Who is Dr Neil Anand Indian Origin Doctor US jailed : भारतीय वंशाचे डॉक्टर नील के. आनंद यांना अमेरिकन न्यायालयाने १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आरोग्य विमा फसवणूक प्रकरणात एप्रिल २०२५ मध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. शनिवारी या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने डॉ. आनंद यांना तुरुंगवासासह २ दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे १७.७४ कोटी रुपये) दंड भरण्याचे आदेश दिले. विशेष बाब म्हणजे अमेरिकेत झालेल्या ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील जखमींवर आनंद यांनी उपचार केले होते. दरम्यान, हे प्रकरण नेमके आहे तरी काय? भारतीय वंशाच्या डॉक्टरला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा का सुनावण्यात आली? त्याबाबत जाणून घेऊ…
कोण आहेत डॉ. नील के. आनंद?
४८ वर्षीय डॉ. नील के. आनंद यांचा जन्म पेनसिल्व्हेनियातील बेनसालेम येथे झाला. त्यांनी रेनसेलेर इन्स्टिट्यूटमधून आपले प्राथामिक शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या २४ व्या वर्षी अल्बानी मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी मिळवली. २००१ मध्ये न्यूयॉर्कमधील ९/११ च्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींवर डॉ. आनंद यांनी उपचार केले होते. या कार्यासाठी त्यांना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या ‘NYU Heros’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. डॉ. आनंद यांनी थॉमस जेफरसन रुग्णालयात झालेल्या पहिल्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतही मदत केल्याचे सांगितले जाते. अमेरिकन नौदलात वैद्यकीय अधिकारी आणि लेफ्टनंट कमांडर म्हणून सेवा करताना त्यांनी ७०० हून अधिक हृदय आणि फुफ्फुसांच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत.
२०१९ मध्ये आनंद यांना झाली होती अटक
२०१९ मध्ये आनंद यांच्यावर आरोग्य सेवा फसवणूक, अनधिकृतरीत्या औषधांचे वितरण आणि आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप झाले. मेडिकेअर यूएस ऑफिस ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (OPM), इंडिपेंडन्स ब्लू क्रॉस (IBC) आणि अँथम (Anthem) या विमा कंपन्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. आनंद यांनी स्वतःच्या बेनसेलेम येथील क्लिनिक व फार्मसींमधून रुग्णांना ‘गुडी बॅग्स’ नावाने अनावश्यक औषधे दिली. त्यांनी नऊ वेगवेगळ्या रुग्णांना २०,८५० ऑक्सिकोडोन गोळ्यांचे वाटप केले. या गोळ्या वेदनाशामक असून त्याचे व्यसनही लागू शकते, असा आरोप अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर केला.
अधिकाऱ्यांनी आनंद यांच्यावर काय आरोप केले?
२०१५ ते २०१९ या काळात डॉ. आनंद यांनी अवैध मार्गाने २.४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ₹२१.२९ कोटी) कमावले. ते कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय आणि त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर रुग्णांना अनावश्यक औषधे देत होते. त्यांनी अधिकृत परवाना नसलेल्या वैद्यकीय इंटर्न्सकडून आधीच स्वाक्षरी केलेल्या प्रिस्क्रिप्शन पॅडवर औषधे लिहून घेतली होती, असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने त्यावेळी माध्यमांना सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू होताच आनंद यांनी फसवणुकीतून मिळवलेले सुमारे १.२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १०.६४ कोटी रुपये) आपल्या वडिलांच्या नावावरील खात्यात हस्तांतरित करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही या अधिकाऱ्याने केला.
