Johnson & Johnson powder risk आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ची (J&J) उत्पादने वापरली आहेत. मग ते बेबी ऑईल असो वा टॅल्कम पावडर, लहानपणी जॉन्सन अँड जॉन्सनची ही उत्पादने अत्यंत लोकप्रिय होती. परंतु, मागील काही काळात J&J उत्पादने, विशेषतः त्यांची बेबी पावडर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लॉस एंजेलिसमधील न्यायालयाच्या एका खंडपीठाने अमेरिकेच्या या कंपनीला, कॅलिफोर्नियातील एका महिलेच्या कुटुंबाला ९६६ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८,५२२ कोटी रुपये) भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. नक्की हे प्रकरण काय होते? आणि ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ची बेबी पावडर खरोखरच कर्करोगास कारणीभूत ठरत आहे का? जाणून घेऊयात….

‘जॉन्सन अँड जॉन्सन’विरुद्धचा नवीन खटला

  • कंपनीच्या बेबी पावडरमुळे कर्करोग होतो, असा दावा करणाऱ्या एका खटल्यात जॉन्सन अँड जॉन्सन (J&J)ला दोषी ठरवण्यात आले आहे.
  • त्यानंतर लॉस एंजेलिसमधील न्यायालयाच्या खंडपीठाने कॅलिफोर्नियातील एका महिलेच्या कुटुंबाला ९६६ दशलक्ष डॉलर्सची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
  • या महिलेचा दुर्मीळ कर्करोगाने मृत्यू झाला होता.
  • न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, खंडपीठाने J&J ला या प्रकरणात भरपाई म्हणून १६ दशलक्ष (Compensatory Damages) आणि दंडात्मक नुकसानभरपाई म्हणून (Punitive Damages) ९५० दशलक्ष डॉलर्स देण्याचा आदेश दिला.
कॅलिफोर्नियाच्या रहिवासी असलेल्या माई मूर यांच्या कुटुंबीयांनी दावा केला की, २०१२ मध्ये त्यांचा मेसोथेलियोमा या दुर्मीळ कर्करोगाने मृत्यू झाला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

कॅलिफोर्नियाच्या रहिवासी असलेल्या माई मूर यांच्या कुटुंबीयांनी दावा केला की, २०१२ मध्ये त्यांचा मेसोथेलियोमा या दुर्मीळ कर्करोगाने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाने या कर्करोगाला मूर यांनी पावडर कारणीभूत असल्याचे सांगितले. कारण- त्यामध्ये ॲस्बेस्टॉस (नैसर्गिकरित्या आढळणारे खनिज) आढळून आले. मूर यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, टेक्सासमधील वकील जेसिका डीन यांनी ज्युरीच्या या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी ब्लूमबर्गला सांगितले, “या कुटुंबाला न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी तब्बल पाच वर्षं मोजावी लागली आणि आम्हाला आनंद आहे की, खंडपीठानं J&J ला जबाबदार धरले.” नुकसानभरपाईचा आदेश देताना खंडपीठाने नमूद केले की, J&J ने उत्पादनातील कर्करोगाचे धोके स्पष्ट न करून संबंधित महिलेची फसवणूक केली.

मात्र, आता जॉन्सन अँड जॉन्सनने मात्र या निर्णयाविरुद्ध अपील करणार असल्याचे सांगितले आहे. J&J मध्ये जागतिक उपाध्यक्ष असलेले एरिक हास यांनी एका निवेदनात सांगितले की, कंपनी तातडीने अपील करण्याची योजना आखत आहे आणि त्यांनी या निर्णयाला असंविधानिक म्हटले आहे. हास म्हणाले, “मूर प्रकरणातील फिर्यादींच्या वकिलांनी ‘जंक सायन्स’वर युक्तिवाद केले, जे खंडपीठासमोर सादर करायलाच नको होते.” कंपनीने पुढे सांगितले की, त्यांची उत्पादने सुरक्षित असून, त्यामध्ये ॲस्बेस्टॉस नाही आणि त्यामुळे कर्करोग होत नाही.

