दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ६ जून १९४४ रोजी मोठी आणि अत्यंत धाडसी लष्करी कारवाई करण्यात आली. ही कारवाई इतिहासात डी-डे म्हणून ओळखली जाते. वायव्य युरोप नाझी फौजांपासून मुक्त करण्याच्या मोहिमेची सुरुवात या कारवाईने झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. ‘डी-डे’ म्हणजे काय, त्यावेळी नेमके काय घडले, आणि हा दिवस का महत्त्वाचा आहे, याविषयी…

‘डी-डे’ म्हणजे काय?

दुसरे महायुद्ध हे आजवरच्या मानवी इतिहासातील सर्वात मोठे युद्ध होते. दहा कोटींहून अधिक जणांचा सहभाग आणि पाच कोटींहून अधिक मनुष्यहानी पाहणाऱ्या या युद्धाने जगाच्या राजकीय भौगोलिक रचनेत बदल केलेच; पण जगाचे अर्थकारण, राजकारण, सत्ताकारण या सर्वांवर सखोल परिणाम घडवला. १९३९ पासून सुरू झालेल्या या महायुद्धाचा शेवट १९४५ मध्ये झाला. मात्र या शेवटाची सुरुवात ज्या घटनांपासून झाली, त्यांपैकी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ‘डी-डे.’ ६ जून १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांचे सैन्य जर्मनीचा ताबा असलेल्या फ्रान्समधील नॉर्मंडी नावाच्या किनाऱ्यावर यशस्वी उतरले. दोस्त राष्ट्रांच्या या चढाईने जर्मनीचे कंबरडे मोडले आणि दुसऱ्या महायुद्धाचा निकाल लागला. डी-डे आक्रमण हे इतिहासातील समुद्रमार्गे केलेले सर्वात मोठे आक्रमण होते. ११ महिने चाललेली ही लष्करी कारवाई दोस्त राष्ट्रांच्या फौजांना जर्मनीची राजधानी बर्लिन येथील ॲडॉल्फ हिटलरचे मुख्यालय असलेल्या बंकरपर्यंत घेऊन गेली. दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाल्याने ६ जून रोजी ‘डी-डे’ साजरा केला जातो.

हेही वाचा >>>विश्लेषण: अजितदादा, केजरीवाल, नवीन, जगनमोहन यांची जादू ओसरली? लोकसभा निवडणुकीत अपयश कशामुळे?

डी-डे लँडिंग कुठे झाले?

दोस्त राष्ट्रांचे सैन्य फ्रान्सच्या उत्तरेकडील नॉर्मंडी किनारपट्टीच्या ८० किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर उतरले. हा किनारा ब्रिटनच्या सर्वात जवळ असलेल्या किनाऱ्यांपैकी नव्हता. हिटलरला अपेक्षा होती की दोस्त फौजा इंग्लिश खाडीतील सर्वात अरुंद बिंदूमार्गे येतील. मात्र दोस्त राष्ट्रांनी हिटलरची ही अपेक्षा चुकीची ठरवण्यासाठी नॉर्मंडी किनारपट्टीची निवड केली. ब्रिटनमधून फ्रान्सच्या दिशेने एक प्रचंड सैन्यदल निघाले. या संपूर्ण कारवाईला ‘ऑपरेशन ओव्हरलॉर्ड’ असे सांकेतिक नाव देण्यात आले.

कारवाई कशी केली गेली?

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर चारच वर्षांत म्हणजे १९४३ पर्यंत जर्मनीने युरोपच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला होता. रशियाच्या मोठ्या भागावरही जर्मनीचे नियंत्रण असल्याने पूर्वेकडून सोव्हिएत सैन्य जर्मनीला थोपवेल आणि ब्रिटन, अमेरिका व अन्य दोस्त राष्ट्रांनी पश्चिमेकडून दुसरी आघाडी उघडावी, असे मत सोव्हिएत महासंघाचे प्रमुख स्टॅलिन यांनी व्यक्त केले होते. मात्र ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल त्यांना दाद देत नव्हते. इराणमधील तेहरानमध्ये झालेल्या परिषदेत चर्चिल यांना बाजूला ठेवून अमेरिकी अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट आणि स्टॅलिन यांनी १९४४ मध्ये युरोपमध्ये शिरकाव करून जर्मन फौजांना परतवण्याचा निर्धार केला. आधी आक्रमणासाठी १ मे १९४४ ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणात सैन्य उतरण्यासाठी, अधिक युद्धनौका सज्ज करण्यासाठी वेळ फारच कमी असल्याने तारीख बदलण्यात आली. ६ जून ही तारीख निश्चित करून ‘ऑपरेशन ओव्हरलॉर्ड’ हे नाव या मोहिमेला देण्यात आले. या दिवशी दोस्त राष्ट्रांचे जवळपास दीड लाख सैन्य नॉर्मंडी किनाऱ्यावर उतरले आणि आक्रमणाला सुरुवात केली. दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी आणि युद्धनौकांनी किनारपट्टीवर असलेल्या जर्मन ठाण्यांवर बॉम्बफेक केल्यावर हल्ला सुरू झाला. दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने महत्त्वाचे रस्ते आणि पूल ताब्यात घेतले. यामुळे जर्मन सैन्याला ज्या भागात सैन्य उतरत होते त्या भागात जादा कुमक पाठवणे कठीण झाले. ब्रिटनच्या दक्षिण किनाऱ्यावरून हजारो जहाजे मदतीसाठी निघाली होती. एकूण सहा हजारांहून अधिक जहाजे या कारवाईत सामील झाली. त्यांच्या मदतीला ११ हजारांहून अधिक विमाने होती. सैन्याने रातोरात इंग्लिश खाडी पार केली. जुलैपर्यंत दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचा आकडा १० लाखांपर्यंत गेला. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात दोस्ट राष्ट्रांच्या सैन्याने नाझी फौजांचा प्रतिकार मोडून काढला.

हेही वाचा >>>विश्लेषण: विशेष श्रेणी दर्जा प्राप्त झाल्याने राज्यांचा फायदा काय?

डी-डे कारवाईत कोणी सहभाग घेतला?

डी-डे कारवाईसाठी नॉर्मंडी किनाऱ्यावर उतरलेले बहुसंख्य सैन्य ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेचे होते. मात्र ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, झेकोस्लोव्हाकिया, फ्रान्स, ग्रीस, नेदरलँड, नॉर्वे आणि पोलंडमधील वेगवेगळ्या सशस्त्र दलांनी  डी-डे आणि नॉर्मंडीच्या लढाईत सहभाग घेतला होता.

‘डी-डे’ असे का म्हणतात?

डी-डेमधील ‘डी’ला कोणताच अर्थ नाही किंवा हे कोणत्याच नावाचे संक्षिप्त रूप नाही. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करताना लष्कराकडून हा शब्द वापरला जातो. डी-डे हे नाव बऱ्याच लष्करी कारवायांसाठी वापरले गेले आहे. मात्र नॉर्मंडीवरील दोस्त राष्ट्रांच्या आक्रमणाशी ते आता घट्टपणे जोडलेले आहे. आक्रमण केव्हा होणार याची तारीख कळण्यापूर्वीच दोस्त राष्ट्रांच्या लष्कराने त्याच्या तपशिलांचे नियोजन करण्यास सुरुवात केली. सैन्याची जहाजे ब्रिटनमधून कधी निघून जावीत यासारख्या गोष्टी आयोजित करण्यासाठी त्यांनी त्याला डी-डे म्हणून संबोधले.  

sandeep.nalawade@expressindia.com