What is Sextortion? अलीकडेच अलिबागमधील एका शिक्षकाने अटल सेतूवरून खाली उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. वैभव इंगळे असं या शिक्षकाचं नाव आहे. वैभव हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रहिवासी होते. वैभव यांनी सेक्सटॉर्शनमुळे आणि मिळणाऱ्या धमक्यांमुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
सेक्सटॉर्शन म्हणजे काय?
सेक्सटॉर्शन हा ब्लॅकमेलचा एक प्रकार आहे. ज्यात हल्लेखोर पीडित व्यक्तीच्या लैंगिक स्वरूपाचे फोटो किंवा व्हिडिओ इतरांकडे पाठवण्याची धमकी देतो. जर पीडित व्यक्तीने पैसे दिले नाहीत किंवा अधिक लैंगिक फोटो किंवा व्हिडिओ पाठवले नाहीत, तर हल्लेखोर फोटो किंवा व्हिडीओ प्रसारित करण्याचा इशारा देतो. हे स्त्री- पुरुष दोघांच्याही संदर्भात घडते आणि अशा हल्ल्यांचे लक्ष्य कोणत्याही वयोगटातील व्यक्ती असू शकतात, तरी हल्लेखोर सहसा तरुणांना लक्ष्य करतात.
सेक्सटॉर्शन करणारे गुन्हेगार समोरच्या पिडिताला वाटणाऱ्या लाजेच्या भीतीचा गैरफायदा घेतात. इंटरनेटवर कोणत्याही अपमानास्पद गोष्टींचा प्रसार होऊ नये, अशी भीती असलेल्या तरुणांना ते धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. पीडित व्यक्ती पैसे देत नाही किंवा अधिक लैंगिक फोटो किंवा व्हिडिओ पाठवत नाही म्हणून हल्लेखोर पीडित व्यक्तीचे अश्लील फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या पालक, शाळेचे अधिकारी किंवा नोकरीच्या ठिकाणी पाठवण्याची धमकी देतात.
सेक्सटॉर्शन कसे घडते?
सेक्सटॉर्शनची सुरुवात सहसा एका सामान्य (ऑनलाइन) संभाषणाने होते. हल्लेखोर नंतर संवादाला रोमँटिक किंवा लैंगिक दिशेने वळवतो आणि पीडित व्यक्तीला नग्न व्हिडिओ किंवा छायाचित्रे पाठवण्याची विनंती करतो. बळीला फसवण्यासाठी हे गुन्हेगार त्यांचे कौतुक करतात किंवा त्यांना ते विशेष, महत्त्वाचे किंवा अनोखे असल्याचे भासवतात. ते सहानुभूती मिळवण्यासाठी खोट्या दु:खद कथा सांगतात. त्यामुळे पीडित व्यक्तीला त्यांच्याबद्दल दया वाटते. जर पीडित व्यक्ती भावनिकदृष्ट्या असुरक्षित असेल, तर हल्लेखोर समजूतदार मित्र असल्याचे भासवतो आणि त्यांच्या समस्या ऐकण्याचं नाटक करतो. जेणेकरून पीडित त्याच्यावर विश्वास ठेवेल.
पीडित व्यक्तीने लैंगिक स्वरूपाची माहिती पाठवल्यानंतर मात्र सेक्सटॉर्शन कऱणारी व्यक्ती अधिक फोटो किंवा व्हिडीओची मागणी करते किंवा ती प्रकाशित न करण्यासाठी किंवा इतरांकडे न पाठवण्यासाठी पैसे देण्याची मागणी केली जाते. बर्याच प्रकरणांमध्ये गुन्हेगार आपली खरी ओळख लपवतो आणि स्वतःला किशोरवयीन मुलगी किंवा मुलगा असल्याचे भासवतो जेणेकरून पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन करता येणे शक्य होते.
ऑनलाइन कोणावर विश्वास ठेवता येईल हे कसे ओळखावे?
कोणावर नक्की विश्वास ठेवावा हे ठरवणे कठीण असले तरी तुम्ही ऑनलाईन संभाषण झाल्यावर त्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेतली असली तरी ऑनलाईन प्रोफाइलची सत्यता तपासणे आवश्यक आहे. शिवाय ऑनलाईन प्रोफाइल तपासताना जन्मतारीख, अलीकडील पोस्ट आणि इतर तपशिलाची पडताळणी करून ते प्रोफाइल खरे आहे की नाही हे पाहा. कारण कोणीतरी तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची ऑनलाईन ओळख चोरून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकते. ऑनलाईन माध्यमांवर कोणावर विश्वास ठेवायचा हे निश्चित करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे त्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्ट किंवा संपर्क यादीची तपासणी करणे. तुमचे काही समान मित्र असतील, तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्या व्यक्तीशी त्यांचा प्रत्यक्ष संवाद झाला आहे का हे विचारू शकता. कारण सेक्सटॉर्शन करणारे हल्लेखोर बनावट मित्र आणि संपर्कांचे जाळे तयार करू शकतात.