डॉ. आनंद यांनी फेटाळले सर्व आरोप
अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेले सर्व आरोप डॉ. नील आनंद यांनी फेटाळून लावले. आपल्यावरील गुन्हे आणि न्यायालयीन खटला हा अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले. “आजारपणाने त्रस्त असलेल्या रुग्णांवर मी उपचार करत होतो, मात्र मला फसवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि फेरफार केलेल्या डेटाचा वापर केला, असे डॉक्टर आनंद यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. आनंद यांच्या बहिणीनेदेखील आपल्या भावाला खोट्या प्रकरणात अडकवले जात असल्याचे म्हटले आहे. “आमच्या रुग्णालयात उपचार घेतलेल्या काही रुग्णांनी न्यायालयात खोटी साक्ष दिली आणि डॉ. आनंद यांना सूडबुद्धीने अडकवण्यात आले”, असा दावा त्यांनी केला आहे.
डॉ. आनंद यांनी फक्त खिसे भरल्याचा आरोप
डॉ. आनंद यांनी न्यायालयात सांगितले की, असह्य आणि भीषण वेदना भोगणाऱ्या रुग्णांना उपचार मिळावेत अशी त्यांची इच्छा होती. आपण त्यांच्यावरील उपचार हे फसवणुकीच्या उद्देशाने नव्हे, तर दयेच्या भावनेतून केले. दुसरीकडे सरकारी वकील पॉल जे. कूब यांनी असा दावा केला की, आनंद यांनी स्वतःचे खिसे भरण्यासाठी रुग्णांवर चुकीचे उपचार केले. त्यांच्यासाठी रुग्ण हे पैसे कमाविण्याचे साधन होते. दरम्यान, एप्रिलमध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर डॉ. आनंद यांना आरोग्य सेवा फसवणूक, अनधिकृतरीत्या औषधांचे वितरण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते.
हेही वाचा : हार्ट अटॅक आल्यानंतरच्या पुढच्या काही सेकंदात काय कराल? जीव कसा वाचवता येतो? जाणून घ्या ५ महत्त्वाचे मुद्दे!
न्यायालयाने निकाल देताना काय म्हटले?
डॉ. आनंद यांनी रुग्णांवर दया भावनेतून उपचार केल्याचा दावा न्यायालयात केला असला तरी न्यायाधीश मात्र त्या दाव्याने प्रभावित झाले नाहीत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून असे दिसून येते की आनंद यांचे लक्ष रुग्णावर नव्हे तर त्यांच्या पैशांवर होते, असे न्यायालयाने म्हटले. “रुग्णाला होणारा त्रास तुमच्यासाठी फायदा होता, तुमचे लक्ष उपचारांवर नव्हे, तर अवैध लाभावर होते,” अशा शब्दांत न्यायाधीश केनी यांनी आनंद यांना सुनावले. “एकेकाळी न्यूयॉर्कमध्ये तुम्हाला आदर्श मानले जात होते, पण नंतर तुम्ही रुग्णांची फसवणूक करण्यामध्ये गुंतलात आणि त्यांच्या खऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले,” अशी नाराजीही न्यायाधीशांनी बोलून दाखवली.
डॉ. नील आनंद यांना १४ वर्षांचा तुरुंगवास
दरम्यान, न्यायालयाने डॉ. नील आनंद यांना १४ वर्षांचा तुरुंगवास आणि आर्थिक दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम लवकरात लवकर नुकसानभरपाई म्हणून पीडितांना द्यावी, असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आरोग्य व मानवी सेवा विभागाच्या निरीक्षक जनरल, अमेरिकन टपाल सेवांच्या निरीक्षक जनरल आणि कार्मिक व्यवस्थापन कार्यालयाच्या निरीक्षक जनरल कार्यालयाने केला. तसेच अमेरिकेच्या क्रिमिनल डिव्हिजनच्या फ्रॉड सेक्शनमधील वकील पॉल जे. कुब आणि अरुण बोडापती यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. अमेरिकेतील आरोग्य सेवांमधील होणाऱ्या फसवणुकीवर फ्रॉड सेक्शनचे बारकाईने लक्ष असते. मार्च २००७ पासून या कार्यक्रमांतर्गत ५,८०० हून अधिक आरोपींवर ३० अब्ज डॉलर (सुमारे २.६६ लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.