Moonlighting trend is rising in India अमेरिकेत सध्या एका भारतीय अभियंत्याची चर्चा सुरू आहे. सोहम पारेखवर एकाच वेळी तब्बल पाच कंपन्यांमध्ये काम करून, दरमहा अडीच लाख रुपये कमवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिलिकॉन व्हॅलीच्या काही नामांकित स्टार्टअप्समध्ये तो कामाला होता. तो कंपनीच्या मालकांना न सांगता, एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये पूर्णवेळ नोकरी करत होता. या प्रकरणामुळे मूनलायटिंग हा प्रकार आणखी एकदा प्रकाशझोतात आला आहे. मिक्सपॅनेलचे सह-संस्थापक व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहेल दोशी यांनी सोहम पारेखबाबत धक्कादायक माहिती उघड केल्यानंतर संपूर्ण टेक इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. इतर अनेक देशांमध्ये मूनलायटिंग ही संकल्पना प्रचलित आहे; मात्र भारतात हा एक वादग्रस्त विषय आहे. गेल्या काही वर्षांत भारतात याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. यामागील कारण काय? काय आहे मूनलायटिंग? त्याविषयी जाणून घेऊयात.

भारतातील आयटी क्षेत्रात का वाढतेय मूनलायटिंगचे प्रमाण?

  • कोविड-१९ साथीच्या काळात लागलेल्या टाळेबंदीनंतर वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढले आहे. अनेक कंपन्यांनी आजही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे.
  • मात्र, तेव्हापासूनच भारतात मूनलायटिंगचे किंवा पूर्णवेळ नोकरी सुरू असताना दुसरी नोकरी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
  • ‘फर्म ऑथब्रिज’च्या मते, प्रत्येक १०० उमेदवारांपैकी पाच जणांकडे आज दोन नोकऱ्या आहेत. त्यापैकी सुमारे ९० टक्के प्रकरणे आयटी क्षेत्रातील आहेत.
  • बहुतांश प्रकरणे तेलंगणा, कर्नाटक व तमिळनाडूमधील असल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ (टीओआय)ने दिले आहे.
मूनलायटिंग हा प्रकार आणखी एकदा प्रकाशझोतात आला आहे. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

बॅकग्राऊंड व्हेरीफिकेशन करणाऱ्या फर्म ‘ऑनग्रिड’ने २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत २३,००० रोजगारांची पडताळणी केली आहे; तर गेल्या वर्षी ही संख्या २६,००० होती. अशा तपासण्यांमध्ये वाढ होण्यामागील मुख्य कारण म्हणजे मूनलायटिंग. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत फर्मच्या तपासणीत अशी २,९०० प्रकरणे आढळली आहेत. २०२४ मध्ये ही संख्या २,२०१ होती. ‘रँडस्टॅड इंडिया’च्या २०२३ च्या अहवालात गेल्या तीन वर्षांत भारतीय आयटी क्षेत्रात मूनलायटिंगचे प्रमाण २५ ते ३० टक्के वाढल्याचे समोर आले आहे.

जॉब पोर्टल इंडीडच्या २०२२ च्या अहवालात असे आढळून आले की, भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील ४३ टक्के कर्मचारी मूनलायटिंगविषयी सकारात्मक होते. परंतु, इतर अनेक क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी नोकऱ्या करण्याबाबत विरोध दर्शविला. मूनलायटिंगबाबत अनेकांचे वेगवेगळे मत असले तरीही मूनलायटिंग भारतात अजूनही स्वीकार्य आहे. मुंबईस्थित कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, जवळजवळ ६५ टक्के आयटी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते किंवा त्यांच्या ओळखीचे कोणीतरी रिमोट वर्क म्हणजेच घरून काम करताना मूनलायटिंग करत होते किंवा अर्धवेळ नोकरी करत होते.

कर्मचारी मूनलायटिंगचा पर्याय का निवडतात?

