प्रज्ञा तळेगावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक हवामान बदलांमुळे सर्वच सजीव सृष्टीवर मोठा परिणाम होत आहे. याला सागरातील जीवसृष्टीही अपवाद नाही. याचेच प्रमुख उदाहरण म्हणजे जगभरातील प्रवाळांचे विरंजन किंवा ब्लीचिंग होत आहे. म्हणजेच ते पांढरे होत आहेत. प्रवाळांच्या विरंजनामागे नक्की काय कारणे आहेत, त्यामुळे शास्त्रज्ञ चिंतित का झाले आहेत ते जाणून घेऊ या…

प्रवाळ विरंजन कशामुळे होत आहे?

नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने (एनओएए) जागतिक प्रवाळ विरंजनाचा चौथा टप्पा सुरू असल्याचे जाहीर केले आहे. हा टप्पा २०२३ च्या प्रारंभापासून सुरू झाल्याचे म्हटले आहे. एल निनो स्थितीमुळे गेल्या जूनपासून तापमान वाढ होत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जागतिक सरासरी सागरी तापमानाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. तेव्हापासून जवळजवळ दररोज सागरी तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने प्रवाळ पांढरे होत असून मृत होत असल्याचे एनओएएने म्हटले आहे. सागरातील पाण्याचे तापमान एक महिन्यापेक्षा जास्त काळ सरासरी तापमानापेक्षा एक अंश सेल्सिअसने वाढल्यास प्रवाळ विरंजन होण्यास प्रारंभ होतो किंवा प्रवाळ मृत होतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?

शास्त्रज्ञांचे म्हणणे काय?

शास्त्रज्ञांनी अनेक दशकांपूर्वी तापमानवाढीमुळे जगातील प्रवाळांच्या भवितव्याबद्दल केलेले भाकीत आता खरे होताना दिसत आहे. विरंजन झालेले प्रवाळ सुंदर दिसतात, परंतु त्याचे परीक्षण जवळून केल्यास ते निरोगी नसून कुजत असल्याचे दिसते, असे सागरी पर्यावरणशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाण्याचे तापमान कमी झाल्यास विरंजन झालेले प्रवाळ पूर्ववत होऊ शकतात. त्याला अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र प्रदीर्घ आणि वारंवार विरंजन होत राहिल्यास प्रवाळ पूर्ववत होण्याऐवजी रोगग्रस्त तसेच मृत होण्याची शक्यताच अधिक असते. प्रवाळे ही तापमानवाढीचा पृथ्वीवर, निसर्गावर होणाऱ्या परिणामांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा आहे. जागतिक स्तरावर आम्ही प्रवाळ आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या समुदायांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहोत, हे सुधारायला हवे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

प्रवाळ विरंजन कोठे होत आहे?

फ्लोरिडा, कॅरिबियन, ब्राझील, दक्षिण पॅसिफिक ओलांडून अनेक देश, पश्चिम आशिया आणि इंडोनेशियाच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व आफ्रिकेतील खडकांपर्यंत तसेच ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफ आणि टांझानिया, मॉरिशस,  तसेच लाल समुद्र आणि पर्शियन गल्फमधील किनारपट्टीसह अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरातील जगातील अर्ध्याहून अधिक प्रवाळांवर परिणाम झाला आहे. हा जागतिक प्रवाळ विरंजनाचा चौथा टप्पा आहे.

हेही वाचा >>> जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?

यापूर्वी प्रवाळ विरंजन कधी झाले होते?

पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागराच्या म्हणजेच सर्व महासागरातील किमान १२ टक्के प्रवाळांना वर्षभराच्या कालावधीत विरंजन होण्याइतपत उष्णता सहन करावी लागल्यास जागतिक विरंजन होत असल्याचे घोषित केले जाते. १९९८ मध्ये पहिली जागतिक विरंजन घटना घडली, ज्यामध्ये महासागरातील २० टक्के रीफ प्रवाळ विरंजन होण्याइतपत समुद्राच्या वाढलेल्या उष्णतेच्या प्रभावाखाली आले. तर दुसरी घटना, २०१० मध्ये घडली. यामध्ये, ३५ टक्के प्रवाळांवर परिणाम झाला होता. तर तिसरी घटना २०१४ ते २०१७ दरम्यान नोंदवली गेली. यात पर्यंत ५६ टक्के प्रवाळ प्रभावित झाले होते. 

प्रवाळाचे फायदे काय?

प्रवाळ खडक जैवविविधतेने समृद्ध आहेत, त्यामुळे सागरी जीवन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. प्रवाळांच्या माध्यमातून दरवर्षी लाख कोटी डॉलर्सची कमाई होते. प्रवाळबेटांमुळे शैवाले, शैवालभक्षी मृदुकाय, तसेच अनेक माशांना अधिवास उपलब्ध होतो. प्रवाळभित्तीमुळे स्पंज, कृमी, शैवाले, मासे यांची एक परिसंस्था निर्माण होते. ही परिसंस्था मत्स्योद्योगात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरते. प्रवाळांना समुद्राचे वास्तुविशारद असे म्हटले जाते. ते २५ टक्के सागरी प्रजातींच्या अधिवासासाठी विस्तीर्ण संरचना तयार करतात. प्रवाळ हे जागतिक तापमान वाढीबाबत सर्वात संवेदनशील परिसंस्थांपैकी एक मानले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Survival of marine species in danger due to ocean warming print exp zws