संजय जाधव
जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मानात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. एका नव्या संशोधनानुसार १९९० ते २०२१ या कालावधीत जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान ६.२ वर्षांनी वाढले. याच कालावधीत भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढले आहे. जागतिक आयुर्मानाबाबत अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) या संस्थेतीत संशोधकांनी संशोधन केले आहे. हे संशोधन लॅन्सेट या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. 

कारणे कोणती?

खाद्यपदार्थ आणि पाण्यातून पसरणारे जीवाणू आणि विषाणूजन्य आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामध्ये विषमज्वर आणि अतिसार या रोगांचा प्रामुख्याने समावेश आहे. या रोगांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याने सरासरी आयुर्मानात १.१ वर्षांची भर पडली. मागील काही काळापासून लहान मुलांमध्ये या आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करण्यात आले आहे. त्यात लसीकरणासह सार्वजनिक आरोग्यविषयक अनेक उपक्रमांचा समावेश आहे. गेल्या तीन दशकांत संसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. तसेच, श्वसनमार्ग संसर्गामुळे होणारे मृत्यू घटल्यानेही आयुर्मानात ०.९ वर्षांची वाढ झाली आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..

सर्वाधिक वाढ कुठे?

आग्नेय आशिया, पूर्व आशिया आणि ओशनिया या विभागांमध्ये सरासरी आयुर्मानात सर्वाधिक ८.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गंभीर श्वसनविकार, हृदयविकार, श्वसनमार्ग संसर्ग आणि कर्करोगामुळे होणारे मृत्यू या विभागांमध्ये कमी झाले आहेत. त्यामुळे सरासरी आयुर्मान वाढले आहे. 

भारतात काय स्थिती?

मागील तीन दशकांत भारतीयांचे सरासरी आयुर्मान ८ वर्षांनी वाढले आहे. भारतात १९९० मध्ये सरासरी आयुर्मान ५८.६ वर्षे होते आणि ते २०२१ मध्ये ६७ वर्षांपर्यंत पोहोचले. दक्षिण आशिया विभागात भूतानमध्ये आयुर्मानात सरासरी सर्वाधिक १३.६ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल बांगलादेश १३.३ वर्षे, नेपाळ १०.४ वर्षे आणि पाकिस्तान २.५ वर्षे अशी वाढ आहे.

करोना संकटाचा कितपत फटका?

जागतिक पातळीवर करोना संकटाच्या काळात सरासरी आयुर्मानात घट झाली. करोना संकटामुळे जागतिक सरासरी आयुर्मानात १.६ वर्षांची घट झाली आहे. जागतिक पातळीवर मृत्यूदरात १९९० ते २०१९ या कालावधीत ०.९ ते २.४ टक्के घट झाली होती. त्यानंतर करोना संकटाच्या काळात मृत्युदरात वाढ झाली. सर्वाधिक मृत्यू होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या रोगांमध्ये करोना दुसऱ्या स्थानी पोहोचला. यामुळे सरासरी आयुर्मानात त्यावेळी घट झाली. दक्षिण अमेरिका, कॅरेबियन बेटे आणि सहारा उपखंडात करोना संकटामुळे सरासरी आयुर्मानात सर्वाधिक घट झाली. करोना संकटामुळे जगभरात २०२० आणि २०२१ मध्ये प्रौढांचा मृत्यूदर वाढला. करोना संकटाआधी त्यात घट होत होती. याचवेळी मुलांचा मृत्यूदर करोना संकटाच्या काळातही कमी झाला. मुलांच्या मृत्यूदरात सातत्याने घट होत असून, करोना संकटाच्या काळातील ही घट होण्याचा वेग मंदावला. करोना संकटाच्या काळात प्रौढांकडून योग्य वेळी उपचार घेण्यास टाळाटाळ झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>लग्नात कन्यादान आणि सप्तपदीचे महत्त्व काय? हे विधी केल्यानंतरच लग्न वैध ठरते? कायदा काय सांगतो?

गरीब देशांमध्ये स्थिती कशी?

काही ठरावीक देशांमध्ये विशिष्ट आजाराने जास्त मृत्यू होण्याचे प्रमाण दिसून आले आहे. जगभरात एखाद्या रोगामुळे विविध देशांमध्ये होणाऱ्या मृत्यूंऐवजी एकाच विभागात जास्तीत जास्त मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याला या देशांची आर्थिक स्थितीही कारणीभूत आहे. हिवतापामुळे होणारे सर्वाधिक मृत्यू सहारा उपखंडात होतात. याचवेळी खाद्यपदार्थ व पाण्यातून पसरणाऱ्या आजारांमुळे ५ वर्षांखालील मुलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण सहारा उपखंड आणि दक्षिण आशियामध्ये अधिक आहे. जगात होणाऱ्या चार बालमृत्यूपैकी एक मृत्यू दक्षिण आशिया आणि दोन मृत्यू आफ्रिकेतील सहारा विभागात होतात. जगातील इतर विभागांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये लहान मुलांपर्यंत लसीकरणासह इतर प्रतिबंधात्मक उपापयोजना पोहोचत नाहीत. गरीब देशांमध्ये या आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय पुरेसे नसल्याने तिथे मृत्यूदर जास्त आहे. याउलट श्रीमंत देशांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याने या रोगांचा संसर्ग आणि त्यापासून होणारे मृत्यूही कमी आहेत.

sanjay.jadhav@expressindia.com