खरे म्हणजे टाटा मोटर्सकर्त्यांना सुसाट हे वर्णन फारसे पसंत पडणार नाही. कारण वेगवान मोटारी बनवण्यापेक्षा सुरक्षित मोटारी बनविण्याकडे या कंपनीचा कल. मात्र सुरक्षिततेला दिलेले प्राधान्य भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याची स्पष्ट लक्षणे आहेत. प्रवासी वाहन बाजारपेठेत भारताच्या या अग्रणी मोटार उत्पादक कंपनीने ह्युंदाय या कोरियन कंपनीला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. मारुती उद्योग लिमिटेड अर्थातच अजूनही शिखरस्थानी आहे.
डिसेंबर महिन्याची आकडेवारी
दिवाळीनंतर बहुतेक सर्वच प्रवासी वाहन कंपन्यांच्या विक्रीत वाढ दिसून आली. या महिन्यात टाटा मोटर्सने ३५,३०० मोटारी विकल्या. त्या तुलनेत ह्युंदायने ३२,३१२ मोटारी विकल्या. मारुती उद्योग लिमिटेडने या काळात १,५३,१४९ मोटारी विकल्या. मात्र डिसेंबर २०२०च्या तुलनेत (१,६०,२२६) ही विक्री १३ टक्क्यांनी घटली.
विक्रमांची बरसात
टाटा मोटर्सच्या दृष्टीने डिसेंबर महिन्याअखेर कंपनीसाठीचे अनेक विक्रम नोंदवले गेले. डिसेंबरमधील विक्रीचा विक्रम प्रस्थापित झालाच. शिवाय तिसऱ्या तिमाहीतील (ऑक्टोबर-डिसेंबर) सर्वाधिक विक्री (९९,००२), कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक विक्री (३,३१,१७८) असेही विक्रम नोंदवले गेले. गेली अनेक वर्षे मारुती उद्योगपाठोपाठ ह्युंदाय मोटर्सनी प्रवासी वाहन क्षेत्रात दुसरा क्रमांक पटकावला होता. यंदा प्रथमच त्यांची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.
प्रवास जिद्दीचा
नवीन वाहने बनवताना बदलत्या भारताच्या आकांक्षांचा विसर, भरपूर किंमत आणि इंधन खर्चाच्या बाबतीत किफायतशीर नसणे, बोजड डिझाइन्स, विक्रीपश्चात सेवेचा सुमार दर्जा अशा काही टीकाटिप्पणींचा सामना टाटा मोटर्सना अनेक वर्षे करावा लागत होता. परंतु दोन आघाड्यांवर क्रांतिकारी बदल करण्याचे टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनाने ठरवल्याचे आढळून आले. टाटा टियागोच्या निर्मितीपासून या कंपनीचा डिझाइनविषयक दृष्टिकोन आमूलाग्र बदलल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय स्वतःचे इंजिन विकसित करून मोटारीची किंमत प्रयत्नपूर्वक खाली आणली गेली. टियागोपाठोपाठ टिगॉर, नेक्सन या उत्पादनांमध्ये ही वैशिष्ट्ये दिसून आली. टियागो आणि नेक्सन या मोटारी ग्राहकांना विशेष पसंत पडल्या.
एसयूव्ही आणि ईव्ही
भारतीय मोटार ग्राहकांमध्ये बदलत जाणाऱ्या ट्रेंड्सची दखल सर्वच उत्पादक घेत होते. मात्र टाटांनी या क्षेत्रात आघाडी घेतली. विद्युत वाहनांच्या बाबतीत इतर कंपन्या फारशा उत्साही नसताना टाटा मोटर्सनी नेक्सन ही एसयूव्ही इलेक्ट्रिक मोटार बाजारपेठेतही आणली. यंदा प्रथमच नेक्सन ईव्हीची महिन्याकाठी २ हजारांहून अधिक विक्री नोंदवली गेली.
नवमध्यमवर्गाला खुणावणाऱ्या एसयूव्ही बाजारपेठेत टाटांची सर्वाधिक उत्पादने विक्रीस आहेत. नेक्सन, हॅरियर, नवीन सफारी आणि आता पंच अशा चार निराळ्या किंमतगटातील मोटारी आणून टाटा मोटर्सनी मुसंडी मारली.
वाहन सुरक्षेबाबत तडजोड नाही
ग्लोबल सेफ्टी रेटिंग एनकॅप हे जगभर प्रवासी वाहनाच्या सुरक्षाकवचाचे मानक समजले जाते. मोटार वजनदार बनल्यास वेग आणि इंधन किफायतशीरता कमी होते या समजातून अधिकाधिक हलक्या वजनाची वाहने बनवण्याकडे कल दिसतो. पण त्यामुळे वाहनसुरक्षा तकलादू ठरू शकते. टाटांनी याबाबतीत तडजोड केली नाही. त्यामुळेच नेक्सन, अल्ट्रॉझ आणि पंच यांना पंचतारांकित सुरक्षा मानांकन आणि टियागो व टिगॉर यांना चतुर्थतारांकित मानांकन मिळालेले दिसते. देशातील महिंद्रा अँड महिंद्रा वगळता इतर कोणत्याही मोटार कंपनीने इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षेबाबत आग्रह धरलेला नाही.
आव्हाने
जवळपास प्रत्येक विभागात उत्पादन सुरू केल्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक जोखीम पत्करावी लागेल हे उघड आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका टाटा मोटर्सलाही मोठा बसला. अत्याधुनिकतेच्या आग्रहामुळे टाटासारख्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर किंवा संवाहकांवर अवलंबून राहावे लागते. या संवाहकांच्या आयातीमधील चढ-उतारांचा थेट फटका उत्पादन आणि पुरवठ्याला बसत आहे.
धाडसी निर्णय घेण्याची टाटांची परंपरा जुनी. यातूनच मार्केटमध्ये स्वतंत्र प्रकारच सुरू करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. पण यांपैकी इंडिका (हॅचबॅक), इंडिगो (कॉम्पॅक्ट सेडान) आणि नॅनो (एंट्री-लेव्हल हॅचबॅक) यांना मिळालेले यश बेतासबातच होते. नॅनो तर फसलीच असे मानणारे कित्येक आहेत. पण रतन टाटांच्या खास जिव्हाळ्याच्या असलेल्या या कंपनीने सबुरी आणि द्रष्टेपणा या टाटांच्याच वारसागुणांच्या आधारे इथवर मजल मारली. पाच वर्षांपूर्वी बाजारात तिसऱ्या क्रमांकावर स्थिरावण्याच्या उद्देशाने तयारी सुरू केलेल्या कंपनीची ही वाटचाल अगदीच किरकोळ ठरलेली नाही!