जॉन्सन अँड जॉन्सन आणि कर्करोगाशी संबंधित वाद

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर टॅल्कवर आधारित बेबी पावडर आणि तिचा कर्करोगाशी असलेल्या संबंधांवरून अनेकदा खटले दाखल करण्यात आले आहेत. खरे तर, J&J ने त्यांच्या बेबी पावडरमध्ये ॲस्बेस्टॉस असल्यामुळे वापरकर्त्यांना हानी पोहोचल्याच्या दाव्यांवर आधारित खटले कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. विशेष म्हणजे या उत्पादनामुळे फुप्फुसांच्या आवरणात सुरू होणारा दुर्मीळ कर्करोग ‘मेसोथेलियोमा’ आणि ‘ओव्हेरियन कर्करोग’ झाल्याच्या ७०,००० हून अधिक दाव्यांचा सामना आजही कंपनीला करावा लागतोय.

विशेष बाब म्हणजे टाल्कम पावडरमधील ॲस्बेस्टॉसमुळे मेसोथेलियोमा, ओव्हेरियन आणि इतर कर्करोग झाल्याच्या हजारो खटल्यांचा तडाखा बसल्यानंतर J&J ने २०२३ मध्ये जागतिक स्तरावर बेबी पावडरची विक्री थांबवली. यापूर्वीच्या न्यायालयीन कागदपत्रांमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, J&J ला १९७० च्या दशकातच त्यांच्या टाल्क उत्पादनांमध्ये धोकादायक ॲस्बेस्टॉस असल्याचे माहीत होते; परंतु त्यांनी ग्राहकांना सावध केले नाही आणि उत्पादने विकणे सुरूच ठेवले. कागदपत्रे, तसेच चौकशी आणि खटल्यातील साक्षीवरून दिसून येते की, किमान १९७१ पासून ते २००० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, कंपनीच्या टॅल्क आणि तयार पावडरमध्ये काही प्रमाणात ॲस्बेस्टॉस असल्याचे आढळून आले होते. कंपनीचे अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर व वकील या समस्येबद्दल आणि ती कशी हाताळायची याबद्दल चिंताग्रस्त होते; परंतु त्यांनी नियामक संस्थांना किंवा लोकांना ही माहिती दिली नाही.

न्यायालयीन कागदपत्रे दर्शवतात की, अनेक वर्षांपासून अनेकांनी जॉन्सन अँड जॉन्सनविरुद्ध त्यांच्या टॅल्कम पावडरबद्दल खटला दाखल केला आहे. डार्लीन कोकर या कदाचित खटला दाखल करणाऱ्या पहिल्या व्यक्ती होत्या. १९९९ मध्ये त्यांनी दावा केला की, त्यांनी स्वतःवर आणि त्यांच्या बाळावर वापरलेल्या विषारी पावडरमुळे त्यांना मेसोथेलियोमा (विविध अवयवांवरील ऊतींना प्रभावित करणारा कर्करोग) झाला होता. तेव्हापासून J&J विरुद्ध हजारो खटले दाखल झाले आहेत, या खटल्यात त्यांच्या टॅल्कम पावडरमधील कर्करोगास कारणीभूत असलेल्या ॲस्बेस्टॉसचा संसर्ग झाल्याचा आरोप आहे. परंतु, खटले दाखल होऊनही आणि तक्रारदारांना अब्जावधी डॉलर्स देऊनही J&J ने सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

टॅल्कम पावडर आणि कर्करोग यांच्यातील संबंध

कॅन्सर रिसर्च यूकेनुसार, टॅल्क हे एक खनिज आहे, जे कधी कधी टाल्कम पावडर आणि इतर सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते. कॅन्सर रिसर्च यूकेच्या सोफिया लोवेस यांनी बीबीसीला सांगितले, “टॅल्कचे उत्खनन अशा ठिकाणी केले जाऊ शकते जिथे ॲस्बेस्टॉस आहे, ज्यामुळे टॅल्क दूषित होऊ शकते. ॲस्बेस्टॉसमुळे मेसोथेलियोमा, फुप्फुस आणि ओव्हरीचा कर्करोग होतो.” गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)सुद्धा असे म्हटले होते की, खनिज टॅल्क हे माणसांसाठी घातक आहे. मात्र, यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA)नेदेखील ॲस्बेस्टॉससाठी टॅल्क-आधारित सौंदर्यप्रसाधनांची चाचणी केली आणि बहुतेक उत्पादनांमध्ये त्याचा स्तर आढळला नाही. त्यामुळे सर्वच टॅल्कम पावडर नक्कीच कर्करोगास कारणीभूत ठरते असे नाही. तज्ज्ञांनी सांगितले आहे, ॲस्बेस्टॉस असलेले टॅल्क आणि ॲस्बेस्टॉस-मुक्त टॅल्क यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.