होती. ज्यामध्ये पाण्याचा दाब वापरून यांत्रिक श्रम कमी केले जात होते.

फॅरो राजवटीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान

पाण्याच्या दाबावर आधारित पिरॅमिड बांधकामाची कल्पना धाडसी वाटत असली, तरी ती थेट क्षेत्रीय निरीक्षणांवर आधारित आहे. धरण, टाक्या, गॅलऱ्या आणि उभ्या दांड्यांची रचना एक सुसंगत जलतांत्रिक साखळी असल्याचं स्पष्ट दिसून येतं. प्राचीन इजिप्तमध्ये तंत्रज्ञान कमी प्रगत होतं, असं मानलं जातं. पण प्रत्यक्षात इजिप्त मधील लोकांना जलसंधारणाचे तंत्र अवगत होते. सिंचन कालवे, लाकडी दरवाजे, शेतीसाठी बांधलेली धरणं हे सगळं त्यांची प्रगत जलव्यवस्थापन कौशल्यं सिद्ध करणारं आहे.

या संशोधनात असंही दिसून आलं आहे की, या पद्धतीमुळे भव्य बाह्य उतार रॅम्प तयार करण्याची गरज कमी झाली. त्यामुळे श्रम आणि वाहतूक यंत्रणांवरील ताण कमी झाला. यामुळे काम अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि अचूक झालं.

विकसित तंत्रज्ञानाचा परिणाम

त्या काळासाठी खूपच प्रगत असलेल्या या अभियांत्रिकी पद्धतीमुळे संशोधकांना आता इजिप्तच्या जुन्या साम्राज्यकालीन इतर स्मारकांचा पुनर्विचार करावा लागतो आहे. जोझरचा पिरॅमिड आजवर एक प्रयोगात्मक नमुना म्हणून ओळखला जात असे, पण प्रत्यक्षात तो एक अत्यंत विकसित तंत्रज्ञानाचा परिणाम होता. सक्कारामधील सापडलेल्या जलव्यवस्थापनाच्या अवशेषांमुळे इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आजवर पिरॅमिड्सचा अभ्यास मुख्यतः धार्मिक प्रतीक किंवा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने केला जात होता. पण सक्कारामध्ये सापडलेली इतकी मोठी आणि एकत्रित जलतांत्रिक प्रणाली ही मात्र एक नवी दिशा दाखवते.

पर्यावरणपूरक विचार

या शोधामुळे असं समजतं की, त्या काळातील बांधकाम मजूर केवळ धार्मिक उद्दिष्टांसाठी काम करत नव्हते, तर त्यांनी पर्यावरण आणि उपलब्ध संसाधनांनुसार एक शाश्वत तांत्रिक व्यवस्था उभी केली होती. हा फक्त धार्मिक प्रकल्प नव्हता, तर त्या काळातील तंत्रज्ञानावर आधारित एक व्यापक आणि पर्यावरणाशी सुसंगत विचार होता.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर

पुरातत्त्वशास्त्र, जलतांत्रिक विज्ञान आणि भू-तांत्रिक तंत्रज्ञान यांचा संगम असलेल्या या आंतरशाखीय दृष्टिकोनामुळे आपण भूतकाळाला नव्या दृष्टीने समजू लागलो आहोत. या संशोधनामुळे त्या काळातील कामकाजातील सुसूत्रता, सामग्रीचे काटेकोर व्यवस्थापन आणि भू-संपत्तीचा अचूक वापर समोर येतो. पिरॅमिड्स हे केवळ मोठ्या प्रमाणावर कामगारांनी केलेलं श्रमप्रधान बांधकाम नव्हतं, तर त्यामागे कमी कौतुक झालेलं, पण अतिशय प्रगत अशी तांत्रिक बुद्धिमत्ता होती, हे आता मान्य करावं लागेल. या दृष्टिकोनामुळे प्राचीन इजिप्तमधील नवोपक्रमशीलता अधोरेखित होते आणि इतर भव्य प्राचीन स्थळांचाही नव्याने शोध घेण्याचं आवाहन केलं जातं, ज्यामध्ये अशाच प्रकारच्या दडलेल्या किंवा विस्मृतीत गेलेल्या जलव्यवस्थापनाच्या प्रणाली सापडू शकतात. इजिप्तच्या प्राचीन जलतांत्रिक कौशल्याचा हा शोध केवळ पिरॅमिड्सच्या बांधणीच्या समजुतीतील बदल नाही, तर त्या काळातील तंत्रज्ञानाच्या एकंदर प्रगत स्तरावरही प्रकाश टाकतो.