TCS layoffs आयटी कंपनीत नोकरकपातीचे प्रमाण वाढले आहे. एआय तंत्रज्ञान अर्थात कृत्रिम प्रज्ञा किंवा कृत्रिम बुद्धिमता हे अनेकांसाठी सोईचे तंत्रज्ञान असले तरी त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे प्रमुख के. कृतीवासन यांनी दोन महिन्यांपूर्वी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या या सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी दोन टक्के म्हणजे १२,००० हून अधिक कर्मचार्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली होती.
आता या निर्णयाचे पडसाद कंपनीच्या सर्व स्तरांवर उमटताना दिसत आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये सक्तीने आणि अचानक राजीनामे घेण्यात येत असल्याने कर्मचार्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या १२,००० हून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. टीसीएसमध्ये नक्की काय घडतंय? या नोकरकपातीचे कारण काय? कर्मचाऱ्यांनी कंपनीवर काय आरोप केले? त्याविषयी जाणून घेऊयात…
३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले?
आयटी कर्मचारी संघटना, कार्यरत कर्मचारी आणि इतर संबंधित घटकांचा असा विश्वास आहे की, प्रत्यक्षात कामावरून काढल्या जाणाऱ्या लोकांची संख्या अधिकृतपणे सांगितलेल्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. मनीकंट्रोलने म्हटले की, अनेक स्रोतांनुसार ही संख्या ३०,००० च्याही वर असू शकते. राष्ट्रीय स्तरावरील एका आयटी युनियनचा भाग असलेल्या टीसीएसमधील एका मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मनीकंट्रोलला सांगितले, “जून महिन्यापासून सुमारे १०,००० प्रभावित कर्मचाऱ्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधला आहे. हा आकडा सहजपणे ३०,००० पेक्षा जास्त असू शकतो. कंपनी कर्मचाऱ्यांना स्वतःहून राजीनामा द्यायला सांगत असल्यामुळे, हे आकडे टीसीएसच्या नोंदींमध्ये दिसणार नाहीत.”
गेल्या काही महिन्यांमध्ये ऑल इंडिया आयटी अँड आयटीईएस एम्प्लॉईज युनियन (AIITEU), फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (FITE), युनियन ऑफ आयटी अँड आयटीईएस एम्प्लॉईज (UNITE), कर्नाटक स्टेट आयटी/आयटीईएस एम्प्लॉईज युनियन (KITU) अशा अनेक आयटी कर्मचारी संघटनांनी टीसीएसमध्ये सुरू असलेल्या या कर्मचारी कपातीविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मात्र, कंपनीतील एका सूत्राने ही बातमी फेटाळून लावली आहे. त्यांच्या मते, युनियनकडून सांगितला जाणारा हा मोठा आकडा चुकीचा आहे, कारण कंपनीला नवीन मोठे प्रकल्प मिळत आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यास टीसीएसचे कामकाज चालू ठेवणे शक्य होणार नाही.
कर्मचाऱ्यांनी कंपनीवर काय आरोप केले?
३५ वर्षीय रोहन (नाव बदललेले)याने कॅम्पस मुलाखतीतून टीसीएसमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे १३ वर्षे काम केले. तो म्हणाला की, त्याला मानव संसाधन (HR) आणि संसाधन व्यवस्थापन समूह (RMG) यांनी पाच महिने त्रास दिल्यानंतर राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. त्याला राजीनामा द्यायला सांगितल्यावर, ज्या टाटा समूहाच्या कंपनीशी तो एका दशकाहून अधिक काळ प्रामाणिक राहिला, तिनेच आपल्याबरोबर विश्वासघात केल्याची भावना त्याला जाणवली. रोहनने राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला, परंतु २०२५ च्या मध्यामध्ये कंपनीने त्याला कामावरून काढले.
त्याने असा दावा केला की, त्याला ‘ऑन बेंच’ असलेल्या वेळेसाठी ६-८ लाख रुपये इतकी रक्कम परत करण्याची मागणी करण्यात आली. त्याच्या ग्रॅच्युइटी आणि जमा सुट्ट्यांमधून (Paid Leaves) फक्त अर्धी रक्कम समायोजित झाली, तर उर्वरित रक्कम टीसीएसने माफ केली, असे त्याने मनीकंट्रोलला सांगितले. यापूर्वी रोहन एका मोठ्या ऑटोमोटिव्ह क्लायंटबरोबर ५ वर्षांच्या प्रकल्पात काम करत होता. तो प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याला फक्त एका वर्षासाठी दुसरा प्रकल्प मिळाला. “तो प्रकल्प पूर्ण झाल्यावर, मला या क्षेत्रात दुसरा प्रकल्प शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, कारण या विभागात टीसीएसकडे जास्त काम किंवा नवीन प्रकल्प नव्हते. मी इतर टीमच्या व्यवस्थापकांशीही संपर्क साधला होता,” असे तो म्हणाला.
कामावरून काढण्यापूर्वी तो काही महिने ‘ऑन बेंच’ होता. या काळात, एचआर आणि आरएमजी त्याला नियमितपणे चौकशीसाठी फोन करायचे, एकदा तर त्याचे अॅक्सेसदेखील काढून घेण्यात आले होते. तो म्हणाला, “त्यांनी मला धमकावणे सुरू केले, मी दुसऱ्या कंपन्यांसाठी ‘मूनलाईटिंग’ करत आहे असा आरोप लावला.” सध्या चार महिन्यांपासून तो बेरोजगार आहे आणि तो पुण्यात मित्राच्या घरी राहून नवीन नोकरी शोधत आहे. “माझ्या गावी असलेल्या माझ्या कुटुंबाला, पत्नीला आणि मुलांना याबद्दल माहिती नाही, मी त्यांना सांगू शकलो नाही,” असेही तो म्हणाला.