फोनवर संवाद साधणे हा ओळख निश्चित करण्याचा पुरेसा उपाय आहे असे अनेकांना वाटते. मात्र, व्हिडिओ चॅटिंगच्या बाबतीतही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. समोरची व्यक्ती कॅमेरा काम करत नाही किंवा नेटवर्कचा वेग कमी आहे असे सांगून कॅमेरा बंद ठेवू शकते मात्र त्याच वेळी तुमचा व्हिडीओ गुप्तपणे रेकॉर्ड करू शकते.
सेक्सटॉर्शनपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?
जर तुम्हाला कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायचे आहे हे माहीत असेल, तर सेक्सटॉर्शनपासून स्वतःचे संरक्षण करणे कठीण नाही. इतरांशी ऑनलाइन किंवा मेसेजद्वारे संवाद साधताना खालील साध्या उपायांचे पालन करा. व्यक्तिगत माहिती जास्त शेअर करू नका. जर तुम्ही काही वैयक्तिक गोष्टी शेअर करत असाल, तर त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देताना सावध राहा. एखादी व्यक्ती तुमच्या पोस्ट केलेल्या माहितीचा उल्लेख करत असेल, तर अधिक सतर्क व्हा. गुन्हेगार अनेकदा पीडित व्यक्तीच्या प्रोफाइलमधील किंवा फीडमधील छोट्या माहितीच्या तुकड्यांचा वापर करून त्यांचा विश्वास संपादन करतात. उदाहरणार्थ, गुन्हेगार पीडित व्यक्तीच्या जवळच्या शाळेतील विद्यार्थी असल्याचे भासवू शकतो. हे लहान तपशील वापरून गुन्हेगार पीडित व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे कोणाशीही संवाद साधताना नेहमी सावध राहा.
पहिल्यांदा ऑनलाइन भेटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपासून सावध राहा. जर तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून मेसेज मिळाले तर त्यांना ब्लॉक करा किंवा दुर्लक्ष करा. जर एखादी व्यक्ती केवळ ऑनलाइन अस्तित्वात असेल, तर त्यांची ओळख निश्चित करणे अशक्य असते.
फक्त ऑनलाइन उपलब्ध असलेली व्यक्ती संशयास्पद ठरू शकते. ते दुसऱ्या कोणाच्याही छायाचित्रांचा आणि व्हिडिओंचा वापर करून ते आपले असल्याचा दावा करू शकतात. त्यांनी भेट दिलेल्या परिसराचे, रस्त्यांचे, हॉटेल्सचे किंवा दुकानांचे फोटो चोरी करून आपले असल्याचे दाखवू शकतात. कोणत्याही व्यक्तीची खरी ओळख केवळ प्रत्यक्ष भेटीतच निश्चित करता येते. जर तुम्ही एखाद्याला अॅप किंवा गेमद्वारे भेटलात आणि त्यांनी तुमच्याशी संवाद इतर कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवर सुरू ठेवण्यास सांगितले, तर अधिक सतर्क राहा. हे लोक एखाद्याला फसवण्यासाठी मुद्दाम गेम किंवा अॅपचा वापर करत असू शकतात.
महत्त्वाचे लक्षात ठेवा
तुम्ही ऑनलाइन शेअर केलेली प्रत्येक गोष्ट, फोटो, व्हिडिओ, मेसेज किंवा पोस्ट इतर कोणाशीही शेअर केली जाऊ शकते आणि सार्वजनिक केली जाऊ शकते. एकदा काहीतरी पाठवल्यानंतर ते कुठे आणि कोणाकडे जाईल यावर तुमचे कोणतेही नियंत्रण राहत नाही. मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका. जबाबदार प्रौढ व्यक्ती, पालक, प्रशासक, जवळचे मित्र आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधा. ते तुमच्या मदतीसाठी तत्पर असतील. हे फक्त हल्ला थांबवण्यासाठी किंवा पुढील हल्ल्याला रोखण्यासाठीच नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना जागरूक करण्यासाठीही आवश्यक आहे. जेणेकरून ते इतरांचेही संरक्षण करू शकतील.
© IE Online Media Services (P) Ltd