विश्लेषण: ‘मांकडिंग’ची चर्चा नव्याने का सुरू झाली? इंग्लिश क्रिकेटप्रेमींना त्याचे वावडे का? | What is Mankading And Its History The manner in which Deepti Sharma ran out the last English batter print exp scsg 91 | Loksatta

विश्लेषण: ‘मांकडिंग’ची चर्चा नव्याने का सुरू झाली? इंग्लिश क्रिकेटप्रेमींना त्याचे वावडे का?

पुरुषांच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काळात असे अभावानेच घडले आहे.

विश्लेषण: ‘मांकडिंग’ची चर्चा नव्याने का सुरू झाली? इंग्लिश क्रिकेटप्रेमींना त्याचे वावडे का?
‘मांकडिंग’ हा शब्द भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू विनू मांकड यांच्या नावावरून प्रचलित झाला.

-ज्ञानेश भुरे

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दीप्ती शर्माने इंग्लंडच्या शार्ली डीन हिला धावबाद केले. या नंतर नव्याने ‘मांकडिंग’च्या चर्चेने गती घेतली. अनेक तर्क-वितर्क नव्याने लढवले जाऊ लागले. याच ‘मांकडिंग’बाबतचे हे विश्लेषण…

‘मांकडिंग’ हे नेमके काय आहे ?

‘मांकडिंग’ हा शब्द भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू विनू मांकड यांच्या नावावरून प्रचलित झाला. भारतीय संघ १९४७मध्ये ऑस्ट्रेलियात खेळत होता. तेव्हा मांकड यांनी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बिल ब्राऊनला चेंडू टाकण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर एंडला आधी सूचना देऊन एकदा नव्हे, तर दोनदा बाद केले होते. त्यावेळी क्रिकेटच्या सभ्यतेत हे बसणारे नाही, असे म्हणत त्यांच्यावर टीका झाली होती. पण, आपण क्रीझ सोडून पुढे न जाण्याचा इशारा फलंदाजाला दिला होता असे मांकड यांनी सांगितले आणि ते खरेही होते. ‘आयसीसी’च्या नियमावलीत या पद्धतीने फलंदाज बाद झाल्यास ‘अनफेअर प्ले’ म्हणून म्हटले गेले. मात्र, क्रिकेटविश्वात ही पद्धत ‘मांकडिंग’ म्हणून रूढ झाली. पुढे सुनील गावस्कर यांना मांकड यांचे नाव घेणे योग्य वाटले नाही. त्यांनी ‘ब्राऊन्ड’ असा याचा उल्लेख करण्यास सुरवात केली. 

ब्रॅडमन यांचे ‘मांकडिंग’बाबत मत काय होते?

मांकड यांनी त्या दौऱ्यात प्रथम एका सराव सामन्यात ब्राऊन यांना सूचित केले होते. त्यानंतर कसोटी सामन्यातही ब्राऊन यांनी खोड सोडली नाही. मांकड यांनी त्यांना तेव्हाही बाद केले. तेव्हा सर डॉन ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते. खिलाडूवृत्तीने त्यांनी हा निर्णय स्वीकारला. आपल्या आत्मचरित्रातही त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. ‘मांकडच्या खिलाडूवृत्तीवर लोक का शंका घेतात हेच कळत नाही. क्रिकेटचा नियम अगदी स्पष्ट आहे. गोलंदाजाच्या हातून चेंडू सुटेपर्यंत नॉन-स्ट्रायकरकडील फलंदाजाने क्रीझमध्येच थांबणे अनिवार्य आहे. अर्थात, जर फलंदाज क्रीझमध्ये नसेल, तर त्याला गोलंदाजाने का धावबाद करू नये? या सगळ्याचा अभ्यास करण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकर फलंदाजावर अन्याय झाला असे आपण का म्हणतो ?’… ब्रॅडमन यांनी हे आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे. 

अशा प्रकारे फलंदाज धावबाद ठरवणारा क्रिकेटचा नियम नेमके काय सांगतो?

क्रिकेटच्या परिभाषेत नॉन-स्ट्रायकरकडील फलंदाजाने, गोलंदाजाने चेंडू हातातून सोडण्यापूर्वी क्रीझमध्ये थांबणे आवश्यक असते. फलंदाज क्रीझमध्ये थांबत नसेल, तर त्याला धावबाद करण्याचा गोलंदाजाला अधिकार आहे, असा साधा सरळ नियम आहे. क्रिकेटच्या नियमावलीत सुरवातीला नियम ४१ अनुसार अशा बाद कृतीस अयोग्य खेळ (अनफेअर प्ले) मानले जायचे. पुढे नियम ४१.१६ नुसार नॉन-स्ट्रायकरचा फलंदाज धावचीत असे मानले जाऊ लागले. या वर्षी मार्चमध्ये क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) या नियमात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी अशा पद्धतीने बाद होण्याच्या कृतीस सर्वसामान्य पद्धत म्हणून मान्यता दिली. त्यांनी अयोग्य खेळाचा नियम ४१ वगळून धावबाद हा नवा नियम ३८ तयार केला. सुरुवातीला या नियमात गोलंदाजाला अपील करण्याचा किंवा कर्णधारास विचारण्याचा अधिकार होता. मात्र, आता फलंदाज थेट धावबाद धरला जाणार. अर्थात हा नवा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 

क्रिकेटमध्ये ‘मांकडिंग’ सामान्य आहे का?