टीसीएसच्या कार्यालयांमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण
कंपनीमध्ये अजूनही काम करत असलेल्या आणखी एका कर्मचाऱ्याने सांगितले की, कंपनीत भीतीचे वातावरण आहे, कारण पुढचा फोन कोणाला येईल हे कोणालाच माहीत नसते. “माझ्या कार्यालयात वरिष्ठ कर्मचाऱ्यांना म्हणजे ज्यांना ८-१० वर्षांहून अधिक अनुभव आहे, त्यांना कामावरून काढले जात आहे. सध्या कार्यालयात खूप भीती, गोंधळ आणि अस्वस्थता पसरली आहे. कर्मचाऱ्यांच्या ईमेलवर अचानक एचआरला भेटण्यासाठी संदेश येतो आणि त्यांना लगेच जायला सांगितले जाते. काहींना एक आठवड्याची नोटीस दिली जाते, तर काहींना त्वरित जावे लागते,” असे त्याने मनीकंट्रोलला सांगितले.
त्याच्या म्हणण्यानुसार, सध्याचे काही प्रकल्प प्रभावित झाले आहेत, क्लायंट खर्च कमी करत आहेत, त्यामुळे टीसीएसला त्या प्रकल्पांवर कमी लोकांची आवश्यकता आहे आणि उरलेल्यांना कामावरून काढले जात आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे आणि त्यांना प्रकल्प दिले जात आहेत, पण त्याचा वेग पूर्वीपेक्षा कमी आहे, असे त्याने सांगितले. याव्यतिरिक्त काही जणांचे म्हणणे आहे की टीसीएसने या तिमाहीत भरती वाढवली आहे.
मनमानी पद्धतीने नोकरकपात
अनेक प्रभावित कर्मचाऱ्यांनी सांगितले की, व्यवस्थापकांकडे ‘फ्लुइडिटी लिस्ट’ नावाच्या एका यादीत कामावरून काढल्या जाणाऱ्या लोकांची नावे आहेत. या फ्लुइडिटी लिस्टमध्ये असलेल्या नावांचा कर्मचाऱ्यांच्या कौशल्याशी किंवा त्यांच्या अनुभवाच्या वर्षांशी काहीही संबंध नाही. ही नावे अकाउंट मॅनेजर ठरवतात आणि ती कधीकधी मनमानी स्वरूपाची असतात. जुलैमध्ये जेव्हा मनीकंट्रोलने टीसीएसमधील कर्मचारी कपातीचे वृत्त होते, तेव्हा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, ही कपात कौशल्य नसल्यामुळे होत आहे.
मात्र, सध्या कार्यरत आणि माजी कर्मचाऱ्यांचे म्हणणे याच्या अगदी उलट आहे. विजय (नाव बदललेले) याने मनीकंट्रोलला सांगितले, “ही यादी ग्रेड्स, रेटिंग्स किंवा कौशल्यावर आधारित नाही, तर ती वैयक्तिक डिलिव्हरी मॅनेजर किंवा वरिष्ठ व्यवस्थापकांनी दिलेल्या नावांवर अवलंबून असते. चांगले रेटिंग असलेले, बाजारात मागणी असलेले, कौशल्ये असलेले किंवा अंतर्गत मुलाखती उत्तीर्ण झालेले कर्मचारीदेखील यात समाविष्ट आहेत. एकदा यादीत नाव आले की, मुलाखती उत्तीर्ण झाल्यानंतरही त्या कर्मचाऱ्याला नवीन प्रकल्पात सामील होण्यापासून रोखले जाते.”
विजयचा असाही दावा आहे की, कर्मचाऱ्यांना अंतर्गत कपातीमुळे कामावरून काढले जात असताना टीसीएसच्या क्लायंट्सना ‘कर्मचारी आजारी आहे’ किंवा ‘मुलांची काळजी घेण्याचा प्रश्न आहे’ यांसारखी खोटी कारणे दिली जातात. विजय पुढे म्हणाला, “लोक उघडपणे बोलत नाहीत, कारण त्यांना प्रतिशोधाची भीती वाटते आणि मोठ्या कंपन्यांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचा खर्च त्यांना परवडणारा नाही.”
आयटी कर्मचारी संघटनांकडून निषेध
फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (FITE) आणि युनियन ऑफ आयटी अँड आयटीईएस एम्प्लॉईज (UNITE) यासह अनेक आयटी कर्मचारी संघटनांनी या कर्मचारी कपातीच्या पद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एफआयटीईचे सचिव प्रशांत पंडित म्हणाले, “आम्ही पाहत आहोत की टीसीएसमध्ये ३० वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांना ३० मिनिटांत राजीनामा देण्यास सांगितले जात आहे. संस्थांकडून आयटी कर्मचाऱ्यांचा गैरवापर केला जात आहे.” युनाईटचे सरचिटणीस अलगुनांबी वेल्किन यांनी सांगितले की, काही कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत प्रकल्प असतानाही, त्यांना ‘ऑन बेंच’वर टाकले जात आहे. मग पुढील टप्प्यात त्यांना विविध कारणे सांगून राजीनामा देण्यासाठी बोलावले जाते.