नोकरीची अनिश्चितता आणि कमी वेतनामुळे बहुतांश कर्मचारी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचे मार्ग शोधत आहेत. अनेक तरुण कर्मचारी त्यांच्या पहिल्या नोकरीत पुरेसा पगार नसल्याने मूनलायटिंगचा पर्याय निवडतात. बंगळुरूमधील सॉफ्टवेअर डेव्हलपर अभिषेक यांनी २०२३ मध्ये सीएनबीसीला सांगितले, “याचे मूळ कारण म्हणजे पैसे. सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना ते करत असलेल्या कामाचे पुरेसे पैसे दिले जात नाहीत. जर आपल्याला योग्य मोबदला मिळत असेल, तर आपल्यापैकी बरेच जण मूनलायटिंगचा करणार नाहीत, असे मला वाटते,”

भारतात मूनलायटिंग नवीन नाही. कोरोनानंतर नोकरीची अनिश्चितता वाढली आहे आणि त्यामुळेच पर्याय म्हणून मूनलायटिंग अगदी सामान्य झाले आहे. ‘बीबीसी’शी बोलताना रोजगार-कायदा तज्ज्ञ वीणा गोपालकृष्णन म्हणाल्या की, ही पद्धत करोना काळानंतर अधिक वाढली आहे. अनेक कर्मचारी घरून काम करतात आणि त्यामुळे ते सहसा नियोक्त्याच्या नजरेपासून दूर राहतात.” ‘इंडीड’च्या अहवालानुसार, टेक कर्मचारी आणि इतर काही कर्मचारी दोन मुख्य कारणांमुळे मूनलायटिंग करतात, ते म्हणजे नोकरी गमावण्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी. इंडीड इंडियाचे विक्री प्रमुख शशी कुमार यांनी सीएनबीसीला सांगितले, “कर्मचारी हा निर्णय कमी पगार आणि वाढत्या महागाईमुळे त्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्याची गरज म्हणून आणि नोकरीच्या सुरक्षिततेसाठी घेतात.”

‘सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात पगार तुलनेने चांगले असले तरीही राहणीमानाचा खर्च जास्त आहे. परंतु प्रत्येक कर्मचारी पैशांसाठी मूनलायटिंग करत नाही. काही जण त्यांच्या आवडी पूर्ण करण्यासाठी किंवा दुसऱ्या नोकरीद्वारे कौशल्य वाढविण्यासाठी मूनलायटिंग करतात. बंगळुरूमधील एका आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीत पूर्णवेळ कर्मचारी असलेल्या राजन यांनी २०२२ मध्ये बीबीसीला सांगितले की, त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल आहे. त्यामुळे ते जाहिरातींद्वारे पैसे कमवतात. “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि परदेशात शिक्षण घेण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यासाठी मला या मार्गाने निधी मिळण्यास मदत होईल,” असे ते म्हणाले. “कोरोना काळामुळे मला हे जाणवले की, अनपेक्षित गोष्टींसाठी तयार राहावे लागते आणि बचतीचा एक मोठा साठा जवळ असावा लागतो. मी घरून काम करतो आणि त्यामुळे मी दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतो.” काही जण त्यांचा संपर्क वाढविण्यासाठीही एकापेक्षा जास्त नोकऱ्या करत आहेत.

कंपन्यांचे याबाबत म्हणणे काय?

अनेक नियोक्त्यांसाठी मूनलायटिंग हा एक धोक्याचा इशारा आहे. २०२२ मध्ये विप्रोने त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी काम करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. तंत्रज्ञान व सल्लागार कंपनीचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी तंत्रज्ञान उद्योगातील मूनलायटिंगविषयी बोलताना ‘एक्स’वर लिहिले, “ही एक फसवणूक आहे.” सप्टेंबर २०२२ मध्ये इन्फोसिसने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दोन नोकऱ्या करण्याची परवानगी नाही, असा इशारा दिला होता. परंतु, या कंपनीने भारतातील कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकांच्या पूर्वसंमतीने कार्यशाळा करण्याची परवानगी दिली आहे. मूनलायटिंगला आळा घालण्यासाठी काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास परत बोलावणे किंवा उत्पादकता तपासणी करणे, यांसारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

‘इंडीड’ अहवालानुसार, ३१ टक्के नियोक्त्यांचे मत आहे की, कर्मचारी त्यांच्या कामात पूर्णपणे गुंतलेले नसल्यामुळे मूनलायटिंग करतात; तर २३ टक्के नियोक्त्यांचा असा विश्वास आहे की, कामगारांकडे दुसरी नोकरी करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध आहे. भारतात प्रतिभेची, विशेषतः कुशल कामगारांची कमतरता आहे. रँडस्टॅड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ विश्वनाथ पीएस यांनी सीएनबीसीला सांगितले, “आज प्रतिभेची कमतरता आहे आणि जर तुम्हाला सर्वोत्तम प्रतिभेची आवश्यकता असेल, तर तुम्हाला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील. पूर्वी दुसरी नोकरी कर्मचाऱ्यांची आवड होती; आता ती गरज झाली आहे.”