पुरुषांच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अलीकडच्या काळात असे अभावानेच घडले आहे.  कपिलदेव यांनी दक्षिण आफ्रिकेच्या पीटर कर्स्टनला अशा पद्धतीने बाद केले होते. पुढे एका  विश्वचषक सामन्यात विजय निश्चित असताना विंडीज कर्णधार कोर्टनी वॉल्शने त्यावेळी नॉन-स्ट्रायकर पाकिस्तानी फलंदाज सलिम जाफरला संधी असूनही धावबाद केले नव्हते. विंडीज हा सामना हरले. असे प्रसंगही घडले आहेत. त्यानंतर २०१९च्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या आश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरला अशा पद्धतीने बाद केल्यावर नव्याने ‘मांकडिंग’च्या चर्चेला सुरुवात झाली. आपण काही गैर केले नाही. त्याला सूचना केली होती आणि क्रिकेटच्या नियमात याला मान्यता आहे, असे आश्विन म्हणाला. तीन वर्षांनी दीप्ती शर्माने इंग्लंडच्या चार्ली डीनला बाद करून ‘मांकडिंग’ची आठवण नव्याने करून दिली. पुढील महिन्यापासून ‘मांकडिंग’ हा शब्दप्रयोग होणार नाही. फलंदाजाला धावबादच धरण्यात येईल. 

दीप्ती शर्माच्या कृतीबद्दल एमसीसी काय म्हणते?

क्रिकेट खेळभावनेनेच खेळले जावे. त्यामुळे क्रिकेटविषयी आणि त्याच्या नियमांविषयी नेहमीच सशक्त चर्चा व्हायला हवी. दीप्ती शर्माने इंग्लंडच्या शार्ली डीनला ज्या पद्धतीने बाद केले त्यामुळे क्रिकेटची खेळभावना बाधित होते का? तर मुळीच नाही. क्रिकेट सभ्यपणे खेळले जावे यासाठीच नियम बनले आहेत. गोलंदाजाने चेंडू सोडण्यापूर्वी नॉन-स्ट्रायकरवरील फलंदाजाने क्रीझ सोडायची नाही असा नियम आम्ही केला आहे, तर फलंदाज का पुढे येतो आणि आल्याचे आढळल्यास त्याला गोलंदाजाने धावबाद केल्यास ते चूक ठरत नाही. भारत वि. इंग्लंड सामना चांगलाच रंगात आला असताना दीप्ती शर्माने नियम योग्य पद्धतीने अमलात आणला. त्यात काहीच गैर नाही, असे एमसीसीने स्पष्ट केले आहे. 

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपेल काय म्हणतात?

दीप्ती शर्माच्या कृतीनंतर क्रिकेट विश्वात हे योग्य नाही असाच सूर आळवला जात आहे. टीकाकारांत प्रामुख्याने इंग्लंडचे खेळाडू आहेत. या सर्वांना ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपेल यांनी मागेच चोख उत्तर दिले होते. क्रिकेटच्या नियमात बसत असताना गोलंदाजाने नॉन-स्ट्रायकरकडील फलंदाजाला बाद केले, तर त्यावर इतकी चर्चा कशाला? हे सगळेच खरे मूर्खपणाचे आहे, असे त्यांना वाटते. फलंदाजाला बाद करण्यापूर्वी गोलंदाजाने सूचित करणे आवश्यक आहे, या सूचनेचाही त्यांनी समाचार घेतला. चॅपेल म्हणतात, मला कळत नाही फलंदाजाला यष्टिचीत करण्यापूर्वी तुम्ही त्याला सूचित करता का, फलंदाजाला धावबाद करण्यापूर्वी सांगितले जाते का, की मी तुला आता धावबाद करणार आहे. मग, गोलंदाजाने का सांगायचे? क्रिकेटचा नियमच आहे ना, गोलंदाजाकडून चेंडू सुटण्यापूर्वी क्रीझ सोडायची नाही. या सगळ्यात तर ती बाद प्रक्रिया बसत असेल, तर इतकी चर्चा कशाला?

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : गेहलोत-पायलट संघर्षाचा नवा अंक : राजस्थानमध्ये काँग्रेस सत्ता गमावणार?

संबंधित बातम्या

एम एस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
“तो खेळाडू भारताला विश्वचषक जिंकवून देईल” ब्रेट ली म्हणाला, “रोहित, द्रविडने फक्त….”
IPL 2023: ‘टॅक्टिकल सबस्टिट्युशन म्हणजे काय रे भाऊ?’ आयपीएलच्या १५व्या हंगामापासून सुरु होणार नवीन नियम
FIFA World Cup 2022: अमेरिकन गोल्फ स्टारने पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची केली नक्कल, video व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Viral Video: 114 kmph वेगानं दुचाकी चालवणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू, दुभाजकाला धडक दिल्याचा थरार कॅमेरात झाला कैद
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट